‘दंडकारण्य अभियान’ ही वृक्ष संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली ः थोरात वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर सोळाव्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर व परिसर हे अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने येथे कायम कमी पाऊस पडतो. सततचा दुष्काळ व ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 16 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानामुळे राज्यासह तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. आगामी काळात हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न असून लाखो वृक्षांचे रोपण व संवर्धनासाठीची ही मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

अमृत उद्योग समूह व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव पान येथील पद्मावती डोंगरावर सोळाव्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, माधव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, लक्ष्मण कुटे, संतोष हासे, रामहरी कातोरे, बेबी थोरात, प्रा. बाबा खरात, समन्वयक बाळासाहेब उंबरकर, हौशीराम सोनवणे यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ व ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ ऑक्सिजन मिळावा याकरिता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून सोळा वर्षांपूर्वी हे अभियान सुरु केले. यामध्ये तालुक्यातील महिला, पुरुष, बालगोपाल या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि म्हणून खर्‍या अर्थाने ही लोकचळवळ ठरली. संगमनेरमधून सुरू झालेली वृक्षसंवर्धन संस्कृती राज्याला दिशादर्शक ठरली आहे. कोरोना संकटामध्ये सर्वांना प्राणवायूचे महत्त्व कळाले. यापुढील काळामध्ये वृक्ष संवर्धन व रोपण हे अत्यंत गरजेचे असून एका व्यक्तीने दरवर्षी किमान तीन रोपे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

वृक्ष संवर्धन ही आता प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण कोरोना संकटात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला यातून अनेकांना प्राण गमवावे लागले. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आणि भविष्यातील पिढ्या सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे गरजेचे असल्याचे आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले. यावेळी भाऊसाहेब कुटे, मधुकर गुंजाळ, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, अजय फटांगरे, पद्मा थोरात, बाळासाहेब गायकवाड, प्रा. भाऊसाहेब शिंदे, सुनीता अभंग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.

Visits: 132 Today: 4 Total: 1100492

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *