संगमनेर वीज कंपनीच्या अंधाधूंद कारभाराने संताप! वारंवार वीज पुरवठ्यात व्यत्यय; वार्‍याची झुळूकही सहन होईना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागातील खंडित वीजपुरवठ्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक वीज गायब होणे, तासन्तास प्रतीक्षा करुनही पुरवठा खंडित राहणे आणि वीज आलीच तर पुन्हा काही वेळात गायब होणे अशा वाढत्या प्रकारांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकूटीला आला आहे. शेतकरी, विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, नोकरदार आणि घरगुती ग्राहक अशा सर्वच घटकांना या अघोषित वीज कपातीचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे राज्यात अधिकृत भारनियमन सुरु नसल्याचा दावा होत असताना संगमनेरात मात्र भारनियमनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा का खंडित होतो असा प्रश्‍न उपस्थित झाला असून संगमनेरच्या वीज कंपनीचा कामचूकार कारभारच त्याला कारणीभूत असल्याचे आरोप आता होवू लागले आहेत.


राज्यातील यंदाच्या सरासरी पर्जन्यमानात घट झाल्याचे चित्र असले तरी सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणार्‍या नद्यांवरील बहुतांश धरणांची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे राज्यातील जलविद्युत निर्मितीही सुरळीतपणे कार्यक्षमतेप्रमाणे सुरु आहे. त्यातही कोळशावर आधारित वीजनिर्मितीही सुरु असल्याने राज्याच्या अधित्तम मागणीच्या काळात लागणारी 32 हजार मेगावॅटहून अधिक वीज किरकोळ अपवाद वगळता उपलब्ध असल्याचा दावा महावितरण आणि विद्युत पारेषन कंपनीकडून केला जात आहे. याचा सरळ अर्थ सध्याच्या स्थितीत राज्यात कोठेही अधिकृत भारनियमन लादण्याची वेळ आलेली नाही. मात्र असे असतानाही संगमनेरात दिवसभरात वारंवार आणि तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक वीज वितरण कंपनीबाबत संशय निर्माण होवून सामान्य नागरिकांमधील रोषही वाढत आहे.


वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होणे, एखाद्या ठिकाणची लाईन तुटणे किंवा आपत्कालीन दुरुस्तीची गरज भासणे, ही बाब नियमित आहे. मात्र एकाच परिसरात वारंवार बिघाड होणे, दुरुस्तीच्या नावाखाली दीर्घकाळ वीज पुरवठा बंद ठेवणे आणि त्यानंतरही पुन्हा पुन्हा तो खंडित होणे, हा प्रकार कंपनीच्या अकार्यक्षमतेचे द्योतकच आहे. वीज कंपनीने देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली आहेत का? संबंधित वाहिन्या, रोहित्रे आणि वितरण यंत्रणेची वेळोवेळी तपासणी केली जाते का? पावसाळा, वारा अथवा अन्य नैसर्गिक कारणांचा सामना करण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांकडून नियमितपणे वीजबिलाची वसुली करताना त्यांना अपेक्षित वीजपुरवठा देण्याची जबाबदारी कंपनी स्वीकारणार आहे की नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.


संगमनेर म्हणजे जिल्ह्यातील महत्त्वाची आणि अत्यंत गतिमान बाजारपेठ मानली जाते. शहराशी तालुक्यातील तब्बल 40 गावांचा आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहे. त्यामुळे शहरात भरणारा शनिवारचा आठवडी बाजार केवळ खरेदी-विक्रीचा दिवस नसून ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दुर्दैवाने याच दिवशी वीज कंपनीकडून दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवला जातो. वास्तविक बाजारच्या दिवशी व्यापारी, दुकानदार, ग्राहक, छोटे व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि विविध सेवा देणारे घटक मोठ्या प्रमाणात शहरात येतात. अशा दिवशी वीज नसल्याने त्याचा व्यापारावर थेट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, संगणकीय बिलिंग, शीतगृहे, पाणीपुरवठा, आस्थापनांमधील यंत्रसामग्री अशा अनेक गोष्टी वीजेवर अवलंबून आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशीच वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार एकप्रकारे शहराच्या अर्थकारणाला धक्का लावणाराच आहे.


