महाविकास आघाडीकडून न्यायालयात बाजू मांडताना हलगर्जीपणा ः विखे

महाविकास आघाडीकडून न्यायालयात बाजू मांडताना हलगर्जीपणा ः विखे
मराठा आरक्षण; मराठा क्रांती मोर्चाला लढाई सुरूच ठेवण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, राहाता
‘मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय भाजपला मिळू नये, यासाठीच सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना हलगर्जीपणा केला. त्यामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाली,’ असा थेट आरोप माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. ‘आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चाने आपली रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवावी, परंतु न्यायालयीन लढाईसाठीही जोरदार तयारी करावी,’ असे आवाहनही विखे यांनी केले आहे.


मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती आणि त्यावरून सुरू झालेली आंदोलने यावर मत व्यक्त करताना विखे यांनी सध्याच्या राज्य सरकारवर आरोप केला आहे. विखे म्हणाले, ‘यापूर्वीच्या भाजप सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते. आरक्षणाला मिळालेली स्थगिती पाहता महाविकास आघाडी सरकार आरक्षण टिकविण्यात संपूर्णतः अपयशी ठरले आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांची आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट नाही. श्रेयवादाच्या कारणानेच आरक्षणाच्या बाबतीत न्यायलयात ठामपणे भूमिका मांडण्यात आली नाही. आरक्षणाच्या संदर्भात भाजप सरकारने केलेल्या प्रयत्नाना कुठेतरी गालबोट लावण्यासाठीच आघाडी सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यात हलगर्जीपणा केला.’


विखे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये नसलेला समन्वयच कारणीभूत ठरला आहे. सरकारने आता फक्त बैठकांचा फार्स निर्माण करून श्रेयवादासाठी वेळकाढू धोरण अवलंबले आहे. आरक्षणाच्या हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चाने न्यायालयीन लढाईची जोरदार तयारी करावी, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आपली तयारी आहे. सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चाने आपली रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवावी. परंतु न्यायालयीन लढाईकरीता सक्षमपणे बाजू मांडू शकतील आशी वकीलांची टीम उभी करण्याचीही गरज आहे. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांशी आपण चर्चा करणार आहोत. न्यायालयीन लढाईसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यास तयार आपण तयार आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *