भाजप आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे सुरुवातीपासूनच दिसत होती. आणि अखेर घडलेही तसेच, सोमवारी (ता.5) महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी, मराठा आरक्षण आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांवरुन भाजप आमदरांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, प्रचंड घमासान झाल्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. याचा संगमनेर भाजपने मंगळवारी (ता.6) निषेध करुन प्रांताधिकार्‍यांना निलंबन रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले.

प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला उघडे पाडल्यामुळेच भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. खोटे षडयंत्र रचून विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोप करत अशाप्रकारे घटनात्मक आयुधांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न हाणून पाडावा. तसेच आमदारांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी केली आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, ओबीसी जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, जिल्हा महिला उपाध्यक्षा रेश्मा खांडरे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, प्रमोद भोर, प्रसिद्धी प्रमुख अरुण शिंदे, शिवकुमार भंगिरे, सोमनाथ बोरसे, जग्गू शिंदे, सुमित राऊत, अमोल रनाते, सुनील मानवतकर, संतोष नवले, मंगेश बुळकुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 95 Today: 1 Total: 1103147

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *