‘ते’ कत्तलखाने अजूनही शाबूतच! मालकांनी केवळ पत्रे काढले, वाड्यांच्या भिंती मात्र उभ्याच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज सकाळपासून जमजम कॉलनीतील ‘ते’ बेकायदा कत्तलखाने उध्वस्त करण्यात आल्याचे वृत्त सोशल माध्यमातून जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. वास्तविक कावाईच्या भितीने होणारे नुकसान टाळण्यासाठी संबंधित कत्तलखान्यांच्या मालकांनी स्वतःहून आपापल्या वाड्यांवरील पत्रे हटविले असून भिंती मात्र तशाच उभ्या आहेत. याबाबत पालिकेकडून अद्यापही कोणतीच हालचाल सुरु झालेली नसून अतिक्रमण विभागाला या कारवाईबाबत अद्यापही कोणतेही आदेश नसल्याची नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. शनिवारी रात्री कारवाई झालेले पाचही कत्तलखाने 48 तासांच्या आंत भूईसपाट केले जातील अशी लेखी हमी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आंदोनकर्त्यांना दिली होती. त्याची मुदत संपण्यात अद्यापही दहा तासांचा कालावधी शिल्लक आहे.
अहिंसेचे पूजारी असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शंभर पोलिसांसह संगमनेरातील कुप्रसिद्ध गोवंश कत्तलखान्यांवर छापे घातले होते. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतरची आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरलेल्या या छाप्यात सुमारे सव्वाशे गोवंशाचे मांस आणि 71 जिवंत गोवंश जनावरांसह जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला होता. या कारवाईत कत्तलखान्यांच्या सात मालकांवर महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी व प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन दोघांना अटकही करण्यात आली. या कारवाईची छायाचित्रे सामाजिक माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त झाला. संगमनेरात राजरोसपणे इतक्या मोठ्या प्रमाणात दररोज गोवंशाची कत्तल होत असल्याच्या मुद्द्यावरुन विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसतांना जो पर्यंत येथील बेकायदा कत्तलखाने मुळासकट नष्ट केले जात नाहीत व या अवैध धंद्यांना आर्थिक तडजोडीतून ‘अभय‘ देणार्या पोलिस अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन पुकारले.
या आंदोलनात संगमनेरातील गोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले व 3 ऑक्टोबररोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून मोर्चाने येवून नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिवसभर या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांशी वरीष्ठ अधिकार्यांच्या दिवसभर चर्चेच्या फेर्याही झाल्या. मात्र जो पर्यंत कारवाईची लेखी हमी मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नसल्याचा एल्गार आंदोलनकर्त्यांनी पुकारल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी राहुल वाघ खासगी कारणाने रजेवर असल्याने कत्तलखाने पाडण्याबाबतच्या मुख्य मागणीवर निर्णय होत नव्हता. आंदोलनात वाढत जाणारी गर्दी आणि शहरात निर्माण होवू पाहणारा तणाव लक्षात घेवून प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी मुख्याधिकार्यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी (ता.2) सायंकाळी ते आंदोलनस्थळी हजर झाले.
यावेळी वरीष्ठ अधिकार्यांनी सल्लामसलत करुन त्याच दिवशी कारवाई झालेल्या पाचही कत्तलखान्यांना ‘सील’ ठोकून 48 तासांच्या आंत त्यांना जमीनदोस्त करण्याची लेखी हमी दिली. त्यानुसार त्याच दिवशी रात्री पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जमजम कॉलनीत जावून वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ पाचही कत्तलखान्यांना सील ठोकले. पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज (ता.6) कारवाई करण्याची मुदत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित पाचही कत्तलखान्यांच्या मालकांनी मंगळवारी मध्यरात्रीच आपापल्या कत्तलखान्यांच्या वाड्यांवरील पत्रे हटविले असून आता तेथील कत्तलखान्यांच्या केवळ वाड्यांच्या भिंती उभ्या आहेत. त्या पाडण्याची जबाबदारी पालिकेची असून त्याबाबत पालिकेकडून अद्यापही कोणतीच हालचाल नसल्याने सकाळपासून सोशल माध्यमात कत्तलखाने पाडल्याचे फिरणारे वृत्त धादांत खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.