गोमांसवर मर्यादा येताच कसायांकडून अंमलीपदार्थांचा व्यापार! संगमनेर पोलिसांची बसस्थानकावर कारवाई; चाळीस ग्रॅम मेफोड्रोनसह एकाला अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या रडारवर असलेल्या संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवर सध्या मर्यादा आल्याने ‘काही’ कसायांनी बेकायदा धंद्यांचे वेगळे मार्ग निवडले आहेत. गुरुवारी सायंकाळी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हा धक्कादायक प्रकार उघड झाला असून तब्बल 40 ग्रॅम मेफेड्रोनसह (एमडी) भारतनगरमधील एकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ‘जावेद हबीब’ या युनिसेक्स सलूनचा संगमनेरातील संचालक अशाच कृत्यात 103 ग्रॅम एमडीसह पकडला गेला होता. त्याच्या तपासातून विद्यार्थ्यांना उध्वस्त करणार्या या अतिशय घातक अंमलीपदार्थाच्या तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उघड होईल अशी अपेक्षा होती. मात्र तो प्रकारही अन्य घटनांप्रमाणे ‘चौकटीत’ ठेवला गेला असतानाच आता कत्तलखान्यांचा कुख्यात परिसर म्हणून अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या संगमनेरातील भारतनगरमधील कासिफ कुरैशी नावाचा नवा तस्कर समोर आल्याने पोलिसांच्या अर्थपूर्ण कृपेतून हा व्यवसाय शहराच्या कानाकोपर्यात तर पोहोचला नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. नेहमीप्रमाणे या मलाईदार प्रकरणाचा तपासही कोणताही महत्वपूर्ण गुन्हा ‘प्रकट’ करण्यात अपयशी ठरलेल्या ‘प्रकटीकरण शाखेला’च सोपवण्यात आला असून या गुन्ह्याची वाटचालही फाईंलीपर्यंत मर्यादीत राहण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.3) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका संशयीत इसमाकडून संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात मानवी जीवनावर अतिशय घातक परिणाम करणार्या मेफेड्रोन (एमडी) या घातक अंमलीपदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नेहमीप्रमाणे आजवर एकाही महत्वपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या, मात्र प्रत्येक प्रकरणात संशय निर्माण करणार्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह त्यांच्या पथकाला बोलावून कारवाईचे निर्देश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने बसस्थानकाच्या परिसरात येवून संशयीताचा शोध सुरु केला असता मिळालेल्या वर्णनानुसारचा इसम पिवळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीसह संशयास्पदपणे वावरताना दिसून आला. पथकाचा संशय पक्का होताच चारही बाजूने एकाचवेळी धावा करीत पोलिसांनी त्याला जागेवरच घेराव घालून त्याच्या तेथील उपस्थितीचे कारण विचारले असता तो सुरुवातीपासूनच उडवाउडवी करु लागला. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करुन त्याला सरळ करावे लागले. त्याची ओळख विचारली असता त्याने आपले नाव कासिफ असद कुरैशी (वय 27, रा.कादरी मशिदीजवळ, भारतनगर) असल्याचे सांगितले. यावेळी पुरवठा विभागाचे निरीक्षक रत्नाकर सातपुते यांच्या उपस्थितीत त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेली पांढर्या रंगाची पावडर आढळली.

त्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला फेकाफेक केल्यानंतर सदरचा पदार्थ ‘एमडी’ असल्याची माहिती त्याने दिली. त्याच्याकडून आढळलेला पदार्थ एमडी असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीच्या बर्गमॅन या अलिशान दुचाकीचीही कसून तपासणी केली, मात्र त्यात काही आढळून आले नाही. पथकाने त्याला ताब्यात घेवून सदरचा अंमलीपदार्थ कोठून आणला? कोणासाठी आणला? तो घ्यायला कोण येणार होते? आणखी या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे? अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र गोवंशाच्या कत्तली करुन निर्ढावलेल्या आरोपीने चकारही काढला नाही. या कारवाईत त्यांच्या ताब्यातून एक लाख 17 हजार रुपये मूल्याचा 39 ग्रॅम वजनाचा घातक एमडी व 90 हजार रुपयांची बर्गमॅन दुचाकी असा दोन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांडे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी कासिफ असद कुरैशी (वय 27, रा.भारतनगर) याच्यविरोधात एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करुन त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह हेड काँन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलीस काँन्स्टेबल समीर शेख, अतुल उंडे, विजय खुळे, विजय आगलावे, सागर नागरे, हरिश्चंद्र बांडे व आत्माराम पवार आदींचा सहभाग होता. या कारवाईने शहरात फोफावत असलेला अंमलीपदार्थांचा व्यापार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

