दिड हजारांवर रुग्णांचे जीव वाचवणार्‍या अवलियाचा सन्मान! संगमनेरच्या डॉ.संदीप कचेरिया यांना राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे सन्मानपत्र..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्यावर्षी देशात पाऊल ठेवणार्‍या कोविडने संगमनेर तालुक्यातही मोठा धुडगूस घातला. सुरुवातीच्या काळात तर या विषाणूबाबत जनमानसासह वैद्यकीय क्षेत्रालाही फारशी माहिती नव्हती. अशा काळात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी आपला विचार न करता सामान्यांसाठी शड्डू ठोकले आणि संगमनेरात कोविड आरोग्य केंद्र सुरु झाले. गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी दिड हजारांवर रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडले, आजही त्यांचे हे देवकार्य अव्याहतपणे सुरुच आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेत एबीपी माझा या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने आज डॉक्टर्स दिनाचे निमित्त साधून सन्मानपत्र देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


आज (ता.1) सकाळी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्याहस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्‍हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.सिमा घोगरे, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन ओझा, दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी आदी उपस्थित होते.


यावेळी बोलतांना डॉ.मंगरुळे यांनी जगभरातील डॉक्टरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतांना कोविड संक्रमणाच्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत वैद्यकीय क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे सांगीतले. घुलेवाडीचे ग्रामीण रुग्णालय गोरगरीब व गरजू रुग्णांवर उपचार करणारे केंद्र समजले जाते. कोविडच्या अगदी सुरुवातीच्या काळातच येथील ट्रामा सेंटरच्या इमारतीत शंभर खाटांचे कोविड उपचार केंद्र सुरु झाल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी डॉ.संदीप कचेरिया आणि डॉ.सिमा घोगरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि या कालावधीत शेकडों रुग्णांवर उपचार करुन दिवस-रात्र समर्पित भावनेने उपचार करुन त्यांचे जीव वाचवले. आज डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने झालेला त्यांचा सन्मान निश्‍चितच त्यांच्या निस्पृह कामाचाच गौरव असल्याचेही डॉ.मंगरुळे यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.


तहसीलदार निकम यांनी संगमनेर तालुक्यात कोविडचे संक्रमण सुरु होण्यापूर्वीच त्याचा सामना करण्यासाठी पहिली भूमिका घेणारा माणूस म्हणजे डॉ.संदीप कचेरिया असल्याचे सांगीतले. सलग दिड वर्ष एखाद्या योद्ध्याप्रमाणे त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह अपार मेहनत घेवून तालुक्यातील शेकडों जणांचे जीव वाचवले. या काळात संगमनेरातील आणि विशेषतः घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्राची महती जिल्हाभर पसरल्याने केवळ संगमनेर तालुकाच नव्हेतर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असंख्य रुग्णांनीही घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणे पसंद केले आणि त्यातील बहुतेक सर्वच रुग्ण ठणठणीत होवून घरीही गेल्याचे त्यांनी सांगीतले.


कार्यक्रमाच्या प्रास्तविकात श्याम तिवारी यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे महत्त्व विशद् केले. घुलेवाडीचे ग्रामीण रुग्णालय सर्वसामान्य माणसांसाठी मोठा आधार आहे. कोविड संक्रमणाच्या काळात ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसा नव्हता अशा रुग्णांवर उपचार करणारे तालुक्यातील एकमेव केंद्र असलेल्या या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी डॉ.संदीप कचेरिया आणि त्यांच्या टीमने आपल्या खांद्यावर घेतली आणि या कालावधीत पंधराशे रुग्णांचे जीव वाचवले. खरेतर कोविडचा आत्तापर्यंतचा काळ अतिशय भयानक असल्याचे आपण अनुभवले, अशा प्रसंगात डॉक्टरांच्या वेशातील देवांनी माणसांना वाचवण्यासाठी शर्थ केली, त्यात संगमनेरचे डॉ.संदीप कचेरिया सुरुवातीपासून आघाडीवर होते. आजच्या दिवसानिमित्ताने एबीपी माझाने या अवलियाच्या कार्याची दखल घेवून त्यांचा केलेला सन्मान खरोखरी आनंददायी असल्याचे त्यांनी सांगीतले. नामदेव कहांडळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


कोविड संक्रमणाच्या काळात ‘रेमडेसिवीर’ लशीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यातून या लशीची टंचाई निर्माण झाल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हजारों रुपये खर्च करुन ही लश मिळविण्यासाठी शर्थ करावी लागली. एकीकडे रेमडेसिवीरचा सर्रास वापर होत असतांना दुसरीकडे घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात मात्र आवश्यकता असेल तरच या लशीचा वापर करण्याचे सूत्र डॉ.कचेरिया यांनी राबविले, त्यासाठी पर्याय म्हणून त्यांनी ‘प्रोनींग’ (पोटावर झोपणे) पद्धतीने उपचारांना अधिक महत्त्व दिल्याने आजवर या रुग्णालयात उपचार झालेल्या एकूण रुग्णांपैकी अवघ्या 25 टक्के रुग्णांनाच रेमडेसिवीरची गरज भासली. डॉ.कचेरिया यांच्या समर्पित भावनेचे कोविड काळात समोर आलेले हे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.

Visits: 124 Today: 1 Total: 1417179

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *