पानोडीतील बोगस डॉक्टरवरील कारवाईस टाळाटाळ! कारवाईपूर्वीच ‘बंगाली’ मुन्नाभाई पसार; आरोग्य विभाग पुन्हा संशयात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक असलेली आर्हता नसतांनाही खुलेआम दवाखाने उघडून ग्रामीणभागातील रुग्णांच्या जीवाशी खेळणार्यांची संगमनेरात मोठी भरमार आहे. मात्र जेव्हा अशा व्यक्ती उघड होवूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होते किंवा त्यांना कारवाई होण्यापूर्वीच पळून जाण्यास ‘सुरक्षित मार्ग’ तयार केला जातो, तेव्हा संपूर्ण यंत्रणेवरच संशय निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यातील आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतही घडला असून जिल्हा अधिकार्यांपासून ते तालुका अधिकार्यांपर्यंत सर्वांकडे तक्रारी केल्यानंतरही ‘तो’ बोगस बंगाली मुन्नाभाई सहीसलामत पसार होण्यात यशस्वी ठरला आहे. संशय निर्माण करणार्या या घडामोडींनंतर नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडे नाचवणार्या तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना तीन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे फर्मान काढून सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्वेकडील आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील पानोडी शिवारातून सदरचा प्रकार समोर आला आहे. या गावात बंगालहून आलेला असीम दास हा मुन्नाभाई ‘मंजुमाता दवाखाना’ या नावाने खुलेआम वैद्यकीय उपचारांचे दुकान चालवित होता. वास्तविक प्रत्येक ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत अशाप्रकारे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्या व्यक्ती आपले बस्तान बांधू शकणार नाहीत याची जबाबदारी त्या-त्या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांची असते, या प्रकरणात मात्र आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांनी या बोगसगिरीकडे साफ दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांनी कर्तव्यास कसूर केल्याचे स्पष्ट झाले असून थेट बंगालहून आलेल्या बोगस व्यक्तीला पाठिशी घालण्याचा हा प्रकार संशय वाढवणारा ठरला आहे.

सदर प्रकरणी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्यांकडे संबंधित बोगस व्यवसायाच्या छायाचित्रासह तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत त्यांनी सदरची छायाचित्र जिल्हा आरोग्य अधिकार्यांना पाठवली. त्यावरुन त्यांनी संगमनेरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना चौकशी करुन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तालुका आरोग्य अधिकार्यांनी आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांना कारवाई करण्यास सांगितले. मात्र आश्वीचे वैद्यकीय पथक ‘त्या’ मुन्नाभाईच्या वलयांकित परिसरात पोहोचण्यापूर्वीच तो आपले बस्तान घेवून अदृष्य झाल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यामुळे तेथे गेलेल्या पथकाला हात हलवित माघारी फिरावे लागले.

या प्रकरणात संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांकडेही छायाचित्रासह तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनीही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन संबंधिताविरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या सर्व घडामोडींतून सदरचे प्रकरण आपल्या अंगलट येईल या विचाराने तालुका आरोग्य अधिकार्यांनी आश्वीच्या वैद्यकीय अधिकार्यांना नोटीस बजावून आपल्या हद्दीत गेल्या काही कालावधीपासून संबंधित बोगस व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. तरीही आपल्यास्तरावरुन त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आपण कारवाई का केली नाही याबाबत पुढील तीन दिवसांत लेखी खुलासा करावा असे फर्मानच त्यांनी बजावले आहे. आता या प्रकरणात आश्वीचे वैद्यकीय अधिकारी आपल्या खुलाशातून काय सांगतात याकडे संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात आर्थिक प्रगतीच्या उंचीवर असलेल्या संगमनेर तालुक्यात अन्य व्यवसायांसह बोगस उद्योगांचीही मोठी भरभराट झाली आहे. अशाच उद्योगात तालुक्यात फोफावलेल्या बोगस वैद्यकीय व्यवसायाचाही समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणाची आवश्यक पात्रता नसतानाही असे उद्योग करणारे सुमारे 66 मुन्नाभाई संगमनेर तालुक्यात आहेत. यातील सुमारे 20 जणांवर आत्तापर्यंत कारवाया झाल्या आहेत, उर्वरीत मुन्नाभाई एकतर कारवाईपूर्वीच पसार झाले किंवा त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या दबावामुळे ते वाचले आहेत. कारवाया होवूनही त्यातून शिक्षा लागण्याचे प्रमाण जवळपास शून्यच असल्याने अशा व्यवसायिकांशी आरोग्य विभागाचे साटेलोटे असल्याचा चर्चाही यानिमित्ताने तालुक्यातून समोर येत आहेत.