गेल्यावर्षी 21 नोव्हेंबररोजी नाशिक रस्त्यावरील गणेशनगर परिसरातही पोलिसांनी अशाचप्रकारची कारवाई करीत नाशिकच्या सातपूर परिसरात राहणार्या आशिष सुनील मेहेरे (वय 28) याला अलिशान चारचाकी वाहनातून 103 ग्रॅम एमडीची तस्करी करीत असताना रंगेहाथ पकडले होते. धक्कादायक म्हणजे त्याच्या चौकशीतून तो संगमनेरातील युनिसेक्स सलून म्हणून नेहमीच वादात असलेल्या ‘जावेद हबीब’चा संचालक म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्या प्रकरणाचे गांभीर्य वाढून आरोपीच्या तपासातून सलूनसारख्या वर्दळीच्या ठिकाणांचा वापर करुन सुरु असलेल्या या बेकायदा धंद्याचे संपूर्ण नेटवर्क उघड होण्याची अपेक्षा होती.

प्रत्यक्षात त्या घटनेचा तपासही नेहमीप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला सोपवण्यात आला आणि त्यांनी तपासाच्या नावाखाली पद्धतशीर कार्यक्रम राबवून फायदेशीर नसलेल्या एका खरेदीदारा व्यतिरीक्त उर्वरीत आरोपींना राजमार्ग उपलब्ध करुन दिल्याचा प्रकार समोर असतानाच पुन्हा तशाच प्रकरणाचा तपासही या ‘निष्क्रिय’ शाखेकडे सोपवण्यात आल्याने संगमनेरातील पालकवर्गात संताप निर्माण होवू लागला आहे. गेल्याकाही वर्षात शहर व परिसरातील शिक्षणसंस्थांच्या परिसरात राजरोसपणे गांजा, चरस आणि आता एमडीसारखे विद्यार्थीदशेतील मुलांना बर्बाद करणारे अंमलीपदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा कारवायांमधून समोर येणार्या तस्करांची सखोल चौकशी झाल्यास अशा उद्योगाची संपूर्ण साखळी उघड होवू शकते.

मात्र पुन्हा सुरु झाल्यापासूनच संशयाच्या गर्तेत असलेल्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेला मात्र अर्थपूर्ण तडजोडींच्या पुढचा प्रवासच ज्ञात नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना हरताळ फासून संगमेनरात या घातक पदार्थांच्या तस्करांनी हातपाय पसराल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापसातील राजकीय संघर्षासोबतच संगमनेरच्या विद्यार्थ्यांची वाट लावणार्या या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवून प्रकटीकरण शाखेकडून सुरु असलेला अंधाधूंद कार्यक्रम रोखण्याची गरज आहे, अन्यथा या शहरातील भावी पिढी त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यांबाबत थेट विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यापासून स्थानिक पोलीस आणि जिल्ह्याच्या गुन्हे शाखेने शहरातील कत्तलखाने लक्ष्य केल्याने कसायांचे कंबरडे मोडले आहे. कारवाईच्या भीतीने अनेकांनी अन्य व्यवसायातून आपला प्रपंच पुढे नेण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच कासिफ कुरैशी सारख्या काही कसायांनी बेकायदा धंद्याला बेकायदा धंद्यांचाच पर्याय निवडल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करुन झपाट्याने फोफावत असलेला हा घातक व्यवसाय मूळापासून उखडण्याची गरज आहे.

