निवेदन देणार्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तिंचाही ‘तीनबत्ती’ हल्ल्यात सहभाग! संगमनेर पोलिसांनी पस्तीस संशयीतांची ओळख पटविली; तूर्त अटक मात्र टळली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या गुरुवारी शहरातील तीनबत्ती चौकात पोलीस जवानांवर जमावाने हल्ला करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडून सामान्यांमध्ये संतापही उसळला होता. अनेक संस्था व संघटनांनी पोलीस अधिकार्यांना निवेदने देवून या घटनेला जबाबदार असलेल्यांची गय करु नये अशी अपेक्षाही वर्तविली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात ‘धरपकड’ होईल अशी स्थिती निर्माण झाल्याने मुस्लिम समाजातील काही पदाधिकार्यांनी शनिवारी पोलिसांना निवेदन देत ‘निर्दोष’ व्यक्तिंवर अटकेची कारवाई न करण्याची मागणी केली होती. मात्र दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार निवेदन देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या या पदाधिकार्यांमधील काहीजणांच्या कुटुंबातील सदस्यही या हल्ल्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत निष्पन्न केलेल्या 35 जणांमध्ये त्यांच्या नावाचाही समावेश असल्याने ‘त्या’ पदाधिकार्यांचे निवेदन नेमके समाजातील ‘निर्दोष’ व्यक्तिंना वाचवण्यासाठी की आपल्याच घरातील व्यक्तिंना असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील गुरुवारी (ता.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोगलपूरा परिसरात जमलेली गर्दी हटवित असतांना जमावाने अहमदनगर येथून बंदोबस्तासाठी आलेल्या स्टाईकिंग फोर्सच्या जवानांवरच हल्ला चढवला होता. यावेळी जमावाने पोलीस वाहनांवर तुफान दगडफेक करीत दहशतही माजवली होती. जमावाच्या धक्काबुक्कीत व मारहाणीत पोलीस दलाचे तीन जवानही जखमी झाले होते. याबाबतचे व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या. कोविडचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणार्यांवरच हल्ला झाल्याने हल्लेखारांची ओळख पटवून त्यांना गजाआड करण्यासाठी सामाजिक दबावही वाढला. त्यातूनच पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात धरपकड होईल अशी शक्यताही निर्माण झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी मुस्लिम समाजातील शौकत जहागीरदार, शरीफ शेख, नूरमोहंमद शेख, वसीम शेख, बादशहा कुरैशी, लाला बेपारी, गफार शेख, मुस्ताक पठाण, रिजवान शेख, लियाकत रंगरेज, मुजीब शेख, अब्दुल खान व इब्राहिम देशमुख या पदाधिकार्यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ‘तीनबत्ती’ हल्ल्याचा मुस्लिम समाजाकडून निषेधही नोंदविला, त्यासोबतच या हल्ल्याला दोषी असलेल्यांशिवाय अन्य कोणाही निर्दोष व्यक्तिवर कारवाई होवू नये अशी रास्त अपेक्षा वर्तविली गेली. या मागणीला आमचाही पाठींबा आहे, ज्यांचा या प्रकरणात हात नसेल अथवा सहभाग नसेल त्यांना कोणताही त्रास होवू नये ही भूमिका एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही हल्ल्याच्या दिवसापासून घेतली आहे.
आजवर पोलिसांना प्राप्त झालेल्या अनेक व्हिडिओमधून पोलिसांनी 35 पेक्षा अधिक जणांची ओळख पटविली आहे. त्यासाठी प्राप्त झालेल्या सर्व व्हिडिओंचा बारकाईने अभ्यास केला गेला आहे, अजूनही तो सुरुच असून संशयितांच्या संख्येत वाढ होणार हे देखील निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर वरील पदाधिकार्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेवून त्यांच्याकडे केलेली मागणी योग्यच आहे, मात्र निवेदन देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या काही जणांच्या कुटुंबातील तरुणांचाही या हल्ल्यात सहभाग होता हे अगदी स्पष्टपणे पोलिसांच्या समोर आले आहे. त्यामुळे समाजाचा आधार घेवून काहीजण आरोपींना लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.
घटनेनंतरच्या गेल्या चार दिवसांत पोलिसांच्या हाती केवळ चौघे सापडले असून रविवारी त्या चौघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे आज-उद्यात त्यांचा जामीनही मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या शुक्रवारी रमजान ईद व अक्षय्य तृतीयाचा सण एकाच दिवशी आल्याने पोलिसांनीही ‘सबुरी’ने घेतले असून तोपर्यंत धरपकड लांबण्याची शक्यता आहे. मात्र आत्तापर्यंत पोलिसांनी निष्पन्न केलेल्या 35 आरोपींची अटक अटळ असल्याचेही पोलीस अधिकारी खासगीत सांगत आहेत. ती टाळण्यासाठीच आता काहीजण समाजाची झालर घेवून मिरवित असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. या निवेदनाचा पोलिसांवर काय परिणाम होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
मोगलपूरा ते तीनबत्ती चौक या जवळपास 500 मीटर परिसरात सुमारे तासभर चाललेल्या या हल्ल्यावेळी परिसरात मोठा जमाव होता. यावेळी या पदाधिकार्यांनी जमावाकडे धाव घेतली असती तर घडलेला अनर्थ टाळता आला असता. मात्र घटना घडून गेल्यानंतर आता गैरसमजातून प्रकार घडला, निर्दोषांवर कारवाई नको, अल्पवयीन मुले आहेत वगैरे म्हणून हा प्रकार पाठीशी घालण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत. ज्यांचा या हल्ल्याशी संबंध नाही त्यांना अजिबात तोशीस देवू नये, मात्र जे सहभागी होते त्यांना सोडूही नये या भूमिकेशी संगमनेरकरही पूर्णतः सहमत असल्याने पोलिसांनी एकाही दोषीला सोडू नये अशी मागणी आजही होत आहे.