जिल्हा बँकेतील ‘समेटा’ची संगमनेर पालिकेच्या ‘फ्लेक्स’वरही सावली! डॉ.सुजय विखेंच्या आभाराचा फलक; शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची कुजबुज..


श्याम तिवारी, संगमनेर
राजकारणात कधी कोण कोणाच्या विरोधात उभे राहील आणि कधी कोण कोणाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील, याचा नेम नसतो. मात्र सहकाराच्या निमित्ताने जिल्हा बँकेत एकमेकांच्या हातात हात घालणार्‍या विखे-थोरातांच्या राजकीय समीकरणांची सावली आता थेट संगमनेर नगरपालिकेच्या विकासकामांच्या फलकांवरही पडू लागल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या स्वीपींग मशिनच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्षा मैथिली तांबे यांच्या वतीने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे-पाटील यांचे जाहीर आभार मानणारा भलामोठा फ्लेक्स झळकला. मात्र या फलकाबाबत स्वतः सुजय विखेच अनभिज्ञ असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने आभाराचा हा फलक नेमका कोणत्या राजकीय संदेशासाठी उभारला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील समेटानंतर संगमनेरच्या स्थानिक राजकारणातही नवे प्रवाह आकार घेत आहेत का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.


अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात हे दोन परस्परविरोधी राजकीय प्रवाह आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही गटांमधील संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र यंदाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत या संघर्षाला सहकाराच्या हिताचे कारण पुढे करीत वेगळी दिशा देण्यात आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्रितपणे सहमतीचे राजकारण स्वीकारले. बँकेच्या 21 संचालकपदांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या. त्यातील दहा जागांवर विखे-थोरात गटाशी संबंधित उमेदवार निवडून आले. उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतरही या सहमतीच्या राजकारणाचे जिल्ह्यातील राजकीय परिणाम चर्चेत आहेत. अर्थात, सहकारातील समन्वय म्हणजे पक्षीय राजकारणातील युती नव्हे, अशी भूमिका डॉ.सुजय विखे यांनीही स्पष्ट केली आहे.


याच पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेचा बुधवारचा कार्यक्रम अधिक चर्चेत आला. गेल्या दोन दशकांपासून स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवणार्‍या संगमनेर नगरपालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून स्वीपींग मशिन उपलब्ध झाले. आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी राज्यातील एकमेव नगरपालिकेला हे वाहन प्राधान्याने दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पुढील पाच वर्षे चालक, कर्मचारी आणि देखभालीसह या वाहनाची जबाबदारी संबंधित यंत्रणेकडून घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासह शहराच्या स्वच्छतेला त्याचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मात्र विकासकामांच्या या कार्यक्रमातील सर्वाधिक राजकीय चर्चेचा विषय ठरला तो सुजय विखे यांच्या नावाचा आभारफलक. थोरात यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयापासून स्वच्छता वाहनांची मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी व्यासपीठावर बाळासाहेब थोरात आपल्या कन्येसह उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पालिकेच्या विकासकामांचा आढावा घेतला. मात्र जिल्हा बँकेतील राजकीय समेट अथवा सत्ताधार्‍यांवर टीका करण्याचा मुद्दा त्यांच्या भाषणात आला नाही. दुसरीकडे तांबे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना विरोधकांच्या श्रेयवादाच्या भूमिकेवरही निशाणा साधला. वाहन नेमके कोठून आले, याची माहिती नसताना नारळ फोडण्याच्या श्रेयासाठी पुढाकार घेतल्याची टीका त्यांनी केली.


या सगळ्याला अधिकच वेगळे वळण मिळाले ते डॉ.सुजय विखे यांच्या प्रतिक्रियेमुळे. हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या विखे यांना आभारफलकाबाबत विचारले असता, मी ते फ्लेक्स बोर्ड पाहिलेलेच नाहीत. त्यांनी का लावले आणि कशासाठी आभार व्यक्त करीत आहेत, याची मला काहीही माहिती नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर, त्यांनी तसे फलक लावले असतील तर त्यांचे आभारच मानतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे ज्या नेत्याच्या नावाने आभार व्यक्त करण्यात आले, त्यांनाच त्यामागील कारणाची माहिती नसल्याचे चित्र समोर आले. हा केवळ औपचारिक आभारप्रदर्शनाचा प्रकार होता की त्यामागे काही स्थानिक राजकीय संकेत होते, याचे उत्तर मात्र अनुत्तरित राहिले.


वास्तविक सत्यजित तांबे आणि सुजय विखे यांच्यातील राजकीय संवाद आणि जवळीक नवीन नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही विखे यांनी भूमिपुत्राचा मुद्दा पुढे करीत तांबे यांना पाठिंबा दिला होता. आमदार झाल्यानंतर तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने समन्वय साधत संगमनेरच्या विकासासाठी निधी आणि विविध सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच पालिकेला मिळालेल्या या वाहनाकडेही विकासकामांच्या राजकारणातील एक महत्त्वाचा दाखला म्हणून पाहिले जात आहे.


मात्र या घडामोडींची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. एकीकडे थोरात आणि विखे यांच्यात सहकाराच्या व्यासपीठावर समन्वय निर्माण झाला असला, तरी विधानसभा आणि पक्षीय राजकारणातील त्यांचे स्वतंत्र प्रवाह कायम असल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे संगमनेरमध्ये थोरात, तांबे आणि विखे या तिन्ही राजकीय प्रवाहांमधील संबंधांचे नवे संदर्भ पुढे येत आहेत. पालिकेच्या विकासासाठी सत्ताधार्‍यांशी समन्वय साधणे ही आमदारांची राजकीय गरज असू शकते. मात्र त्याचवेळी विरोधकांशी असलेले स्थानिक संबंध आणि आगामी राजकीय भूमिका यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणेही स्वाभाविक आहे.
जिल्हा बँकेतील सहमतीचे राजकारण आता संगमनेर पालिकेच्या फलकावर झळकले असले, तरी त्याचा अर्थ स्थानिक राजकीय समीकरणांची फेरमांडणी असा काढणे घाईचे ठरेल. मात्र विकासाच्या नावाखालील समन्वय, राजकीय व्यासपीठावरील मौन आणि आभाराच्या फलकाबाबतची अनभिज्ञता या तीन गोष्टींनी संगमनेरच्या राजकारणात नक्कीच नवी चर्चा पेरली आहे. जिल्हा बँकेतील समेट सहकारापुरताच राहणार की, त्याचे पडसाद संगमनेरच्या आगामी राजकारणातही उमटणार, याचे उत्तर येणारा काळच देईल, मात्र आमदार तांबे यांनी लावलेल्या त्या आभार फलकाने संगमनेरचे राजकारण ढवळले हे मात्र निश्‍चित.

Visits: 3 Today: 3 Total: 2284438

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *