हरिश्चंद्रगडावरील ‘विठ्ठल-रुक्मिणी’च्या पाषण मूर्तींची चोरी! पुरातन शिल्पांच्या यादीत मूर्तींची नोंद नसल्याचे सांगत पुरातत्त्व खात्याने हात झटकले

नायक वृत्तसेवा, अकोले
प्रगल्भ इतिहास असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि गडकोटांनी संपन्न असलेले ठिकाण. शिखरस्वामिनी कळसूबाईसह विविध किल्ले, मुळा, प्रवरा सारख्या जीवनदायी नद्या आणि रामायणातील काही घटनांशी थेट संलग्न असल्याने अकोले तालुक्याला पौराणिक महत्त्वही प्राप्त आहे. याच श्रेणीतला हरिश्चंद्रगड म्हणजे लंकाकांडातील द्रोणागिरी पर्वताशी जोडलेला. अतिशय पुरातन मंदिर, रेखीव शिल्प आणि प्रचंड इतिहास असलेल्या या गडावर मात्र आता विकृतांची वक्रदृष्टी पडली आहे. त्यातूनच गडावरील मुख्य मंदिरालगतच्या छोट्या गुहेतील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती चक्क चोरुन नेण्यात आल्या आहेत. या प्रकाराला आठ दिवसांहून अधिक काळ लोटूनही केवळ फलकांपुरत्या मर्यादित असलेल्या पुरातत्त्व विभागाला त्याचे गांभीर्य समजलेले नाही. त्याचा परिणाम या गडावर श्रद्धा असलेल्या हजारो आदिवासी बांधवांचा संताप आता अनावर झाला आहे.

चांगदेवांच्या तपश्चर्येने पुलकित झालेल्या हरिश्चंद्रगडाला मोठा पौराणिक वारसा लाभला आहे. रामायणातील लंकाकांडात जेव्हा रावणपुत्र मेघनाथाच्या बाणांनी मूर्च्छित झालेल्या राम-लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी पवनपुत्र हनुमानाने थेट द्रोणगिरी पर्वत उचलून नेला त्यातील एक भाग खाली पडून त्यातून या गडाची निर्मिती झाल्याचे दाखले पुराणात आढळतात. संत चांगदेवांनी याच गडावर दोनशे वर्ष तपश्चर्या केली व पुढे याच गडावर तत्त्वसार नावाच्या ग्रंथाची निर्मिती केल्याचेही दाखले आढळतात व त्या संदर्भातील काही प्राचीन शिलालेख आजही त्याची साक्ष देतात. इतिहासात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासातही या गडाचा वारंवार उल्लेख असल्याचे आढळते. औषधी वनस्पतींचे आगार असलेला हा गड आजही औषधी संशोधक आणि भटक्यांसाठी पूजनीय असाच आहे.

या गडावर यादवकालीन हरिश्चंद्रेश्वराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरालगतच काही गुंफा असून त्यातील एका गुहेत विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती असलेले एक छोटेखानी मंदिर आहे. महाशिवरात्री आणि महिन्यातील प्रत्येक एकादशीला पाचनई आणि कोथळे या पायथ्याच्या दोन्ही गावातील शेकडो आदिवासी बांधव गडावर मोठा उत्सव करुन याच मंदिरात संकीर्तनाचे कार्यक्रम करतात आणि या परिसरातील निसर्ग धनसंपदा अबाधित ठेवण्याचे साकडे घालतात. मात्र कोण्या भामट्यांनी आदिवासीं बांधवांच्या श्रद्धेवरच घाला घातला असून या गुहेमध्ये विराजमान पांडुरंग-रुखुमाईची पाषाणातील कोरीव मूर्तीच चोरुन नेली आहे.

हा प्रकार गावकर्यांच्या लक्षात येताच त्यांनी कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारन्याचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे व वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळ यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यासोबतच ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी गत असलेल्या नगरच्या पुरातत्त्व खात्यालाही या चोरीची माहिती दिली गेली. या घटनेला आठ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, मात्र केवळ पुरातन वास्तूचे फलक लावून पंख्याखाली झोपा काढणार्या पुरातत्त्व विभागाला अद्यापपर्यंत या घटनेचे गांभीर्यच समजले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चोरीच्या घटनेबाबत राजूर पोलीस ठाणे गाठले असता सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला असता आमच्या यादीत या मूर्तीच नसल्याचे सांगून त्यांनी चक्क जबाबदारीच झटकून टाकली आहे. त्याचा परिपाक या गडाच्या प्रत्येक दगडाशी, मातीशी आणि झाडा-वेलींशी सख्य असलेल्या आदिवासींचा संताप अनावर झाला आहे.

पुरातत्त्व विभाग आणि राजूर पोलिसांनी या प्राचीन मूर्तींचा शोध लावून चोरट्यांना गजाआड न केल्यास आदिवासी बांधव आंदोलनाचीही तयारी करीत आहेत. त्यासाठी वनसमितीचे अध्यक्ष चंदर भारमल, गंगाराम घोगरे, कुंडलिक भारमल, माणिक खोडके, भास्कर बादड, किसन खोडके व गडावरील व्यावसायिकांनी बैठक घेवून आंदोलनाची दिशाही निश्चित केली आहे. पोलिसांनी या चोरीचा गुन्हा नोंद करुन तात्काळ तपास करण्याची गरजही या बैठकीतून व्यक्त करण्यात आली आहे.

गडावरील ‘विठ्ठल-रुक्मिणी’ यांच्या मूर्ती चोरीस गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला होता. मात्र त्यांनी या मूर्ती गडावरील प्राचीन शिल्पांच्या यादीत नसल्याचे सांगत काही वर्षांपूर्वी अनाधिकाराने गडावरील मंदिरात वास्तव्यास असलेल्या एका साधूने त्या स्थापन केल्याचे सांगितले. तसेच त्यावेळी या साधूंची माहिती मिळताच त्याला गडावरुन हुसकावून दिल्याचेही सांगितले. याबाबत राजूर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
– नितीन पाटील
सहाय्यक निरीक्षक – राजूर पोलीस ठाणे

