नामवंत ‘गडाख मशिनरी’ विरोधात ‘कॉपी राईट’चा गुन्हा दाखल! कोहिनूर कंपनीच्या आटाचक्क्या विक्रीचे प्रकरण; नारायणगाव पोलिसांची कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कृषी व गृहपयोगी वापराच्या यंत्रसामग्री क्षेत्रात नामवंत असलेल्या व विक्री केंद्रांची साखळी असलेल्या संगमनेरच्या गडाख मशिनरीजची नारायणगाव शाखा ‘कॉपीराईट’च्या प्रकरणाने चर्चेत आली आहे. या प्रकरणात कोहिनूर आटाचक्कीचे नोंदणीकृत वितरक पराग शहा यांच्या फिर्यादीवरुन नारायणगाव पोलिसांनी 1957 च्या कॉपीराईट कायद्यातंर्गत सुधीर प्रकाश गडाख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या वारुळवाडी (ता.जुन्नर) येथील दालनातून तब्बल 14 लाख 97 हजार 500 रुपयांच्या कोहिनूर आटाचक्क्या जप्त करण्यात आल्या आहेत. कोहिनूर कंपनीचे मानचिन्ह (लोगो) वापरुन या आटाचक्क्यांची विक्री सुरु होती. या कारवाईने व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली असून संगमनेर तालुक्यात ‘गडाख मशिनरीज्’चा दबदबा असतांनाही असा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत नारायणगाव पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या प्रकरणी विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक पराग अशोकुमार शहा (रा.नारायणगाव) यांनी समक्ष तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शहा यांचे नारायणगाव येथे शेती विषयक यंत्रसामग्री व गृहोपयोगी यंत्रांचे मोठे दालन आहे. 2019 साली त्यांनी कोहिनूर आटाचक्की या उत्पादनासंदर्भात संबंधित कंपनीशी करार करुन या उत्पादनाची संपूर्ण विक्री करण्याचा अधिकार प्राप्त केला. त्यामुळे ‘कोहिनूर’ या नावाने विकल्या जाणारी कोणत्याही श्रेणीतील आटाचक्की विकण्याचा अधिकार फक्त त्यांनाच प्राप्त झाला. असे असतानाही गेल्या बुधवारी (ता.7) नारायणगाव नजीकच्या वारुळवाडी येथील गडाख मशिनरीज् या दुकानात कोहिनूर कंपनीचे मानचिन्ह असलेल्या आटाचक्क्या विक्री होत असल्याची माहिती फिर्यादीचे बंधु सुहास शहा यांना समजली. याबाबत खात्री केल्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेवून त्यांना सदरचा प्रकार सांगितला.

त्यानुसार नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय.ताटे यांनी पोलीस पथकासह वारुळवाडी येथील गडाख मशिनरीज् या दुकानावर छापा घातला असता तेथे ‘कोहिनूर’ कंपनीच्या आटाचक्क्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचे पोलिसांना आढळले. यावेळी फिर्यादीने आटाचक्क्यांची तपासणी करुन कोहिनूर कंपनीचे बनावट मानचिन्ह वापरले गेल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत संबंधित दुकानात उपस्थित असलेल्या सुधीर प्रकाश गडाख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना काही एक समाधानकारक उत्तर देता आले नाही. कोहिनूर कंपनीचा इतक्या मोठ्या प्रमाणात माल असल्याने त्याच्या विक्री अधिकाराबाबतच्या कागदपत्रांबाबतही संबंधिताला कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

पोलिसांनी सदरच्या दुकानात उपलब्ध असलेल्या आटाचक्क्यांची मोजदाद केली असता त्यात 3 लाख 4 हजार रुपये किंमतीच्या दोन एच.पी.क्षमतेच्या व प्रत्येकी 9 हजार 500 रुपये मूल्य असलेल्या 32, 11 लाख 22 हजार रुपये किंमतीच्या एक एच. पी. क्षमतेच्या व प्रत्येकी 8 हजार 500 रुपये 132, 71 हजार 500 रुपयांच्या एक एच. पी. क्षमतेच्या व 6 हजार 500 रुपये मूल्य असलेल्या 11 आटाचक्क्या असा एकूण 14 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी गडाख मशिनरीजचे संचालक सुधीर प्रकाश गडाख यांच्या विरोधात कॉपीराईट कायद्याच्या कलम 63, 65 नुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गडाख मशिनरीज् हे नाव संगमनेर तालुक्याला चांगले परिचयाचे आणि दबदबा असलेले आहे. असे असतानाही त्यांच्या नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारुळवाडी केंद्रावर चक्क कोहिनूर कंपनीचा बनावट लोगो वापरुन मोठ्या प्रमाणात आटाचक्क्यांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने पुणे जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यात गडाख मशिनरीज् या नावाला मोठे वलय आहे, त्यामुळे त्यांच्याकडून असेकाही होईल यावर लवकर विश्वास बसत नसल्याची स्थिती असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षात ‘कॉपीराईट’ अंतर्गत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याची जोरदार चर्चाही सुरू आहे.


