तृतीयपंथीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण श्रीरामपूर येथून प्रशिक्षणाची सुरुवात; राज्यातील पहिलाच उपक्रम
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर येथील समाज कल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामपूर येथून करण्यात आली आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या अहमदनगर येथील सहायक आयुक्त कार्यालयाच्यावतीने जनशिक्षण संस्थानच्या सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येथील तृतीयपंथीय समाज आश्रमात 23 जुलैपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूरजहाँ शेख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे दिग्विजय जामदार, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, तलाठी राजेश घोरपडे, जनशिक्षण संस्थानाचे संचालक बाळासाहेब पवार, डॉ. एम. डी. गोसावी, पिंकी शेख, दिशा शेख आदी उपस्थित होते.
यावेळी देवढे म्हणाले, की तृतीयपंथीय व्यक्तींसाठी तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने http://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. तेथे नोंदणी केल्यानंतर तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते. राज्य सरकारनेही तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजना व उपक्रमांचा लाभ देण्यात येतो, असे देवढे यांनी सांगितले.
समाज कल्याण विभागाकडे तृतीयपंथीयांना उद्योजक बनविता येईल, असे प्रशिक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानुसार समाज कल्याण, जिल्हा कौशल्य विकास विभाग व जनशिक्षण संस्थानाच्यावतीने शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित केले. यातून नक्कीच तृतीयपंथी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करू शकतील. समाज कल्याण विभागानेही त्यांना लागणार्या सुविधा मिळवून देण्यासाठीही पुढाकार घ्यावा.
– दिशा शेख, सामाजिक कार्यकर्त्या
तृतीयपंथीयांची जिल्हास्तरीय समिती आहे. या समितीच्या बैठकीत श्रीरामपूरच्या सदस्यांनी शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वयंनिर्भर होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.
– राधाकिसन देवढे (सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग)