मतदार यादीच्या सुनावणीतच राजकीय हाणामारीचा ‘फड’! माजी नगराध्यक्षांना मारहाण झाल्याची चर्चा; परस्परविरोधी तक्रारींसाठी पोलीस ठाण्यात गर्दी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मतदारयादीतील नावांच्या शुद्धीकरणासाठी सुरु असलेल्या सुनावणीचे निमित्त आणि त्यातून उफाळलेला जुना राजकीय संघर्ष.. यामुळे संगमनेर नगरपालिकेचे प्रशासकीय दालन मंगळवारी दुपारी चक्क आखाड्यात रुपांतरित झाले होते. एकाच प्रभागातील राजकीय विरोधक असलेल्या दोन गटांमध्ये प्रशासन अधिकार्‍यांसमोरच शाब्दीक चकमकीचे रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाल्याची घटना घडली. या झटापटीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकाला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, या प्रकारानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने राजकीय संघर्षाची धग पुन्हा एकदा वाढली आहे. वृत्त लिहिपर्यंत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.3) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेतील प्रशासन अधिकार्‍यांच्या दालनातच हा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरु असलेल्या मतदारयादीच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेत वगळण्यात आलेल्या मतदारांना आपली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार संगमनेर शहरातील वगळलेल्या नावांबाबत मुख्याधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत उपमुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकार्‍यांसमोर सुनावणी सुरु होती.


याच प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक पाचमधील एका सुनावणीने राजकीय वादाचे स्वरुप धारण केले. एका बाजूची सुनावणी सुरु असतानाच माजी नगराध्यक्षांसह दुसर्‍या बाजूचे काहीजण थेट दालनात पोहोचले. नियमानुसार सुनावणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना दालनात प्रवेश देणे अपेक्षित नसताना घडलेल्या या प्रकारातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक चकमक सुरु झाली. पाहता पाहता या वादाचा आवाज वाढत गेला आणि प्रशासकीय कामकाजाचे दालन राजकीय संघर्षाचे केंद्र बनले.


पालिकेच्या कार्यालयात सुरुअसलेला हा वाद अधिक चिघळू नये, यासाठी प्रशासन अधिकार्‍यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींना दालनाबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्यामुळे परिस्थिती निवळण्याऐवजी बाहेर जमलेल्या समर्थकांमध्येही वादाची ठिणगी पडली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली. या झटापटीत माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या पुतण्याला मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की होऊन मारहाण झाल्याची चर्चा आहे. या गोंधळात माजी नगराध्यक्षांचा चष्मा आणि कुडत्याची बटणेही तुटल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार नगरपालिकेच्या इमारतीत घडल्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये या घटनेचे चित्रण झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमका वाद कसा सुरु झाला, कोणाकडून कोणाला धक्काबुक्की झाली आणि प्रत्यक्ष मारहाणीचा प्रकार घडला का, याचा उलगडा सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासातून होण्याची शक्यता आहे


पालिकेतील या प्रकारानंतर संबंधित माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या पुतण्याने तातडीने शहर पोलीस ठाणे गाठले. ही बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनीही पोलीस ठाण्यात गर्दी केली. दुसर्‍या बाजूच्या मंडळींनीही पोलीस ठाण्यात पोहोचून आपली भूमिका मांडली. दोन्ही गट परस्पर राजकीय विरोधक आणि भिन्न विचारप्रवाहातील असल्याने या प्रकरणात तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंना स्वतंत्र तक्रारी देण्याची मुभा दिली आहे. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.


या घटनेला केवळ मतदारयादीच्या सुनावणीचे केवळ निमित्त आहे. यामागे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये धुमसत असलेल्या राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. गत नवरात्रोत्सवात एकाच प्रभागात आल्याड-पल्याड बाजूला दोन्ही गटांनी स्वतंत्र मंडप उभारुन उत्सव साजरा केला होता. त्यावेळी ध्वनिक्षेपकाच्या आवाजावरुन एका गटाने तक्रार केल्यानंतर संबंधित मंडळाला पोलिसांनी समज देण्यासह नोटीसही बजावली होती. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये निर्माण झालेली कटुता अद्याप कायम असल्याचे आजच्या घटनेवरुन दिसून आले.


मतदार यादीतील नावांच्या सुनावणीसारख्या पूर्णतः प्रशासकीय प्रक्रियेतही राजकीय वैमनस्याचा शिरकाव झाल्याने नगरपालिकेतील कामकाजाच्या वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासन अधिकार्‍यांच्या दालनातच असा प्रकार घडल्याने पालिकेची सुरक्षा व्यवस्था सुनावणीच्यावेळी नेमकी कोठे कार्यरत असते असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून तुलनेने शांत असलेले संगमनेरचे राजकीय वातावरण या घटनेने पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकाराबाबत पोलीस तपासात नेमके काय समोर येते, सीसीटीव्ही फुटेजमधून कोणाची भूमिका स्पष्ट होते आणि परस्परविरोधी तक्रारींवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. नगरपालिकेच्या दालनात पेटलेला हा राजकीय वाद आगामी काळात आणखी कोणते वळण घेतो, हे पाहणे देखील आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 2277542

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *