‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान.. अन् इंदोरीकर महाराजांचे लेकीसाठी कोटींचे लग्न-विधान’! महाराजांची लेकीच्या लग्नात शाही उधळपट्टी; राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह 15 हजार पाहुण्यांचा पाहुणचार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘अरेऽ, कशाला कर्ज काढून लेकीचं लगीन करता? कशाला त्या पाहुण्यांना बासुंदी-पुरी घालता? लोक जेवतील आणि बाहेर जाऊन म्हणतील गुळचट झाली होती! आपली ऐपत बघून वागा..’ अशा शब्दांत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात कीर्तनाच्या मंचावरुन बापाचे कान उपटणारे, जमिनी विकून लग्नाचा थाट करणार्यांना ‘घोडे लावणारे’ प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) सध्या स्वतःच टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निमित्त आहे, त्यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि उद्योजक सुनील चिलप यांचे चिरंजीव साहील यांच्या रविवारी (ता.3) गुंजाळवाडी शिवारात पार पडणार्या शाही विवाह सोहळ्याचे. ज्या महाराजांनी आयुष्यभर साधेपणा हाच वारकरी धर्माचा मूळ पाया असल्याचे सांगितले, त्याच महाराजांच्या लेकीच्या लग्नात मात्र ‘साधेपणाचा’ पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. साखरपुड्यातील खर्चावरुन झालेल्या टीकेला ‘माझ्याकडे आहे म्हणून खर्च करतोय, ज्याच्याकडे नाही त्याने कर्ज काढू नका’, असे उत्तर देऊन त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता लग्नात होणारी कोटींची उधळण पाहता, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीचे काय? असा प्रश्न वारकरी संप्रदायातील अनेकांना पडला आहे.

संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी शिवारात या सोहळ्यासाठी एखाद्या मोठ्या सप्ताहासारखी तयारी करण्यात आली आहे. एकीकडे दुष्काळाचे सावट असताना, दुसरीकडे महाराजांच्या लेकीसाठी शंभर एकरांच्या मळ्यात भव्य आणि दिव्य मांडव उभारण्यात आला आहे. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी ज्ञानमाता विद्यालयाच्या मैदानावर खास हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली असून, मुख्यमंत्री फडणवीस शिर्डीवरुन मोटारीने संगमनेरला येणार आहेत. या ‘व्हीव्हीआयपी’ उपस्थितीमुळे सध्या गुंजाळवाडीच्या या परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचे रुप आले आहे.

आपल्या कीर्तनात नेहमी लोक काय म्हणतील? यावर सडकून प्रहार करणार्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नात मात्र टीकाकारांना जुमानलेले नाही. साखरपुड्याच्या वेळी झालेल्या टीकेवर त्यांनी आपल्या खास ठसकेबाज शैलीत समर्थन केले होते, ‘अहो, मी रात्रंदिवस पायपीट केली, घसा कोरडा केला, तेव्हा हे पैसे कमावलेत. माझ्याकडे आहे, म्हणून मी लेकीचे कौतुक करतोय. ज्याच्याकडे नाही, त्याने मला बघून कर्ज काढू नका’ असे म्हणत त्यांनी साखरपुड्यावरील अमाप उधळपट्टीनंतरही टीकाकारांना दिलेल्या प्रत्यूत्तरात म्हटलं होते. परंतु, यानंतरही प्रश्न उरतो की, जेव्हा एखाद्या सार्वजनिक मंचावरुन एखादा प्रबोधनकार आदर्श घालून देतो, स्वतः मात्र त्याचे पालन करीत नाही. अशावेळी त्यांचे अनुयायी त्यांचे शब्द किती पाळतील?, दुसर्याच्या लग्नात ‘गुळवणी’ आणि स्वतःच्या लग्नात ‘पुरणपोळी’ असाच हा प्रकार असल्याची टीका आता सोशल मीडियातून सुरु आहे.

या लग्नसोहळ्यासाठी सुमारे 15 हजार पाहुण्यांच्या शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगागिरी सप्ताहाच्या शंभर एकर मैदानावर ज्या पद्धतीने पंगती बसवण्यात आल्या होत्या, तशीच काहीशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. जेवणाच्या मेनुपासून ते मंडपाच्या सजावटीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ‘राजेशाही’ थाट जाणवत आहे. कीर्तनातून ‘लग्नात जेवणावर पैसे वाया घालवू नका, त्यापेक्षा एखाद्या गरिबाच्या पोराचे शिक्षण करा’ असे सांगणार्या महाराजांच्या या कृतीने त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले॥
कोरडे ज्ञान सांगती लोकां। आपण न मिळे त्या सुखा॥’
महाराजांचे कीर्तन म्हणजे विनोदाची कारंजी आणि समाजातील दोषांवर ओढलेले कोरडेच. ‘लग्नाचा मांडव असा नसावा की बापाची अब्रू गळून पडेल’! असे म्हणणार्या निवृत्ती महाराजांच्या या शाही डोलार्यातून त्यांच्याच शब्दांची ‘पूरचुंडी’ झाल्याचे चित्र दिसत असून हा विवाह सोहळा केवळ एक कौटुंबिक कार्यक्रम न राहता, तो समाजप्रबोधनाचा दुटप्पीपणा दाखवणारा ‘दर्पण’ही ठरणार आहे.

