संगमनेरच्या सार्वजनिक बांधकामकडून असंवेदनशीलतेचा कळस! रस्तादुरुस्तीकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष; शेकडों पालकांचा जीव टांगणीला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अगदी संगमनेरच्या लोकनियुक्त प्रतिनिधींनाही त्राही करायला लावणार्‍या संगमनेरच्या बांधकाम विभागातील ‘त्या’ उपअभियंत्याचा आणखी एक प्रताप आता चर्चेत आला आहे. शहरातून जाणार्‍या महामार्गाची मनाला वाटेल त्याप्रमाणे मलमपट्टी करणार्‍या या महाशयांनी कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील मालपाणी विद्यालयावर मात्र काटाच पकडला आहे. संगमनेर शहरातील हजारों विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणार्‍या या अतिशय प्रतिष्ठीत विद्यालयासमोरच प्रचंड खड्डे आणि त्यात साचणार्‍या चिखलामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ आणि विद्यार्थ्यांचा वावर यामुळे सतत अपघाताची भीती असते. मध्यंतरी याबाबत एका पत्रकाराने या मुजोर अधिकार्‍याशी संवाद साधला, त्यावेळी त्याने ‘त्या भागातील रहिवाशी रस्त्यावर खूप पाणी सोडतात..’ असे बेताल उत्तर दिले होते. या अधिकार्‍याच्या मनमौजी कारभारामुळे शहराच्या विकासालाही खीळ बसली असून त्याच्या येथील कारकीर्दीची चौकशी करुन कारवाई होण्याची गरज आहे. वारंवार आर्जवे केल्यानंतरही प्रचंड वर्दळीच्या अकोले नाक्यावरील या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने त्यामागील हेतूबाबतही शंका निर्माण झाली असून कोणाच्या सांगण्यावरुन हे महाशय शहर विकासात खोडा घालीत आहेत असाही प्रश्‍न आता विचारला जावू लागला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले उपअभियंता श्याम मिसाळ जाणीवपूर्वक शहरातील कामे खोळंबून ठेवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत खूद्द संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना थेट सभागृहात आवाज उठवावा लागला. मात्र त्यानंतरही या अधिकार्‍याच्या वागणुकीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यावरुन संगमनेरातील विकास कामांमध्ये हा अधिकारी जाणीवपूर्वक खोडा घालीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय आता समोर येवू लागला असून आमदार खताळ यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर आता या अधिकार्‍याचे एकामागून एक प्रताप समोर यायला सुरुवात झाली आहे.


गेल्या प्रदीर्घकाळापासून धूळखात पडून असलेली सिग्नल व्यवस्था पुन्हा कार्यान्वीत होवून जवळपास पंधरवडा उलटला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्क्रिय उपअभियंत्याला अद्याप वाहनांना थांबण्यासाठीची पांढरी रेषा आणि झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारायला सवड मिळालेली नाही. त्यामुळे हॉटेल काश्मिरसमोरचा अपवाद वगळता उर्वरीत दोन्ही ठिकाणच्या सिग्नल व्यवस्थेचा खेळ सुरु असून बाहेरगावाहून येणार्‍या प्रवाशांच्या मुखी संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेचे हसू होत आहे. त्यामागे या महाशयाची जाणीवपूर्वक दिरंगाई कारणीभूत आहे. विशेष म्हणजे सदरचे पट्टे मारुन देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर पालिका आणि पोलीस विभागाने पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्यालाही या अधिकार्‍याने केराची टोपली दाखवली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह संरक्षक भिंतीचा दक्षिणेकडील भाग वाहनांना वळण घेण्यासाठी त्रासदायक ठरत असल्याने पोलिसांच्या सूचनेवरुन पालिकेने सदरचे बांधकाम पाडून नव्याने वळणदार संरक्षक भीत बांधून दिली. या कोपर्‍यावर जूने पिंपळाचे झाड असल्याने त्याचे पुनर्रोपण करण्याचे ठरले. त्यानंतर पालिकेने वारंवार स्मरण देवूनही या महाशयांनी महिना उलटूनही यंत्रसामग्री अथवा त्याची पूर्तता करुन घेण्याच्या सूचनाच न दिल्याने संरक्षक भींत पाडूनही वाहनचालकांना होत असलेला त्रास कायम आहे. त्यामागेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्याम मिसाळ यांचाच सिंहाचा वाटा आहे.


असाच प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून अकोले रस्त्यावरील माळीवाडा मारुती मंदिर ते जाजू पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावर दिसून येतो. हा रस्ता कोल्हार-घोटी राज्यमार्गाचा भाग असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मध्यंतरी या महामार्गाचे दोन्ही बाजूने नूतनीकरणही झाले, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टीही करण्यात आली. मात्र या परिसरातील रस्त्याचे काम जाणीवपूर्वक टाळण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यात हरवलेल्या या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असून सर्वाधीक फटका या रस्त्यावर असलेल्या शहरातील अतिशय प्रतिष्ठेच्या मालपाणी विद्यालयाला बसला आहे.


या विद्यालयात शहर व परिसरातील हजारों विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. शिक्षणाच्या दर्जाचा लौकीक असल्याने मालपाणी विद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थी आसपासची उपनगरं, गावं अथवा वाड्या-वस्त्यांवरुन विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या खासगी तीनचाकी व चारचाकी वाहनांनी अथवा पालकांच्या दुचाकीने शाळेत येतात. आसपासचे बहुतेक विद्यार्थी पायी अथवा सायकल घेवून येतात. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्हीस्तरावर चालणार्‍या या विद्यालयाच्या परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यातच शाळेच्या अगदीच समोर आर्युविमा महामंडळाचे मुख्य कार्यालय आणि त्यालगत कासट संकुलाची इमारत असल्याने तेथे येणार्‍यांचाही मोठा भरणा असतो.


पश्‍चिमेकडील शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या अकोलेनाक्याच्या परिसरात जाजू पेट्रोल पंपामुळेही मोठी वर्दळ वाढली आहे. अशावेळी शाळा सुटल्यानंतर घराच्या ओढीने प्रवेशद्वाराबाहेर पडणारी छोटी-मोठी मुलं आणि त्याचवेळी रस्त्यावरील असंख्य खड्डे, त्यात सध्या साचलेला चिखल आणि पाणी चुकवण्याच्या नादातील वाहनधारक, बाहेर विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांसह पालकांची गर्दी अशा सगळ्या स्थितीत दररोज या भागात अपघाती वातावरण तयार होते. त्याला कारण फक्त एकच रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांची मालिका. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक नसलेले शहर उपअभियंता श्याम मिसाळ आपल्याच मस्तीत गुल असल्याने मालपाणी विद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून दररोज हजारों पालकांचा जीवही टांगणीला लागत आहे. अशा या मुजोर आणि विकासाला खीळ घालणार्‍या अधिकार्‍याची चौकशी होवून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणीही आता वाढत आहे.


संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या श्याम मिसाळ या उपअभियंत्याच्या निष्क्रियतेमुळे संगमनेरच्या वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ होत आहे. पालिकेकडून तीन ठिकाणी सिग्नल सुरु करुन पंधरवडा तर विश्रामगृहाच्या दक्षिणेकडील वळणाची भींत पाडून महिना उलटला आहे, मात्र या अधिकार्‍याने पुढे काहीच हालचाल केली नाही. आता तसाच आणखी एक प्रकार समोर आला असून हजारों विद्यार्थी शिकत असलेल्या प्रतिष्ठीत विद्यालयासमोरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जाणीवपूर्वक रखडण्यात आले आहे. त्यामुळे प्रचंड वर्दळीच्या या रस्त्यावरील खड्ड्यांच्या अखंड श्रृंखलेमुळे वारंवार अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. एका उपअभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे इतकं सगळं घडत असताना आता शाळेसमोरील रस्ता रखडवण्याचे अक्षम्य प्रकरण समोर आल्याने या विभागाचा असंवेदनशीलपणा ठळक समोर आला आहे.

Visits: 270 Today: 2 Total: 1110849

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *