‘अखेर’ छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळील अतिक्रमण हटणार! संगमनेरकरांच्या लढ्याला यश; शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होणार कारवाई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चार दशकांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गावर अरगडे गल्लीत स्थापण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आज संगमनेरच्या अस्मितेचे केंद्र बनली आहे. पालिकेच्या मालकीच्या या जागेत शिवरायांच्या प्रतिमेचे विस्तारीत स्मारक व्हावे अशी संगमनेरकरांची जूनी मागणी आहे. मात्र ती पूर्ण होण्याआधीच संबंधित जागेच्या भोगवटादाराने महामार्गासह पालिकेच्या बांधकाम नियमांना तिलांजली देवून व लोकभावना पायदळी तुडवून या स्मारकाला खेटूनच बांधकाम सुरु केल्याने शिवप्रेमींमध्ये संताप उसळला आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या सभागृहातही दिसून आला असून सदर बांधकाम त्वरीत थांबविण्यासह बेकायदेशीरपणे पूर्ण झालेल्या बांधकामावर हातोडा घालण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी (ता.2) पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या बांधकामावर कारवाई होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. या वृत्ताने शिवप्रेमींमध्ये आनंद दाटला आहे.


चार दशकांपूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा अरगडे गल्लीतील मारुती मंदिरासमोर स्थापन झाली. मात्र तत्पूर्वीच पालिकेने सदरची जागा (स्वर्गीय) नानासाहेब गाडे यांना 99 वर्षांच्या भाडेकराराने वापरासाठी दिल्याने त्यांनी ‘त्या’ जागेत स्मारक उभारण्यास विरोध केला. यावेळी स्थानिक शिवप्रेमींनी उपोषणासह मोठा संघर्ष करीत संगमनेरच्या तेव्हाच्या प्रांताधिकार्‍यांना या विषयात हस्तक्षेप करण्यास भाग पाडले आणि नूरमोहंमद पहेलवाल नगराध्यक्ष असतांनाच्या काळात या जागेच्या पुढील भागात छत्रपतींची अर्धाकृती प्रतिमा व त्यानंतर काही महिन्यात उत्पादन शुल्क विभागाच्या जागेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमिता स्थापन करण्यात आली. 2200 वर्षांचा इतिहास लाभलेल्या संगमनेरात स्थापन झालेली ही दोन्ही स्मारके शहराच्या इतिहासात पहिलीच ठरल्याने ती संगमनेरच्या अस्मितेची केंद्र बनली.


गेल्या चाळीस वर्षात संगमनेरच्या जडणघडणीत अमुलाग्र बदल झाले. संगमनेर शहर जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाचे शहर म्हणूनही नावारुपाला आले. येथील समृद्ध बाजारपेठ आणि सुसंस्कृत वातावरण यामुळे येथील नागरी वसाहतीही वाढत गेल्या. त्यातूनच संगमनेरसारख्या वैभवशाली शहरात छत्रपती शिवाजी महारांजाची अश्‍वारुढ प्रतिमा (पुतळा) स्थापन व्हावा अशी मागणी समोर आली. त्यासाठी युवानेते व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत भोगवटादार असलेल्या गाडे कुटुंबाची भेट घेवून जनभावनेचा विचार करुन शिवरायांच्या स्मारकासाठी किमान पंधरा फुट जागा सोडण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधितांनी त्यासाठी होकार दिल्याचेही समजते. मात्र प्रत्यक्षात बांधकाम सुरु झाल्यानंतर भोगवटादाराने केवळ दोन-तीन फुट जागा सोडून वेगात बांधकाम सुरु केल्याने शहरातील शिवप्रेमींमध्ये संताप उसळू लागला.


त्याचा परिणाम ही खद्खद् पालिकेच्या सभागृहापर्यंत पोहोचली आणि मोठा गदारोळ झाला. संबंधित भोगवटादारासोबत झालेल्या भाडेकराराची कागदपत्रे शोधण्याची मोहीमही राबविण्यात आली, मात्र ती ‘गहाळ’ असल्याची धक्कादायक बाबही त्यातून समोर आली. मात्र जनभावनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असा सूर बहुतेक नगरसेवकांनी लावून धरल्याने सदरचे बांधकाम त्वरीत थांबवण्याची कारवाई करण्यात आली. आता सदरचे बांधकाम नियमांना अनुसरुन नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला असून सदरचे वाढीव बांधकाम अतिक्रमण असल्याने ते उध्वस्त करण्याचा निर्णय पालिकेच्या सभागृहाने घेतला आहे. त्यानुसार आदेशही तयार झाला असून शुक्रवारी (ता.2) मुख्याधिकारी परताच प्रत्यक्ष कारवाई होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती दैनिक नायकच्या हाती आली आहे. या वृत्ताने संगमनेरातील शिवप्रेमींमध्ये चैतन्य निर्माण झाले असून छत्रपती शिवरायांची अश्‍वारुढ प्रतिमा स्थापन होईस्तोवर पाठपुरावा करण्याचा निर्णय संगमनेरातील शिवप्रेमींनी केला आहे.


अरगडे गल्लीत सद्यस्थितीत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकासह त्यामागील संपूर्ण जागा पालिकेच्या मालकीची असून (स्वर्गीय) नानासाहेब गाडे यांनी 99 वर्षांच्या भाडेकरारावर ती पालिकेकडून घेतली होती अशी माहिती मिळत आहे. दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांनीही एका मुलाखतीत याबाबत स्पष्टपणे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ देखील प्राप्त झाला असून या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा ऊहापोह आम्ही दैनिक नायकच्या वाचकांसाठी लवकरच उपलब्ध करणार आहोत.

Visits: 205 Today: 3 Total: 1109720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *