संगमनेर, अकोल्याच्या तीन हनींवर अकोल्यात ट्रॅप! बळजबरीचा सौदा करुन लुटले; पोलिसांनी सापळा रचून पकडले..


नायक वृत्तसेवा, अकोले
नाशिकच्या कथीत ‘हनीट्रॅप’ प्रकरणावरुन राज्यभर उठलेली राळ आत्ता कोठेतरी खाली बसत असतानाच संगमनेर तालुक्यातील एकीने साखर कारखान्यात नोकरी करणार्‍या सामान्य इसमाला गळाला लावले आणि सुरुवातीला आपल्या प्रेमपाशात अडकवून नंतर त्याला अकोल्यातील दोघींकडे हस्तांतरीत केले. या खेळात पहिलीच्या सांगण्यावरुन दुसरीने तिसरीची व्यवस्था करीत विरगाव रस्त्यावरील खडीक्रशरवर नेवून फसवलेला गडी पूरता जायबंदी केला. त्यातून त्याला लाखाची मागणी करीत अवघ्या दहा दिवसांतच टप्प्याटप्प्याने 84 हजार रुपयांना नागवल्यानंतर अखेर वैतागलेल्या पीडित इसमाने अकोले पोलिसांशी संपर्क साधून घडला प्रसंग कथन केला आणि त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत सुगांव फाट्यावर सापळा लावून तिसर्‍या क्रमांकाच्या ‘हनी’सह तिच्या जोडीदाराला रंगेहाथ पकडले. या घटनेने संगमनेर-अकोले तालुक्यात सध्या अशाप्रकारे तरुण अथवा गृहस्थांना प्रेमपाशात अडकवून लुटण्याच्या वाढत्या प्रकरणांना वाचा फुटली असून दोन्ही तालुक्यात आणखी काहीजणांना अशाचप्रकारे लुटले गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे.


याबाबत संगमनेर तालुक्यातील एका गृहस्थाने अकोले पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी संगमनेर खुर्दमधील गोळीबार मैदानावर संबंधित इसमाची एका महिलेशी ओळख झाली. त्यातून एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले गेल्याने त्यांच्यात संभाषणही होवू लागले. त्यानंतर एक दिवस सदरील महिलेने तक्रारदाराला संगमनेरात बोलावून वडगावपान येथे आपले काम असल्याचे भासवून सोबत येण्याची गळ घातली. त्यानुसार दोघेही वडगावला गेले असता जाताना एकमेकांशी गप्पा मारीत असतानाच ‘तुम्ही मला आवडता, मला तुमच्याकडून प्रेम पाहिजे..’ असे म्हणतं ‘त्या’ हनीने प्रेमाचे जाळे फेकले, त्यावर तक्रारदाराने आपण विवाहित असल्याचे व आपल्याला मुलं-बाळं असल्याचे सांगताच ‘काळजी नको, ही गोष्ट तुमच्या बायकोला आणि माझ्या नवर्‍याला समजणार नाही..’ असे म्हणतं तिने त्याचा विश्‍वास संपादन केला.


वडगावमध्ये घेवून गेल्यानंतर त्याला तेथील एका लॉजवर नेवून तिने आपले प्रेम व्यक्त केले आणि तेथून दोघेही माघारी संगमनेरला आले. त्यानंतर दोन दिवसांनी 19 ऑगस्टरोजी संगमनेरच्या ‘त्या’ हनीने अकोल्यातील दुसर्‍या एका महिलेचा मोबाईल क्रमांक देत तिला तुमच्यासोबत बोलायचे असल्याचा निरोप दिला. तक्रारदाराला स्वतःत कृष्ण अवतरल्याचा आभास झाल्याने त्यानेही ‘त्या’ क्रमांकावर फोन करुन आपली शाब्दीक तहाण भागवली. या पहिल्याच मोबाईल संभाषणातून दोघांमध्ये इतकी जवळीक निर्माण झाली की, तिने संगमनेरच्या ‘हनी’ प्रमाणे प्रेम देणारी दुसरी ‘हनी’ आपल्याकडे असल्याचे सांगत तिसर्‍याचा मोबाईल नंबर दिला. उतावळ्या नवर्‍याप्रमाणे तक्रारदारानेही लागलीच त्यावर कॉल केला असता समोरुन कोणीतरी पुरुष बोलत असल्याचे मात्र त्याने संदर्भ ओळखून विरगाव रस्त्यावरील खडीक्रशरवर येण्याचे निमंत्रण दिले.


त्याचा स्वीकार करुन गडी तडक अकोल्यातून विरगावच्या दिशेने रवाना झाला आणि तासाभरातच ‘त्या’ क्रशरवर पोहोचला. तेथे आधीपासूनच एकजण हजर होता, फोनवरच्या संदर्भानुसार ओळख झाल्यानंतर ‘त्या’ इसमाने त्याला बाजूच्याच एका खोलीत नेले व दार बाहेरुन लोटून घेतले. त्यावेळी आतील बाजूला एक महिला होती. तक्रारदाराचा कार्यभाग उरकल्यानंतर त्याने त्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बंद असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने आरडाओरड केल्यानंतर बाहेरील एका इसमाने खोलीचे दार उघडले.


त्यावेळी खोलीबाहेर अन्य एका महिलेसह काही पुरुषही होते. त्यातील एकाने पुढे होवून ‘सदरील महिला माझी पत्नी आहे, तु तिच्यासोबत इथे काय करीत आहेस?’ असा प्रश्‍न करुन त्याचे मोबाईलमध्ये चित्रण सुरु करण्यासह तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर खोलीतल्या महिलेनेच ‘हे सगळं मिटवायचं असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करते..’ असा दम भरीत या संपूर्ण प्रकरणावरील पडदा बाजूला सारला. त्यावरुन आपण पूर्णतः फसल्याची जाणीव झालेल्या तक्रारदाराने लगेच आपल्याकडे इतके पैसे नाहीत. मात्र रोख सात हजार आणि बँकेच्या खात्यावर आठ हजार असे एकूण 15 हजार असल्याचे सांगत त्याने ती रक्कमही त्यांना सुपूर्द केली व तेथून आपली तात्पूरती सुटका करुन घेतली.


पैसे देवून आपण सुटलो की फसलो याचा विचार मनात घोळत असताना ‘त्या’ महिलेने दुसर्‍याच दिवशी (ता.20) मोबाईलद्वारे फोन करुन राहिलेल्या रकमेची मागणी केली अन्यथा पोलीस तक्रार करण्याची पुन्हा धमकी भरली. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने तसे न करण्याची विनंती करीत तिच्या सांगण्यावरुन पुन्हा अगस्ती मंदिराजवळ जावून तिला रोख 45 हजार रुपये दिले. त्यावेळी तक्रारदाराने तिचे नाव विचारले असता या प्रकरणातील तिसर्‍या हनीची ओळख समोर आली. या व्यवहारानंतर दुसर्‍याच दिवशी पुन्हा दहा हजार आणि 27 ऑगस्टरोजी पुन्हा 14 हजार असे एकूण 24 हजार रुपये तिला पाठवले. त्यानंतर 29 ऑगस्टरोजी पुन्हा तिने फोन करुन राहिलेल्या पैशांची मागणी केली.


रोजच्या या प्रकाराला वैतागलेल्या त्या सामान्य तक्रारदाराने अखेर पोलिसांची मदत घेण्याचे ठरवून अकोल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची भेट घेवून घडला प्रकार सांगितला. त्यांनीही त्याला धिर देत कारवाईचे आश्‍वासन दिले आणि विशिष्ट निशाणी केलेल्या पाचशे रुपयांच्या बारा नोटा असे एकूण सहा हजार रुपये देवून सुगाव फाट्यावरील महात्मा फुले चौकात सापळा लावला. सायंकाळी ठरलेल्यावेळी संगमनेरच्या दिशेने आलेल्या एका रिक्षातून ‘ती’ हनी एका जोडीदारासह उतरली आणि थेट तक्रारदाराच्या समोर जावून उभी राहीली. यावेळी त्यानेही खिशात ठेवलेले ‘ते’ सहा हजार रुपये काढून तिच्या हातात ठेवताच आसपास दबा धरुन बसलेल्या अकोले पोलिसांनी धावा करीत त्या हनीला तिच्या जोडीदारासह रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिच्यासह अन्य दोघी व त्यांच्या जोडीदारांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या सर्वांना चौकशीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या घटनेने संगमनेर-अकोले तालुक्यात अलिकडच्या काळात फोफावलेल्या या उद्योगाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


संगमनेर-अकोले तालुक्याला अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. मात्र या प्रकरणात दोन्ही तालुक्यातील तिघींनी मिळून सावज हेरुन त्याला अडकवले आणि मारहाण करीत त्याचा व्हिडिओ तयार करुन त्या आधारवर तक्रारदाराची फसवणूक केली गेली आहे. संबंधित टोळीकडून अशाप्रकारचे आणखी अनेक प्रकार घडले असल्याची चर्चा सध्या सुरु असून अकोले पोलिसांनी केवळ या प्रकरणापर्यंतच तपासाची व्याप्ती न ठेवता त्याच्या मूळाशी जावून सखोल तपास करण्याची गरज आहे, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Visits: 277 Today: 5 Total: 1114504

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *