उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात संगमनेरची बाजी
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात संगमनेरची बाजी
ग्रामीणचे 40 तर शहरी भागातील 32 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी 12 नोव्हेंबरला घोषित करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून 40 तर शहरी भागातून 32 असे एकूण 72 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविले आहे. यातील राष्ट्रीय ग्रामीण यादीमध्ये दिक्षा रामदास पवार तर राज्य यादीत आर्या सुनील नवले व हरीष विनायक गडाख या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान, यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालात एकूण पात्र विद्यार्थ्यांमध्ये संगमनेर शिक्षण विभाग जिल्ह्यात अव्वल ठरला होता. तालुक्यातील आठ शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकालाच्या मानकरी ठरल्या. दोन वर्षांपासून तालुक्यात गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न झाले त्याला मूर्तरूप या यशाने मिळाले आहे. विशेषतः जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात जिल्हा परिषद शाळांचेच सहा विद्यार्थी निवड पात्र ठरलेत. पाच विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे पंचायत समिती शिक्षण विभागाचे हे मोठे यश मानले जाते.
तसेच जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये तालुक्यातील रणरागिनी ग्रुपच्यावतीने सादर झालेल्या आणि गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांचा प्रत्यक्ष सहभाग असलेल्या ‘कब तक मरेगी निर्भया’ या नाटिकेने द्वितीय क्रमांक मिळवला. शिक्षण विभाग सर्वच क्षेत्रात करत असलेली ही नेत्रदीपक कामगिरी आहे. संगमनेर पंचायत समिती शिक्षण विभागाने सर्वच क्षेत्रात मिळविलेल्या सर्वांगिण यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिक्षण समिती सदस्य मिलिंद कानवडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती मीरा शेटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
दोन वर्षांपासून सर्व शिक्षकांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी घेतलेले परिश्रम, तालुक्यातील शिष्यवृत्ती तज्ज्ञ अनिल कडलग, विलास शिरोळे, अशोक शेटे, दिलीप बेलोटे, संगीता पाटोळे व सुशीला धुमाळ यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शांताराम अहिरे यांच्या दोन कार्यशाळेतील मार्गदर्शन, शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे यांची साथ, जिल्हास्तरावरून झालेल्या सराव परीक्षा, स्कॉलर मुलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, सर्व सहकारी पर्यवेक्षक यंत्रणा व पदाधिकारी यांचा पाठिंबा जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे यांची प्रेरणा या सर्व बाबी या यशात उपयोगी ठरल्या आहेत.
– साईलता सामलेटी (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती संगमनेर)