जिल्ह्यातील कोविड संक्रमणात झाली किंचित वाढ! संगमनेर शहरातील चौघांसह तालुक्यातूनही आज तीस रुग्ण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्याभरापासून उतारावर असलेल्या जिल्ह्याच्या कोविड रुग्णसंख्येत आज मात्र किंचितशी वाढ झाली आहे. आजच्या अहवालात पाथर्डी, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातून पन्नासाहून अधिक रुग्ण समोर आल्याने जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येचा आजचा आलेख 487 वर पोहोचला आहे. संगमनेर तालुक्यातही सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा 25 पेक्षा अधिक रुग्ण समोर आले असून शहरातील अवघ्या दोघांसह तालुक्यातील 15 गावांमधून 26 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 965 झाली आहे.


मागील महिन्यात जिल्ह्यातील कोविड संक्रमण भरात होते. गेल्या महिनाभरातच जिल्ह्यातील 14 तालुके व लष्करी परिसरासह अन्य जिल्हे व राज्यातील मिळून तब्बल 87 हजार 95 रुग्ण समोर आले होते. गेल्या महिन्याच्या 31 दिवसांतील रुग्ण समोर येण्याची जिल्ह्याची सरासरीही 2 हजार 809 रुग्ण दररोज इतकी मोठी होती. गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातूनही उच्चांकी रुग्ण समोर आले. 31 दिवसांत मिळून सरासरी 279 रुग्ण दररोज या गतीने तालुक्यातील 8 हजार 655 जणांना कोविडची लागण झाली. अर्थात यातील जवळपास दोन हजार रुग्ण अन्य तालुके अथवा जिल्ह्यातील असल्याने नंतरच्या काळात तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येतून त्यांची नावे कमी करण्यात आल्याने प्रशासनाने मे महिन्यात तालुक्यातील बाधितांची संख्या 6 हजार 566 जाहीर केली.


मे प्रमाणेच जूनमध्येही संक्रमणाचा आलेख उंचावत जाईल असा अंदाज बहुतेकांनी लावला होता. मात्र पर्जन्याचे आगमन होवून सर्वत्र चैतन्य निर्माण करणार्‍या जूनने पहिल्या दोन दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्याला दिलासा देण्यास सुरुवात केली. जूनच्या पहिल्या दहा दिवसांत संगमनेर तालुक्याचा उंचावलेला आलेख जवळपास तिपटीने कमी झाला आणि 79 रुग्ण दररोज या गतीने तालुक्यात 788 रुग्णांची भर पडली. नंतरच्या दहा दिवसांत त्यातही मोठी घट झाली आणि सरासरी 384 वर येवून 384 रुग्ण समोर आले. तर महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत सरासरीत आणखी घट होवून ती 31 रुग्णांवर येवून तालुक्यातील 309 रुग्ण बाधित झाल्याचे समोर आले. महिन्याभरातील 30 दिवसांत सरासरी 49.36 या वेगाने तालुक्यातून 1 हजार 481 रुग्ण आढळले. त्याचवेळी जिल्ह्याची सरासरीही 2 हजार 809 रुग्ण प्रती दिवसावरुन थेट 591 रुग्णांवर येवून जूनच्या 30 दिवसांत जिल्ह्यातून 17 हजार 719 रुग्ण समोर आले.


मागील आठ दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या दैनिक रुग्णसंख्येत चढउतार अनुभवायला मिळत असला तरीही 22 जूनची उंचावलेली रुग्णसंख्या वगळता तालुक्यातून चाळीसपेक्षा कमी रुग्ण समोर येण्याची श्रृंखला आजही अव्याहत आहे. आजही खासगी प्रयोगशाळेचे 18 आणि रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून 12 अशा एकूण 30 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात संगमनेर शहरातील नायकवाडपूरा परिसरातील 18 वर्षीय तरुणीसह संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 47 वर्षीय महिलेसह 35 व 26 वर्षीय तरुणांना कोविडची लागण झाली आहे. त्यासोबतच ग्रामीणभागातील पंधरा गावांमधील 26 जणांचे अहवालही आज पॉझिटिव्ह आले आहेत.


तालुक्याच्या ग्रामीणभागातील बाटा येथील 43 वर्षीय इसमासह 43 व 37 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, मिरपूर येथील 52 व 43 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 24 वर्षीय महिला, गोल्ड सिटीतील 63 वर्षीय इसमासह 56 वर्षीय महिला, खांडगाव येथील 46 वर्षीय इसमासह 39 वर्षीय तरुण व 23 वर्षीय महिला, ओझर येथील 30 वर्षीय महिला, पिंपळे येथील 88 वर्षीय महिला, घारगाव येथील 71 वर्षीय महिला, रायते येथील 10 वर्षीय मुलगी, घुलेवाडीतील संगम सोसायटी परिसरातील 79 वर्षीय वयोवृद्ध इसमासह साईश्रद्धा चौकातील 56 वर्षीय इसम व 51 वर्षीय महिला, हिरेवाडीतील 70 वर्षीय महिला, दाढ येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खळी येथील 52 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 23 व 19 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 47 वर्षीय इसम व आंबी खालसा येथील 20 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


गेल्या महिन्याभरापासून कोविड मुक्तिच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या अहमदनगर जिल्ह्याच्या कोविड संक्रमणात आज काहीशी वाढ झाल्याचे समोर आले. त्यात पाथर्डी 65, श्रीगोंदा 62 व पारनेर 56 या तीन तालुक्यातील संक्रमणात वाढ झाली. उर्वरीत तालुक्यातील राहाता 37, राहुरी 36, जामखेड 33, संगमनेर व नगर ग्रामीण प्रत्येकी 30, नेवासा 28, शेवगाव 26, कोपरगाव 18, अहमदनगर महापालिका क्षेत्र व कर्जत प्रत्येकी 16, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी 13, भिंगार लष्करी परिसर व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी तीन व लष्करी रुग्णालयातील दोघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 80 हजार 341 झाली आहे.

Visits: 134 Today: 2 Total: 1416798

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *