पुणे-नाशिक महामार्गावर लावलेली झाडे ‘शोधण्याचे’ काम सुरु! राजमार्ग प्राधिकरणासह ठेकेदार कंपनीकडून वारंवार होणारी चालढकल संशयात्मक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल साडेआठ वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गाची निर्मिती करतांना 2 हजार 373 झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्या बदल्यात 23 हजार 730 झाडे नव्याने लावून त्यांचे संगोपन करण्याबाबत तत्कालीन प्रांताधिकार्‍यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला आदेश बजावले होते. मात्र जवळपास दशकाचा कालावधी उलटूनही ही झाडे अजून कागदावरच असल्याने मूळ तक्रारदारांनी हरित लवादाचे द्वार ठोठावले. आता संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी त्या अनुषंगाने माळवाडी (बोटा) ते कर्‍हे खिंडीपर्यंतच्या रस्त्यावर लावलेली ‘कथीत’ झाडे ‘शोधण्याचे’ आदेश दिले आहेत. त्यानुसार तब्बल चार महिन्यांच्या विलंबाने आज (ता.6) सकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली असून महामार्ग, महसुल व वनविभागाच्या संयुक्त समितीकडून रस्ता निर्मिती कंपनीने लावलेली व वाढवलेली झाडे शोधली जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी या प्रकरणी सुरुवातीपासून पाठपुरावा केला असून, रग्गड झालेल्या व्यवस्थेविरोधात थेट हरित लवादापर्यंत धाव घेतली आहे.


संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गाच्या नूतनीकरण कामास सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या कामात महामार्ग निर्मिती करणार्‍या कंपनीने माळवाडी (बोटा) ते कर्‍हे खिंडीपर्यंतच्या पन्नास किलोमीटरच्या अंतरातील 2 हजार 373 झाडांची कत्तल केली. विकासकामांसाठी शेवटचा पर्याय म्हणून तोडण्यात आलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावली जावीत व त्यांचे संगोपन व्हावे असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्या अनुषंगाने संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.संदीप निचित यांनी 8 जानेवारी 2014 रोजी पुणे-नाशिक महामार्गाच्या निर्मितीसाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात 23 हजार 730 झाडे लावावित असे स्पष्ट आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिले होते व त्याची देखरेख करुन अहवाल सादर करण्याबाबत संगमनेर व अकोले येथील तहसीलदारांना आदेशित केले होते. मात्र आजवर प्रत्यक्षात तशी कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.


त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी 14 सप्टेंबर 2019 रोजी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांकडे तक्रार करीत महामार्ग प्राधिकरणासह संगमनेरच्या तहसीलदारांनी आदेशाचा भंग केल्याची बाब प्रांताधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर गेली दोन वर्ष या विषयावर केवळ कागदी घोडे नाचू लागल्याने अखेर बोर्‍हाडे यांनी हरित लवादात जाण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय राजमार्ग विभागाचे प्रकल्प संचालक, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी (भाग 1) व या प्रकरणाचे तक्रारदार गणेश बोर्‍हाडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत 8 जानेवारी 2014 च्या आदेशाप्रमाणे प्रत्यक्षात वृक्षांची लागवड करण्यात आली किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी उपविभागीय वनअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व संगमनेरचे तहसीलदार सदस्य असलेली संयुक्त समिती स्थापन केली व या समितीकडून याबाबतचा अहवाल मार्च 2021 अखेर मिळेल असा निर्णय घेण्यात आला.


याच बैठकीत महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अनिल गोरडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 च्या दुतर्फा व मधोमध झाडे लावण्यात आली होती. त्यातील काही झाडांचे जतन झाले नाही, तसेच नव्याने वृक्ष लागवड करण्यासाठी प्राधिकरणाकडून नव्याने ठेकेदाराची नियुक्ति करुन लागवड पूर्ण करण्याबाबत आश्‍वासन दिले होते. विशेष म्हणजे फेब्रुवारीत पार पडलेल्या या बैठकीत नव्याने वृक्ष लागवड करण्याचे काम एप्रिल व मे या दोन महिन्यात पूर्ण करावे, ज्या योगे जूनपासून सुरु होणार्‍या पावसामुळे लागवड झालेली अधिकाधिक झाडे जगू शकतील असेही ठरले होते. प्रत्यक्षात मात्र वृक्षांची नेमकी स्थिती पडताळण्याचे कामच तब्बल तीन महिने विलंबाने आज सुरु करण्यात आले. यावरुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पर्यावरणाबाबत किती गंभीर आहे याची सहज झलक पहायला मिळते.


या बैठकीत ठरल्याप्रमाणे मार्च अखेरपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार बोर्‍हाडे यांनी पुन्हा प्रांताधिकार्‍यांकडे धाव घेतली. त्यावरुन 10 जून 2021 रोजी पुन्हा वरील सर्व अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली व 23 हजार 730 झाडांची मोजदाद करण्याकामी माळवाडी, बोटा, कुरकुंडी, शेळकेवाडी, घारगाव व आंबी खालसा या भागासाठी वनविभागाचे वनपाल आर.के.थेटे, महसुल विभागाचे तलाठी हिरवे व मंडलाधिकारी लोहारे. खंदरमाळवाडी, बांबलेवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्‍वर, गाभणवाढी व चंदनापूरी परिसरासाठी चंदनापूरीचे वनपाल रामदास डोंगरे, मंडलाधिकारी लोहारे.

हिवरगाव पावसा, वैदुवाडी, रायतेवाडी, खांडगाव, संगमनेर खुर्द, कासारा दुमाला, ढोलेवाडी व गुंजाळवाडी परिसरासाठी कर्‍ह्याचे वनपाल देवीदास जाधव, तलाठी पोमल तोरणे व मंडलाधिकारी बापूसाहेब ससे आणि घुलेवाडी, वेल्हाळे, सायखिंडी, कर्‍हे आणि पळसखेड या परिसरासाठी वनपाल जाधव यांच्यासह तलाठी मिभमराज काकड व मंडलाधिकारी ससे यांची नियुक्ति करण्यात आली होती. आजपासून (ता.6) चार महिन्यांच्या विलंबाने सदरची कारवाई सुरु करण्यात आली असून माळवाडीपासून राजमार्ग प्राधिकरण आणि रस्तानिर्मिती कंपनीने लावलेली ‘ती’ 23 हजार 730 झाडे शोधण्यास सुरुवात झाली आहे.


जगातील अनेक देशांमध्ये विकास कामे करतांना पर्यवरणाला बाधा पोहोचणार नाही यासाठी शासनापासून निर्मात्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांकडून काळजी घेतली जाते. भारतात मात्र शासकीय प्राधिकरणच ठेकेदाराच्या चुका झाकण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे मोठे उदाहरण पुणे-नाशिक महामार्गाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यात पहायला मिळत आहे. अपूर्ण काम असतांना गेल्या चार वर्षांपासून बिनबोभाटपणे सक्तिची वसुली करणार्‍या ठेकेदार कंपनीबाबत आणि या मार्गाच्या देखभालीतील चुकांबाबत जिल्हाधिकार्‍यांनीही ताशेरे ओढले आहेत. मात्र प्राधिकरणाचे अधिकारी अद्यापही ठेकेदार कंपनीला पाठीशी घालण्यासाठी धडपडत असल्याने या महामार्गाचे संपूर्ण कामच संयशयाच्या वलयात आले आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 117063

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *