हिवरगाव पठार येथे वृद्ध शेतकरी महिलेस मारहाण! मुलांनाही जीवे मारण्याची धमकी; घारगाव पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथे शेतीचा बांध फोडू नका असे म्हटल्याचा राग आल्याने वृद्ध शेतकरी महिलेस केबलने मारहाण केली. सदर घटना रविवारी (ता.11) संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंदाबाई भाऊसाहेब वनवे (वय 65) ही वृद्ध शेतकरी महिला त्यांच्या सामायिक बांधावर गेल्या असता त्याचवेळी रभाजी महादू वनवे हा बांध फोडत होता. त्यावेळी शेतकरी महिला रभाजी वनवे यास म्हणाली की, बांध फोडू नका. याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करून हातातील केबलने वृद्धेच्या डाव्या हाताच्या दंडावर व बरगडीवर मारले.
त्यानंतर सीताराम रभाजी वनवे व किसन रभाजी वनवे हे हातात काठ्या घेऊन आले आणि शिवीगाळ केली. हे भांडण सोडविण्यास महिला शेतकर्याची मुले किरण व संतोष हे आले असता त्यांना देखील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच किरण यासही केबलने पाठीवर मारले. या प्रकरणी मंदाबाई भाऊसाहेब वनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी रभाजी महादू वनवे, सीताराम रभाजी वनवे व किसन रभाजी वनवे या तिघांविरोधात गुरनं.170/2021 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करत आहे.