या विषयावरुन यापूर्वीही संगमनेर व्यापारी असोसिएशनसह अनेक व्यापारी आणि आस्थापनांनी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. मात्र ग्राहकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणी सांगून त्यांनी आपल्या अकार्यक्षमतेचेच दर्शन घडवले. एखाद्या व्यवस्थेच्या कामकाजात एखादी त्रूटी राहणे और आहे, मात्र त्या त्रूटीचीच त्यांना सवय होणे हा प्रकार नागरी रोष निर्माण करणारा आहे. संगमनेरातील सध्याची स्थिती अशीच असून वीज आली यापेक्षा ती किती वेळ टिकेल याबाबत त्याच्या पुरवठ्यावरुन अनिश्चितता निर्माण झाली आहे.


शेतकर्‍यांसाठी हा प्रकार अधिक गंभीर असून सिंचनासाठी वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी वेळेचे नियोजन करावे लागते. मात्र वीज कधी मिळेल आणि किती वेळ राहील, याचा कोणताही भरवसा नसल्याने संपूर्ण नियोजन कोलमडत आहे. सध्या बिबट्यांच्या वाढत्या संख्येने आधीच भयग्रस्त असलेल्या बळीराजाला वीजेच्या अनिश्‍चितेमुळे रात्री-अपरात्री रानात जावे लागते. तर, परीक्षा, स्पर्धा परीक्षा, ऑनलाइन अभ्यासक्रम, संगणकावरील कामे आणि अभ्यासाची तयारी करण्यासाठी योग्यवेळी अखंडित वीज मिळण्याची वानवा झाल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.


व्यापारी आणि लघुउद्योजकांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. संगमनेरची बाजारपेठ मोठी असल्याने दुकानांपासून कार्यशाळांपर्यंत आणि कार्यालयांपासून विविध सेवा व्यवसायांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वीजेवर अवलंबून कामकाज चालते. वारंवार वीज खंडित झाल्याने कामकाज थांबते, ग्राहक परत जातात, ऑनलाइन व्यवहारांमध्ये अडथळे येतात आणि काही व्यवसायांमध्ये तयार मालाचे नुकसान होण्याचीही शक्यता असते. मोठ्या उद्योगांकडे जनरेटरसारखे पर्याय असतात, मात्र छोट्या दुकानदारांसाठी प्रत्येक तासाची वीज कपात थेट आर्थिक हानी करणारी ठरत आहे.


सध्या सोशल माध्यमांवरील विविध समूहांमध्ये अनिश्‍चित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरुन नागरी संताप व्यक्त होऊ लागला आहे. अनेक ग्राहक आपल्या परिसरातील वीज खंडित होण्याच्या वेळा, कालावधी आणि वारंवारतेबाबत समूहांमध्ये माहिती शेअर करीत आहेत. तक्रारींचा सूर आता वैयक्तिक राहिला नसून तो सामूहिक असंतोषाकडे वळताना दिसत आहे. विशेष म्हणजे ऐन सणासुदीच्या काळात हा प्रकार वाढल्याने येणार्‍या कालावधीत नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता निर्माण होवू लागली आहे. ऐन आठवडे बाजाराच्या दिवशी देखभालीसाठी दिवसभर वीज पुरवठा खंडित ठेवल्यानंतर वार्‍याची हलकी झुळूकही पुरवठ्यात व्यत्यय निर्माण करीत असल्याने अनेक प्रश्‍न निर्माण होण्यासह वीज कंपनीच्या कारभाराबाबतही संशय निर्माण झाला आहे, तो आता नागरी रोषात परावर्तीत होवू लागला आहे.


संपूर्ण राज्यात कोठेही अधिकृत भारनियमन नसताना संगमनेरात वारंवार तासन्तास वीज का गायब होते?, दुरुस्ती-देखभालीचे नियोजन आठवडी बाजाराच्याच दिवशी का केले जाते?, वार्‍याची साधी झुळूकही सहन न करणारी वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी खर्च झालेले कोट्यवधी रुपये नेमके कुठे गेले?, दर आठवड्याला दिवसभर पुरवठा खंडित करुन नेमकी कोणाची देखभाल केली जाते?, यासर्व अनिश्‍चिततेतून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या होणार्‍या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? असे असंख्य प्रश्‍न आता विचारले जावू लागले असून त्यातून नागरी रोष आकाराला येवू लागला आहे.

Visits: 3 Today: 3 Total: 2054025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *