निम्मा पावसाळा संपला तरी टँकर बंद होईना! पठारभागाला मोठ्या पावसाची गरज; शेतकरी चिंतेत

नायक वृत्तसेवा, घारगाव
निम्मा पावसाळा संपला तरी अद्यापही संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील पिण्याच्या पाण्याचे टँकर काय बंद होईना. त्यामुळे आता पठारभागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

संगमनेरचा पठारभागात म्हटला की नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात पठारभागावरील अनेक गावांसह वाड्यावस्त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र यंदाही उन्हाळा संपून निम्मा पावसाळा संपला तरी अद्यापही पठारभागात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे ओढे, नाले, सिमेंट बंधारे, पाझर तलाव वाहते झाले नसून पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी, घाणेवस्ती, कुडेकरवस्ती, गुंजाळवाडी पठार, दरेवाडीची, जोंधळवाडी या गावांसह वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत.


मान्सूनने सर्वदूर हजेरी लावली असून तुफान जलधारा कोसळत आहे. मात्र, पठारभाग अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. ऑगस्ट महिनाही निम्मा संपत आला आहे. तरीही पठारभागात मोठा पाऊस झाला नाही, असे असले तरी अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सोयाबीन, वाटाणा, बाजरी, कांदे ह्या खरीपा पिकांना नवसंजीवनी मिळत आहे. परंतु, जमिनीतील पाणीपातळी वाढण्यासाठी आणि उन्हाळ्यासाठी ओढे, नाले, सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘येरे.. येरे.. पावसा तुला देतो पैसा’ असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

Visits: 164 Today: 1 Total: 2060488

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *