‘विखेंना’ शिर्डीतच घेरण्यासाठी थोरातांची राजकीय व्यूहरचना! विरोधकांना दिले जात आहे पाठबळ; घोगरे-कोल्हेंच्या नावाची चर्चा..

चंद्रकांत शिंदे-पाटील, संगमनेर
राज्यातील विधानसभा निवडणुकीची घटीका जसजशी समीप येत आहे, तसतशी राजकीय व्यूहरचनाही समोर येवू लागली आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटू लागले असून विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सुपूत्रांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच मतदार संघात अडकवण्याची खेळी उघड केल्यानंतर आता थोरातांनीही शिर्डीला राजकीय दोर्‍या बांधण्यास सुरुवात केली आहे. ‘गणेश’ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत त्याची झलकही पाहायला मिळाली असून विखे-पाटलांसमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी कोल्हे-घोगरे-पिपाडा यांची मोट बांधून शिर्डीत दुरंगी लढत घडवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे यंदा राज्यात आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असला तरीही त्याच्या केंद्रस्थानी मात्र अहमदनगर जिल्हाच राहणार हे आता स्पष्ट होवू लागले आहे.

कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपूत्र विवेक आणि राहात्याचे माजी नगराध्यक्ष डॉ.राजेंद्र पिपाडा हे दोघेही भाजपमध्ये असले तरीही स्थानिक पातळीवर त्यांना विखे-पाटलांचे राजकीय विरोधक म्हणूनच ओळखले जाते. गेल्या वेळच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामागे विखे पाटलांचा हात असल्याच्या संशयावरुन कोल्हे परिवार त्यांच्यापासून दूरावला आहे. त्यावेळी स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 822 मतांनी पराभव झाला होता. विखे पाटलांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी अपक्ष उमेदवारी करताना 15 हजार 446 मते मिळवली होती. त्यांच्या उमेदवारीला पाटलांचा छुपा पाठींबा असल्यानेच त्यांना इतकी मते मिळाली व त्यामुळेच स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याचा आरोप वेळोवेळी झाला आहे.


आपल्या आईच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी युवानेते विवेक कोल्हे यांनी संगमनेरचे लोकप्रतिनिधी व विखेंचे पारंपरिक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांच्या साथीने राहाता परिसराची कामधेनू समजल्या जाणार्‍या गणेश कारखान्याची सत्ता काबीज करीत विखे-पाटलांच्या वर्चस्वाला नख लावले. त्यानंतर लागलीच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. मात्र मंत्री विखे यांनी आपली संपूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी लावल्याने कोल्हेंना दुसर्‍यास्थानावर समाधान मानावे लागले. त्यावेळी भाजप नेतृत्त्वाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न झाले होते.


राज्यातील बदललेल्या राजकीय गणितांचा विचार करता आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील काही जागांमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच कोपरगावची जागा अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांच्याकडे असल्याने स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांनी थोरातांशी संधान साधून शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेतल्यास आश्‍चर्य निर्माण होणार नाही. या प्रकारचे समिकरण घडून आल्यास गणेश कारखान्याच्या माध्यमातून कोल्हेंच्या पाठीशी आलेल्या मतांचा थेट फायदा शिर्डीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होवू शकतो. परिणामी गणेशच्या माध्यमातून होणारे मतविभाजन विखे पाटलांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


दिवंगत माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या स्नूषा व लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांचाही प्रवरा परिसरात मोठा प्रभाव आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनीही शिर्डीतील उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदार संघातील गावागावात आणि वाड्यावस्त्यांवरील कार्यक्रमांना त्यांची हजेरी या गोष्टींवर प्रकाश टाकणारी आहे. दिवंगत चंद्रभान घोगरे यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरात असल्याने त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. त्यातच त्यांचे माहेरही कोल्हारचे असल्याने तेथील त्यांचे बंधू डॉ.सुरेंद्र खर्डे यांची ताकदही त्यांना बळ देणारी ठरेल. राहात्यामध्ये डॉ.राजेंद्र पिपाडा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 2008 मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात विखे पाटीलांना कडवी झूंज दिली होती. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार्‍या राधाकृष्ण विखे-पाटील यांना 80 हजार 301 तर, महायुतीतील शिवसेनेकडून लढणार्‍या डॉ.पिपाडा यांना 66 हजार 992 इतकी मतं मिळाली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या 13 हजार 309 मतांनी पराभव झाला होता.


शिर्डीतील काँग्रेसनेते डॉ.एकनाथ गोंदकर यांचीही बर्‍यापैकी राजकीय ताकद आहे. तसेच, शिर्डी मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे. त्यातील निम्म्याहून अधिक गावांवर थोरातांचे तर निम्म्यांवर विखे-पाटलांचे प्रभुत्त्व आहे. त्यामुळे शिर्डीतून विवेक कोल्हे अथवा प्रभावती घोगरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी केल्यास त्यांच्याकडून पाटलांसमोर कडवे आव्हान उभे राहू शकते. शिर्डी विधानसभा मतदार संघ मंत्री विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1995 पासून सलग सहा वेळा त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मतदारसंघात असणार्‍या बहुतेक संस्थांवर त्यांचेच वर्चस्व आहे. कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांच्या पाठीशी आहे. प्रवरा उद्योग समूहाने या भागातील गावागावात रोजगार दिल्याने त्याचाही परिणाम आजवरच्या निवडणुकांमध्ये बघायला मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना या संस्थात्मक राजकारणाचाही फायदा झाला आहे.


शिर्डी मतदारसंघ आकाराला आल्यानंतर 2009 सालच्या पहिल्या निवडणुकीत 13 हजार 309 मतांनी निसटता विजय वगळला तर उर्वरीत पाचही वेळा त्यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजय साजरा केला आहे. राहात्याचा गणेश कारखाना त्यांच्या हातून गेला असला तरीही गावागावात आणि स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्याच होमपीचवर नमवणं सहजासहजी शक्य नाही. या मतदार संघात संगमनेर तालुक्यातील आश्वी महसूल मंडळासह राहाता तालुक्यातील राहाता, राजूरी, लोणी ही महसूल मंडळे येतात तर, शिर्डी व राहाता पिंपळस या दोन नगर पंचायतींचाही त्यात समावेश आहे. एकूणच या मतदारसंघातील लढत राज्यासाठी लक्ष्यवेधी ठरणार हे मात्र निश्‍चित आहे.


कोल्हेंसमोर दोन पर्याय..
कोल्हे सध्या भाजपात असले तरीही विद्यमान आमदार म्हणून कोपरगावची जागा राष्ट्रवादीकडे (अजित पवार) जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्त्व टिकवण्यासाठी कोल्हेंना शरदचंद्र पवार गटात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शिर्डीतून काँग्रेसकडून लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरीही ऐनवेळी त्यांच्या उमेदवारीचा प्रश्‍न निर्माण झाल्यास विवेक कोल्हेही शिर्डीतून उमेदवारी करु शकतात. अशा स्थितीत कोपरगावमधून शरदचंद्र गटाकडून स्नेहलता कोल्हे आणि शिर्डीतून काँग्रेसकडून विवेक कोल्हेंची उमेदवारी जाहीर झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

Visits: 57 Today: 1 Total: 114598

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *