हिवरगाव पठार येथे शेतीच्या वाटपातून वाद; तिघांविरोधात गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथे शेतीच्या वाटपातून झालेल्या वादात दोघे जखमी झाले आहे. सदर घटना बुधवारी (ता.14) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली असून, घारगाव पोलिसांत गुरुवारी (ता.15) तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शेंडेवाडी शिवार व हिवरगाव पठार येथे रवींद्र अशोक डोळझके, आई छबुबाई व भाऊ पंकज डोळझके हे शेतीचे वाटप करत होते. त्यावेळी पंकज याचा मेहुणा गणेश भाऊसाहेब दातीर हा म्हणाला, मी तुम्हांला मेंढ्यांचे वाटप करुन देणार नाही. त्यावेळी रवींद्र डोळझके हे म्हणाले तुम्ही आमच्या भावांमध्ये पडू नका. याचा राग आल्याने गणेश दातीर याने रवींद्र यांच्या डोक्यात काठीने मारले. त्यानंतर आई छबुबाई या भांडण सोडविण्यास आल्या असता त्यांनाही ढकलून देत मारहाण केली. शेवटी गणेश दातीर, भाऊसाहेब गहिनाजी दातीर व बाल्या भाऊसाहेब दातीर यांनी आमच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हांला जिवंत सोडणार नाही, असा दम दिला. या प्रकरणी रवींद्र डोळझके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरोधात पोलिसांनी गुरनं.173/2021 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जी. पी. लोंढे हे करत आहे.
