संगमनेरकर रुग्णांच्या मदतीसाठी कोविड योद्धाच पुढे सरसावला! कर्तव्यासह दररोज शंभर अंड्यांचा पुरवठा तर कॉटेजसाठी दिल्या पाच नवीन खाटा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालणार्या कोविडच्या प्रादुर्भावाने अनेक ठिकाणी मानवातील दानवाचे, तर अनेक ठिकाणी त्याच्यातील देवाचेही दर्शन घडविले आहे. संगमनेरातही मानवी शरीरातील या दोन्ही प्रवृत्तींचे पदोपदी दर्शन घडत आहे. कोणी आरोग्यविषयक साहित्य देतोय, तर कोणी रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करतोय. सामाजिक कणव असलेल्या अशाच चमूत आता संगमनेर बुद्रुक सज्जाचे तलाठी पोमल तोरणे यांचाही ठळक सहभाग समोर आला आहे. कोविडच्या युद्धात गेल्या वर्षभरापासून लढणार्या आणि जायबंदी होवूनही पुन्हा कोविड विरोधात शड्डू ठोकणार्या तोरणे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचाराधीन रुग्णांना लवकर स्वास्थ लाभावे यासाठी तेथे दररोज शंभर उकडलेली अंडी देण्यासह आता संगमनेर नगरपालिकेच्या कोविड केअर हेल्थ सेंटरसाठी पाच नवीन खाटा खरेदी करुन दिल्या आहेत. त्यांच्या दातृत्त्वाला संगमनेरच्या स्थानिक प्रशासनानेही सलाम ठोकला असून प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

संगमनेरच्या पाटील चावडीची धुरा सांभाळणारे पोमल तोरणे म्हणजे ‘मूर्ती लहान, मात्र किती महान’ या सूत्रातले व्यक्तिमत्त्व. गेल्या वर्षभरापासून संगमनेरातील कोविड संक्रमणात बाधित झालेल्या रुग्णांचा व त्यांच्या संपर्काचा शोध घेवून त्यांना विलगीकरण कक्षापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ते सांभाळीत आहेत. या दरम्यान गेल्या संक्रमणातच कोविडने त्यांनाही ग्रासले. विशेष म्हणजे कोविडची लागण झाल्यानंतर बहुतेक सुखसंपन्न व्यक्ती खासगी आणि अलिशान रुग्णालयातच उपचार घेणं पसंद करतात. पोमल तोरणे मात्र त्याला अपवाद ठरले. स्वतःची मोठी ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असतानाही या कोविड योद्ध्याने त्याचा वापर न करता घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले, आणि ठणठणीत होताच पुन्हा कोविड विरोधात शड्डू ठाकले.

उपचार घेत असताना संगमनेरातील दानशूरांनी मदतीचा हात देत ग्रामीण रुग्णालयात ‘कोविड हेल्थ सेंटर’ उभे केल्याचे आणि त्यातून अनेक गरजू व गरीब रुग्णांचे उपचार होत असल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले आणि त्यांच्या मनातील सामाजिक कणव जागली. कोविडचा पराभव करुन ते पुन्हा कर्तव्यासाठी सज्ज होताच त्यांनी सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना लवकरात लवकर स्वास्थ लाभावे यासाठी तेव्हापासूनच दररोज गावठी कोंबड्यांची शंभर उकडलेली अंडी येथे देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ती आजतागायत सुरुच आहेत. यासोबतच तालुक्यातील काही ठिकाणच्या शासकीय संस्थात्मक विलगीकरण केंद्रांनाही त्यांना गरजेनुसार मदतीचा हात देवून आपल्यातील दातृत्त्व सिद्ध केले आहे.

स्वतः दिवसरात्र कोविड रुग्णांच्या मागे धावणार्या या योद्ध्याने संक्रमणाचा वेग आणि बाधित रुग्णांची ऑक्सिजन खाट मिळवण्यासाठीची धडपड पाहून आणखी काहीतरी करावा असा विचार केला आणि त्यांच्या विचाराला लायन्स क्लबच्या डॉ.सूचित गांधी यांच्या सल्ल्याची किनार लाभली. त्यातून शहरी रुग्णांसाठी पालिकेच्या कॉटेज रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरसाठी त्यांनी पाच नवीन वैद्यकीय खाटा खरेदी करुन दिल्या. त्यांचे हे दातृत्त्व पाहून संगमनेरच्या प्रशासनातील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, कॉटेज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.साबळे व डॉ.बांंबळे यांनाही कौतुक वाटले. रविवारी सायंकाळी या पाचही खाटा कॉटेज रुग्णालयाच्या सुपूर्द करण्यात आल्या.

गेल्या वर्षभरापासून कोविड विरोधातील लढाईत सहभागी झालेला, लढता लढता जायबंदी झालेला आणि उपचार घेवून पुन्हा मैदानात उतरलेला पोमल तोरणे यांचा लढवय्या बाणा आणि सोबतीला दातृत्त्व अत्यंत प्रेरणादायी आहे. सहकार्यांच्या अशा समर्पित भूमिकेतून प्रचंड तणावातही लढण्याची प्रेरणा मिळते. तोरणे यांनी वर्षभर कोविड विरोधात मोठे काम केले आहे, त्याउपरांतही त्यांनी समाजासाठी केलेले प्रयत्न आजच्या स्थितीत खूप सुखावह आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे शहरातून कौतुक होत असून अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष फोन करुन त्यांचे आभारही मानले आहेत.

गेल्यावर्षी जूनमध्ये पहिल्या संक्रमणाच्या वेळी संगमनेर नगरपालिकेने कॉटेज रुग्णालयात 26 खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू केला होता. यावर्षी फेब्रुवारीत उसळलेल्या दुसर्या संक्रमणात मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने पालिकेने 26 खाटांची क्षमता 40 वर आणि आता थेट 70 खाटांवर नेली आहे. त्यासोबतच 12 खाटांना ऑक्सिजनचीही सुविधा देण्यात आल्याने पालिकेच्या कोविड केअर सेंटरचे रुपांतर आता कोविड हेल्थ सेंटरमध्ये झाले आहे. संक्रमणाचा वेग आणि रुग्णांची धावपळ बघता शहरातील दानशूरांनी आणखी मदत केल्यास सध्याच्या बारा ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवता येणे शक्य आहे. पोमल तोरणे यांनी त्यासाठीचा मार्गही दाखवला आहे.

