आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरात हल्ला! सार्वजनिक कार्यक्रमात झाले होते सहभागी; सुरक्षारक्षकांनी आरोपीला ताब्यात घेतले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करुन अवघ्या महाराष्ट्रात ‘जायंट किलर’ म्हणून परिचित झालेल्या महायुतीच्या आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात माथेफिरुकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील हल्लेखोराला आमदार खताळ यांच्या सुरक्षारक्षकासह खासगी सुरक्षा रक्षकांनी तत्काळ जेरबंद केले असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरासह संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला असून ऐन गणेशोत्सवात पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमदार अमोल खताळ मालपाणी लॉन्स या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना ते उपस्थित असलेल्या प्रेक्षकांशी हस्तांदोलन करीत असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या खांडगावच्या एकाने त्यांच्यावर हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सुरक्षारक्षकाने तत्काळ हल्लेखोरावर झडप घातली, हा प्रकार पाहून आसपास उपस्थित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनीही घटनास्थळावर धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेत त्याला कार्यालयात नेऊन कोंडले. 
सदरची वार्ता परिसरात तणाव निर्माण करणारी ठरली. या घटनेनंतर उपस्थितांमधील अनेकांसह ही घटना शहरात कळल्यानंतर काही वेळातच शेकडो तरुणांनी मालपाणी लॉन्सच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी हजर होत ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराला पोलीस ठाण्यात आणण्याची तयारी सुरु केली आहे. या घटनेने ऐन गणेशोत्सवात संगमनेरातील राजकारण तापण्याची शक्यता असून तालुक्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे, या घटनेनंतर शहरातील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे, पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटाही मागवण्यात आल्याचे वृत्त आहे.
Visits: 1532 Today: 5 Total: 1109340

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *