संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमण जुलैच्या सर्वोच्च पातळीवर! तब्बल तीन आठवड्यांनंतर जिल्ह्यानेही पुन्हा ओलांडली पाचशेहून अधिक रुग्णांची मर्यादा.. गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत संगमनेर तालुक्यातील 381 रुग्णांचा कोविड संक्रमणातून गेला बळी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ओसरली ओसरली म्हणता म्हणता कोविड संक्रमणाची दुसरी लाट पुन्हा एकदा पाय पसरु लागली असून मागील 20 दिवसांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पारनेर व श्रीगोंदा पाठोपाठ संगमनेर, नेवासा व नगर ग्रामीणमधून अधिक रुग्ण समोर येवू लागल्याने या तालुक्यांसह जिल्ह्याच्या सरासरीत मोठी वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यातील संक्रमणाचा वेग तर आता पुन्हा एकदा जूनच्या सरासरीकडे झुकल्याचे चिंताजनक दृष्यही यातून समोर आले आहे. गुरुवारी जुलैमधील सर्वोच्च रुग्णसंख्येचा धक्का दिल्यानंतर आजही तालुक्यातील 27 गावांमधून तब्बल 60 रुग्ण समोर आले आहेत. आजच्या रुग्णांमध्ये शहरातील अवघ्या चार जणांचा समावेश असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 23 हजार 343 झाली आहे. शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 381 जणांचा कोविडने बळी घेतला आहे.
जूनमध्ये टप्प्याटप्प्याने संक्रमणाचा वेग नियंत्रणात येवून जुलैच्या पहिल्या तारखेपासून संपूर्ण जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला होता. जूनमध्ये जिल्ह्यातून सरासरी 591 रुग्ण दररोज या गतीने 17 हजार 719 रुग्ण समोर आले होते. तर जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत दररोज 440 रुग्ण या गतीने 2 हजार 199 रुग्ण समोर आले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या एकूण संक्रमणात वाढ झाली असून पहिल्या पाच दिवसांच्या तुलनेत नंतरच्या चारच दिवसांत सरासरी 493 रुग्ण दररोज या गतीने आत्तापर्यंत 1 हजार 970 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या नऊ दिवसांचा जिल्ह्याचा एकत्रित सरासरी वेग 463 रुग्णांवर गेला असून या कालावधीत जिल्ह्यातून 4 हजार 169 रुग्ण समोर आले आहेत. गेल्या चार दिवसांत पारनेर, श्रीगोंदा व पाथर्डी पाठोपाठ संगमनेर, नगर ग्रामीण व नेवासा तालुक्यातील संक्रमणाची गती काहीशी वाढली असून जिल्ह्यात अद्यापही कोविड दुसरी लाट नियम तोडणार्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर तालुक्याच्या रुग्णगतीमध्येही मागील चार दिवसांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत असून या कालावधीत सरासरी 55.25 रुग्ण दररोज 221 रुग्ण समोर आले आहेत. जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत हिच गती सरासरी 32 रुग्णांवर जावून 161 रुग्ण वाढले होते. गेल्या नऊ दिवसांत तालुक्यात सरासरी 40 रुग्ण या गतीने 364 रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये तालुक्याची सरासरी रुग्णगती 49 होती. आजही तालुक्यातून जुलै महिन्यातील दुसरी उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 11, खासगी प्रयोगशाळेचे 26 व रॅपीड अँटीजेनचे 23 अशा एकूण 60 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील अवघ्या चार जणांसह ग्रामीणभागातील 27 गावांमधून 56 रुग्ण समोर आले आहेत.
आजच्या अहवालातून शहरातील वाडेकर गल्ली परिसरातील सात वर्षीय मुलगा, उपासणी गल्लीतील 19 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातील 43 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 39 वर्षीय महिलेला कोविडचे संक्रमण झाले आहे. तर ग्रामीणभागातील अंभोरे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, दाढ बु. येथील 35 वर्षीय महिला, घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगर येथील 47 वर्षीय महिला, पसायदान कॉलनीतील 21 वर्षीय तरुण व समर्थनगर परिसरातील 48 वर्षीय इसम, मालदाड येथील 33 वर्षीय तरुण, कनोली येथील 38 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 33 वर्षीय महिला व बारा वर्षीय मुलगा, म्हसवंडी येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खराडी येथील 37 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 80 व 25 वर्षीय महिलांसह 58 वर्षीय इसम, 35 व 32 वर्षीरू तरुण,
डोळासणे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय महिला, निळवंडे येथील 34 वर्षीय तरुण, सायखिंडीतील 46 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 33 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 40 वर्षीय तरुण, साकूर येथील 50 व 44 वर्षीय इसमांसह 32 व 18 वर्षीय तरुण, 38, 30 व 27 वर्षीय महिला, 19 व 18 वर्षीय तरुणी व एक वर्षीय बालक, राजापूर येथील 52 व 50 वर्षीय इसमांसह 45 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, माळेगाव पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला, मांडवे येथील 70 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 60 वर्षीय महिला, एठेवाडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, कोंची येथील 50 वर्षीय इसम, निमगाव जाळीतील 55 वर्षीय इसम, वरवंडी येथील 40 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 40 व 17 वर्षीय तरुणासह 55, 35, 21, 25 व 24 वर्षीय महिला, ओझर येथील 53 वर्षीय इसम, पानोडी येथील 30 वर्षीय दोन महिला व कोठे बु. येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 18 वर्षीय तरुण संक्रमित झाले आहेत.
मागील 20 दिवसांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही आज मोठी वाढ झाली असून जिल्ह्याच्या एकूण रुग्णंसख्येने 20 दिवसांनंतर पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी 20 जूनरोजी जिल्ह्यात 594 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आजपर्यंतच्या दररोजच्या रुग्णसंख्येचा आकडा पाचशेहून खालीच होता. आज समोर आलेल्या रुग्णांमध्ये पारनेर 84, संगमनेर 60, श्रीगोंदा 57, पाथर्डी 50, नगर ग्रामीण 45, नेवासा 40, जामखेड 37, शेवगाव 34, राहुरी 33, अहमदनगर महापालिका क्षेत्र 29, राहाता 26, श्रीरामपूर 23, कोपरगाव 22, अकोले 20, इतर जिल्ह्यातील 11, कर्जत सात व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 84 हजार 23 झाली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 75 हजार 306 रुग्णांवर आजवर उपचार करण्यात आले असून 5 हजार 975 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरा होण्याचा सरासरी दरही आता 96.93 टक्क्यांवर गेला आहे. आज जिल्ह्यातील नऊ जणांचा कोविडने बळी घेतला आहे.