खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड सेंटर सुरू करावे ः पाटील
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड सेंटर सुरू करावे ः पाटील
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोना या भीषण महामारीचा मुकाबला करण्यासाठी कोपरगाव शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी काळाची गरज ओळखून सुसज्ज कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.
याविषयी अधिक बोलताना पाटील म्हणाले, इतर तालुक्यांचा विचार करता दुर्दैवाने कोपरगाव शहरात स्वतंत्र खासगी सुसज्ज कोविड सेंटर नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय असणारे कोविड सेंटर असणे गरजेचे आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असणार्या नागरिकांना शुल्क देऊन उपचार घेता येतील. तर शासकीय कोविड सेंटरमध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना खाटा उपलब्ध होऊन उपचार मिळतील. या उदात्त हेतूने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी अद्ययावत कोविड सेंटर सुरू करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तर शहरातील एखाद्या इमारतीमध्ये खासगी कोविड सेंटर सुरू करता याबाबत पालिकेने पुढाकार घ्यावा. यासाठी खासगी व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावे, असेही पालिका मुख्याधिकार्यांना त्यांनी सूचविले आहे.