‘संगमनेर 2.0’ अंतर्गत नगरपालिका ‘अॅक्शन’ मोडमध्ये! सातत्य राखणार की ‘फार्स’ ठरणार?; मोकळ्या जागांवर वाहनांचा ताबा नको..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘आपल्याला हे करावेच लागेल!’ या आशयाच्या जाहिरातबाजीतून शपथविधीपासूनच सुरु झालेली ‘संगमनेर 2.0’ची घोषणा ‘अखेर’ आज प्रत्यक्षात उतरल्याचे बघायला मिळाले. गेल्याकाही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या आजच्या दिनी सकाळीच पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन स्वतंत्र पथकांसह नवीन नगररोड आणि अकोले रस्त्यावरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कोंडलेल्या या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. प्रचंड वर्दळीच्या या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमण हटवली गेल्याने अनेक दिवसांनी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याचे समाधानकारक चित्रही दिसून आले. मात्र त्याचवेळी रस्त्यावर रोजीरोटी कमावणार्यांना हटवून रिकाम्या केलेल्या जागांवर बेशिस्त चारचाकी चालकांचे अतिक्रमण झाल्याचेही बघायला मिळाले. पैशाच्या जोरावर अलिशान वाहने खरेदी करणार्या मात्र वाहतूक नियमांबाबत अक्कलशून्य असलेल्या वाहनधारकांची संगमनेरातही मोठी संख्या आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांनी या मोकळ्या जागांवर अतिक्रमण केल्यास ही मोहीम गरीबांच्या पोटावर लाथ मारणारी ठरेल याचेही भान ठेवण्याची गरज आहे.

चार-सहा नूतन शासकीय इमारतींच्या बळावर ‘वैभवशाली’चा ढोल बडवणार्या संगमनेर शहरातील अंतर्गत व्यवस्था अतिशय गचाळ आहे. गेल्या दोन-तीन दशकांत गावठाणाच्या मर्यादा ओलांडून शहराचा उत्तर-पश्चिम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. मात्र मुख्य बाजारपेठ गावठाणातच असल्याने दररोज शहरात येणार्यांची मोठी संख्या असते. अलिकडच्या काळात त्यात आता चारचाकी वाहनांसह येणार्यांची भर पडू लागल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची ठरत आहे. त्यातच प्रत्येक वर्दळीच्या रस्त्यावर पथार्या टाकून बसलेले, फेरीविक्रेते, फळविक्रेते आणि दुकानदारांच्या अतिरीक्त दुकानांमुळे जागोजागी बेशिस्तीचेही दर्शन घडत आहे. पार्किंगच्या सुविधा नसतानाही गावठाणातील मोठ्या दालनांना, बँकांना सर्रास डोळे झाकून परवानगी दिली जात असल्याने या बेशिस्तीत रोज भर पडत आहे.

गावठाणासह प्रचंड वर्दळीच्या बसस्थानक परिसर व अकोले नाक्यावर भररस्त्यात दुकान, फळांच्या हातगाड्या घेवून अपघाताचे, वाहतूक कोंडीचे कारण ठरणार्यांमध्ये महानगरात उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी ‘बाद’ ठरवून भंगारात काढलेल्या रिक्षांचा सर्रास प्रवाशी वाहतुकीसाठी वापर करणार्यांचाही संगमनेरात मोठा भरणा आहे. यातील काही महाभागांनी तर चक्क रस्त्यातच गळून पडतील अशा अवस्थेतील रिक्षांना चक्क एलपीजी गॅस किट बसवून प्रवाशांच्या जीवाशी उघड खेळही चालवला आहे. शहरात अधिकृत परवानाधारक रिक्षांपेक्षा अशा भंगारातून आणलेल्या आणि रस्त्यारस्त्यावर अपघाताची शक्यता घेवून फिरणार्या रिक्षांचे बेकायदा थांबेही वाहतुकीसाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. यातील काही थांब्यांना तर ‘राजाश्रय‘ असल्याचे आरोपही यापूर्वी झाले आहेत. त्यामुळे आजवर पालिकेने त्यांना कधीही हटवण्याचे सामर्थ्य दाखवले नव्हते. या कारवाईत अशा बेकायदा रिक्षाथांब्यांनाही हटवले गेले तरच खर्याअर्थी ही मोहीम पारदर्शी ठरेल.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘वैभवशाली’चा अभासी फूगा फुटल्यानंतर सावध झालेल्या पालिकेतील सत्ताधारी गटाने पालिकेच्या निवडणुकीत ‘संगमनेर 2.0’चे ‘व्हिजन’ दाखवून लोकांचा विश्वास मिळवला होता. त्यामुळे त्यांच्याकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होणं अपेक्षित असतांनाच गेल्या आठ दिवसांपासून त्याच्या पहिल्या टप्प्यातील गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी ‘आपल्याला हे करावेच लागेल!’ अशा प्रकारची जाहिरातबाजी सुरु झाली होती. त्यानुसार आजपासून (ता.2) पालिकेच्या बांधकाम व अतिक्रमण विभागाकडून नवीन नगररोड व अकोले रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी नगर रस्त्यावरील काही टपरीधारकांनी आधी मोठ्यांची काढा, आम्ही स्वतः आमची काढून घेतो असे आव्हान देत विरोधही केला, मात्र तो फारकाळ टीकला नाही. या मोहिमेत रस्त्यावर आलेल्या पायर्या, ओटे, पेव्हींग ब्लॉक, सुरक्षा अँगल, फलक अशा गोष्टीही हटवण्यात आल्या.

त्यामुळे इतरवेळी अतिक्रमण, बेशिस्त वाहनधारकांमुळे वारंवार कोंडीत अडकणारे हे दोन्ही रस्ते आज मोकळा श्वास घेत होते. काही ठिकाणच्या टपर्या व हातगाड्या हटवल्यानंतर लागलीच तेथे आसपासच्या दुकानदार व त्यांच्या ग्राहकांनी आपली चारचाकी वाहने लावून रिकाम्या केलेल्या जागेवर अस्थायी अतिक्रमण करुन तात्पूरते अडथळे निर्माण केले. हा प्रकार गरीबांच्या पोटावर लाथ मारुन बेशिस्त वाहनधारकांना त्यांच्या बेशिस्तीसाठी जागा मोकळी करुन देण्यासारखा असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही त्यातून समोर येवू लागल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून पालिकेने आपल्या अधिकारांची तरतूद अभ्यासून अथवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन शहराला कायमस्वरुपी शिस्त लागावी यासाठी सक्रिय अतिक्रमण पथकासह टोईंग पद्धतही सुरु केली पाहीजे. ज्याद्वारे मनात येईल तेथे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने उभी करुन सामान्य वाहतूकदाराला त्रास देणार्या अशा ‘अक्कलशून्य’ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करुन पालिकेला उत्पन्नाचा स्रोतही निर्माण करता येईल.

संगमनेर 2.0 अंतर्गत पालिकेने आजपासून शहरात सक्तिचे धोरण स्वीकारल्याचा अभास निर्माण केला असला तरीही त्यातील वास्तव समोर यायला पुढील काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पालिकेने सुरु केलेल्या अतिक्रमण हटाओ मोहीमेतून शहरातील रस्ते मोकळे आणि वाहतूक शिस्तीत सुरु असल्याचे दिलासादायक चित्र आज बघायला मिळाले. मात्र ही कारवाई नेहमीप्रमाणे ‘फार्स’ ठरते की आज मिळणारा दिलासा कायम राहतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोबतच ज्याप्रमाणे अतिक्रमणांमधून शहराच्या सौंदर्याला डाग लागतो, त्याप्रमाणे बेशिस्त पार्किंगमधूनही त्याचे दर्शन घडत असल्याने या मोहिमेतून मुक्त झालेल्या रस्त्यांवर असे बेशिस्त वाहनधारक अतिक्रमण करणार नाहीत याचीही काळजी घेण्याची गरज आहे. सोबतच अशा बेशिस्तांना शिस्तीचा चाप लावण्यासाठी पालिकेने टोईंग पद्धत सुरु करुन दंड आरणीलाही सुरुवात करण्याची गरज आहे.

