कांदा बियाण्यात फसवणूक; चौकशीची क्रांतीसेनेची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
कांदा बियाण्यात शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. याची राज्य सरकारने गंभीरतेने दखल घेऊन बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवालाची चौकशी करावी. अन्यथा राहुरी कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कांदा पिकाची लागवड करण्यासाठी राहुरी तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बियाणे खरेदी केले होते. परंतु, लाल कांद्याऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या. याबाबत संबंधितांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यामुळे बियाणे तक्रार निवारण समितीने संबंधित अहवालाची तत्काळ चौकशी करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर क्रांतीसेना पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे आदिंनी दिला आहे.