लागाच्या घाटाचे रुंदीकरण करुन कठडे टाका! खासदार कोल्हेंकडे भाऊसाहेब वाकचौरेंची पत्राद्वारे मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ब्राह्मणवाडा जवळील ओतूरकडे जाणार्‍या लागाच्या घाटातील वळणाचा रस्ता, जागीच तीव्र उतार व वळणे असल्याने राज्य परिवहन विभागाच्या बस चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र वळणाच्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटचे दर्जेदार कठडे टाकण्याची गरज आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याकडे त्वरीत लक्ष घालावे, अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते तथा खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.

लागाचा घाट हा ओतूर, जुन्नर, पुणे व अकोले, कोतूळ, ब्राह्मणवाडा, अहमदनगरच्या जनतेच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण आहे. या घाटात अत्यंत नैसर्गिकदृष्ट्या मनाला भावणारे असे वातावरण आहे. साधारण अर्धा किलोमीटर घाट असून ठिकठिकाणी मोठमोठी वळणे आहेत. ब्राम्हणवाड्याच्या बाजूने उतरताना पहिल्या क्रमांकाचे वळण हे अगदी जागीच आहे तर दोन व तीन क्रमांकाच्या वळणावर तीव्र उतार आहे. दुसर्‍या क्रमांकाच्या वळणावर पावसाने काही जमिनीचा भराव खचून वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला आहे व तीव्र उतार असल्याने बस चालकाला स्टेरिंग फिरुनही वळण लवकर बसत नाही. मागे तीव्र चढ असताना देखील बस मागेपुढे करून चालकाला वळण घ्यावे लागते. यावेळी ब्रेक न लागल्यास बस, वाहतुकीची मोठी साधने 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात येथे झालेली आहेत. शेवटच्या वळणाला लोखंडी कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावली आहेत. मात्र ते फक्त चकाकणारे व दर्जाहीन असल्याचे वाहनांच्या धडकेने ते पूर्णपणे चेपून गेली असल्याचे वास्तव आहे. पुणे जिल्ह्यात धार्मिक व पर्यटनाच्यादृष्टीने मुंबई-नाशिक-अहमदनगर येथील अनेक पर्यटक भंडारदरा, हरिश्चंद्रगड, निळवंडे, कळसूबाई, रंधा फॉल व अमृतेश्वर (रतनवाडी), अगस्ति महाराज यांचे दर्शन व जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळे शिवनेरी, ओझर, लेण्याद्री, वडज, निमदरी, नाणेघाट, माळशेज घाट अशा अनेक स्थळांकडे पर्यटकांचा मोठा कल असतो. सर्वांच्यादृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा व दळणवळणाचा आहे. हा रस्ता ओतूर ते अकोले दुहेरी मार्ग व्हावा व या रस्त्याचे रुंदीकरण त्वरीत करावे, अशी मागणी ग्राहक पंचायतचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 117919

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *