संगमनेर विधानसभा निवडणुकीतून लोकसभेची मतपेरणी! शिर्डी होणार खुला मतदारसंघ; फेररचना होवून राहणार चारच मतदारसंघ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील बारामधील दहा मतदारसंघात भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने बाजी मारली. या निवडणुकीत सर्वाधीक लक्षवेधी ठरलेल्या संगमनेरच्या लढतीत संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा निकाल लागला. गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी मात्र शिवसेनेच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. खताळ यांचा विजय अनेक कारणांनी साकारला असला तरीही त्यामागे माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे सुपूत्र डॉ.सुजय यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. विखे पिता-पुत्रांनी शिर्डी अबाधित राखताना संगमनेरात केलेला नियोजनबद्ध प्रचार आणि शेवटच्या क्षणापर्यंत राबवलेली निवडणूक यंत्रणा यातून साकारलेल्या या विजयाने 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीचीही पायाभरणी केली आहे.
अवघ्या पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळी राज्यात 41 जागा पटकावणार्या भाजप महायुतीचा दारुण पराभव झाला. त्यावेळी राज्यात काँग्रेसला 13, शिवसेनेला नऊ तर शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या. तर, महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले होते. धक्कादायक म्हणजे 2009 साली मतदारसंघांच्या फेररचनेतून निर्माण झालेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात बदल होवून सलग पंधरा वर्ष महायुतीच्या ताब्यात असलेली ही जागा महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या गटाने पटकावली. तर, दक्षिणेत 2019 साली विजयी झालेल्या भाजपच्या डॉ.सुजय विखे-पाटील यांना शरद पवार गटाच्या नीलेश लंके यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. त्या निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा गमावल्या होत्या.
मात्र त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यातही चमत्कार घडला. यावेळी लाडकी बहिण, शेतकरी सन्मान, पिकं विमा, वयोश्री अशा वेगवेगळ्या योजनांसह ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा मतदारांवर प्रभाव पडल्याने विधानसभेला मोठा वर्ग महायुतीच्या बाजूला झुकला. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व त्यांचे सुपूत्र डॉ.सुजय यांनीही यावेळी जिल्ह्यातील सर्वच्यासर्व जागा पटकावण्याचे लक्ष्य समोर ठेवून प्रत्येक मतदारसंघाला ताकद देण्याचे काम केले. त्यातच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटील घराण्याशी असलेल्या आपल्या राजकीय वैराला अधिक हवा देवून सुरुवातीला गणेश कारखाना, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीवर वर्चस्व निर्माण करण्यासह लोकसभेत दक्षिण मतदारसंघात यंत्रणा राबवून डॉ.सुजय विखे-पाटील यांचा पराभव अधिक सोपा केला.
त्यावेळीच आगामी कालावधीत होणार्या जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये विखे पिता-पुत्राची भूमिका आक्रमक असेल असे चित्र दिसू लागले होते. विधानसभा निवडणुकीत ते स्पष्टपणे समोरही आले आहे. दोन्ही आजी-माजी मंत्र्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात जावून प्रबळ उमेदवार देण्याच्या हालचाली करण्यासह प्रचाराचा धुरळा उडवल्याने जिल्ह्यातील संगमनेर व शिर्डीची लढत राज्यात लक्षवेधी ठरु लागली. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर सोडून आपला अधिक वेळ शिर्डीत खर्ची घालताना काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचा जोरदार प्रचार केला. तर, डॉ.सुजय विखे-पाटील यांनी तळेगावपासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभा घेत थोरातांच्या चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली.
त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून होणारे आक्रमक भाषण यामुळे संगमनेर मतदारसंघाची निवडणूक अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच रंगात येवू लागली. त्यातून सुरुवातीला थोरात विरुद्ध डॉ.विखे-पाटील अशा लढतीचेही अंदाज लावले गेले. मात्र सरतेशेवटी शिवसेनेकडून अमोल खताळ यांच्या नावाची घोषणा झाली. खरेतर भाजपमध्ये असूनही ऐनवेळी शिवसेनेत निर्यात करुन खताळांना तिकिटं मिळवून देण्यात विखे-पाटलांचाच वाटा होता. त्यामुळे डॉ.सुजय यांना संगमनेरातून लढायचेच असते तर, त्यांच्यासाठी महायुतीची उमेदवारी मिळणं अशक्य नव्हते. मात्र त्यांनी आपल्याऐवजी अमोल खताळ यांच्यासाठी उमेदवारी आणली आणि निकालापर्यंत त्यांची संपूर्ण जबाबदारी घेवून त्यांना निवडूनही आणले.
संगमनेर मतदारसंघात विखे परिवाराकडून पहिल्यांदाच उघडपणे थोरातांच्या विरोधात नुसती भूमिकाच घेतली गेली नाहीतर, त्यांचा पराभव व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींही करण्यात आल्या. त्यातून वरकरणी दक्षिणेतील पराभवाची ‘सल’ दिसून येत असली तरीही राजकारणात जय-पराजय या गोष्टी गौण मानल्या जात असल्याने डॉ.सुजय विखे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या लोकसभेची पायाभरणी केल्याचेच अधिक प्रखरपणे दिसून आले. वास्तविक 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2029 मध्ये खुला होणार आहे.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नव्याने बांधलेल्या संसद भवनात 888 खासदार बसतील अशी रचना केल्याने आगामी कालावधीत देशातील खासदारांची संख्या वाढण्याचेही अस्पष्ट संकेत मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या संगमनेरातील भूमिकेने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. येणार्या कालावधीत देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघांची फेररचना केली जाणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या सहा विधानसभांऐवजी चार मतदारसंघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघांची रचना केली जाणार आहे.
त्यामुळे शिर्डी, संगमनेर, अकोले व कोपरगाव या चार विधानसभा मतदारसंघांना मिळून शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. अशावेळी चारातील दोन मतदारसंघात प्राबल्य असल्यास 2029 सालची लोकसभा जिंकणे सहज शक्य आहे. त्यासाठीच डॉ.सुजय विखे-पाटील यांनी शिर्डीसह संगमनेर विधानसभा मतदारसंघातही अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली असून आतातर संगमनेर विधानसभाही महायुतीकडे असल्याने निवडणुकीपर्यंत त्यांचा अधिकवेळ संगमनेर मतदारसंघात खर्ची पडल्यास आश्चर्य वाटू नये.
पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही केवळ अकोले आणि संगमनेर या दोनच तालुक्यांनी महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना भरभरुन मतदान केल्याने शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या चार मतदारसंघातून लोखंडे यांना 34 हजार 813 मतांचे अधिक दान मिळूनही त्यांना पराभव पत्करावा लागला होता. श्रीरामपूर वगळता उत्तरेतील सर्वच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने 2029 साली महायुतीकडून शिर्डी लोकसभेला डॉ.सुजय विखे-पाटीलच उमेदवार असतील हे निश्चित.
आगामी कालावधीत लोकसभा मतदारसंघांची फेररचना होवून सध्याच्या सहा विधानसभा मतदारसंघाऐवजी प्रत्येकी चार मतदारसंघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघाची रचना केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही तीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येणार असून त्यातील उत्तरेतील शिर्डी मतदारसंघात शिर्डीसह कोपरगाव, संगमनेर व अकोले विधानसभा मतदारसंघाचा समावेश होवू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना 93 हजार 25 मतांसह 54 हजार 379 मतांची, तर संगमनेरमधून 97 हजार 561 मतांसह 30 हजार 573 मतांची आघाडी मिळाली होती. विशेष म्हणजे महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना शिर्डीतून 13 हजार 371, कोपरगावमधून 6 हजार 729, श्रीरामपूरमधून 11 हजार 585 तर, नेवाशातून 3 हजार 128 अशी 34 हजार 813 मतांची आघाडी मिळूनही लोखंडे यांचा 50 हजार 139 मतांनी पराभव झाला होता.