पूर्वग्रहासाठी शासकीय इमारतींचा वापर चिंताजनक! पालिकेतील घटनेवरुन शहरात नाराजी; राजकीय मर्यादा पाळण्याचीही अपेक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वेगवेगळ्या प्रभागात एकापेक्षा अधिक मालमत्ता धारण केलेल्या मतदाराचे नाव कोणत्या प्रभागात समावीष्ट असावे यावरुन मंगळवारी दोन राजकीय विरोधक एकमेकांना भिडले. सामान्यतः राजकीय प्रतिस्पर्धेतून असेप्रकार नियमित मानले जात असले तरीही त्यासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शासकीय इमारतीचा वापर करण्यासह आजवर पाळल्या गेलेल्या राजकीय मर्यादांचे उल्लंघन चिंताजनक आहे. या घटनेला दोघांमधील वादाची पार्श्वभूमी असल्याचे परस्परविरोधी तक्रारीतूनही समोर आले आहे. मात्र आपल्या मनातील उणीदुणी काढण्यासाठी थेट अधिकार्यांच्या दालनातच एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रकार सुसंस्कृत शहराची प्रतिमा डागाळणारा असल्याने शहरातूनही नाराजी व्यक्त होवू लागली आहे.

वर्षभरापूर्वी पार पडलेल्या पालिका निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने सर्व अंदाज फोल ठरवताना विरोधकांचा सुपडा साफ केला. देशासह राज्यात वाहणार्या हिंदुत्त्वाच्या वार्याचा झोत पाहून अनेकांनी निवडणुकीपूर्वीच स्वतःचा भावी नगरसेवक म्हणून सोशल माध्यमात राज्याभिषेकही उरकल्याची असंख्य उदाहरणे त्यावेळी समोर आली होती. मात्र त्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरताना सेवासमितीने प्रभाग तेरामधील महिला राखीव मतदारसंघासह अन्य एक अपवाद वगळता निर्विवाद वर्चस्व राखले. या निवडणुकीने अनेकांच्या स्वप्नांना माती मिळाल्याने नंतरचा काही काळ निवडक विजयी आणि पराभूत उमेदवारांसह त्यांच्या सर्मथकांमध्ये शाब्दीक बाचाबाची घडण्याचे प्रकारही त्यावेळी समोर आले, स्थानिक निवडणुकांनंतर साधारणतः अनेकवेळा अशी स्थिती निर्माण होतच असते.

मात्र मंगळवारी पालिकेच्या आवारात घडलेल्या या धक्कादायक प्रकारात वर्षभरानंतरही पराभवाची सल आजही मनात कायम असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. प्रभाग क्रमांक पाचमधील एका महिला मतदाराचे नाव त्यांच्या शहरातील दुसर्या प्रभागातील मालमत्तेच्या आधारे त्या प्रभागात असावे की आहे त्या प्रभागात यावरुन वादाची ठिणगी पेटली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहणार्या शिवाजी अभंग यांनी त्यावर आपला आक्षेप नोंदवल्याने संबंधित महिलेचे नाव कमी करण्यात आले होते. त्यावर प्रतिवाद करण्यासाठी ‘त्या’ महिलेच्यावतीने त्या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचा पुतण्या वैष्णव पालिकेत आला. मात्र सुनावणीसाठी हजर असलेल्या विरोधकांची संख्या पाहून त्याने काकाला फोन करुन बोलावून घेतले.

मुख्याधिकार्यांच्या दालनात सुनावणी सुरु असतानाच माजीनगराध्यक्षांसह त्यांच्या पुतण्याने थेट आत प्रवेश केल्याने वादाचा भडका उडाला आणि दोन्ही बाजूने शिवीगाळ, धक्काबुक्कीला सुरुवात झाली. या दरम्यान पालिकेच्या अन्य अधिकारी व कर्मचार्यांनी दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला देत दालनातून बाहेर काढले. त्यावेळी वैष्णव मुर्तडक आणि राहुल म्हस्के यांच्यात झटापट झाली. त्याची परिणीती एकमेकांकडून आव्हान-प्रतिआव्हान दिले गेल्याने पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच दोन्ही गटांत धुमश्चक्री उडाली. या गदारोळात पालिकेच्या इतिहासात जनतेतून पहिल्यांदा निवड झालेल्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्वास मुर्तडक यांनाही मारहाण करीत धक्काबुक्की केल्याने ते जमिनीवर पडले व त्याचा चष्माही फूटला. पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गटांना वेगळे करुन पालिकेच्या आवारातून बाहेर पाठवण्यात आले.

या प्रकारणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी वैष्णव राजकुमार मुर्तडक याच्या फिर्यादीवरुन शिवाजी अभंग, सचिन धाडगे, रविंद्र म्हस्के, राहुल म्हस्के, सचिन ढोले, राजू मंडलिक व नीलेश गाडेकर यांच्या विरोधात तर, शिवाजी रामनाथ अभंग यांच्या फिर्यादीवरुन विश्वास मुर्तडक, वैष्णव मुर्तडक, यशवंत मुर्तडक, अमोल झांबरे, अक्षय मुर्तडक व आशिष कोठवळ अशा सहा जणांसह दोन्ही बाजूच्या एकूण 13 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 115 (2), 189 (2), 191 (2), 190, 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गेली काही महिने शांत असलेल्या संगमनेरच्या राजकारणाला नव्याने फोडणी मिळाली असून येणार्या काळात त्याचा तडका अनुभवास येण्याची शक्यता आहे.

हा संपूर्ण प्रकार निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्या सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतून नाव कमी झालेल्या महिला मतदारावरुन शासकीय इमारतीत घडल्याने या घटनेबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून आपले राजकीय वाद शमवण्यासाठी शासकीय इमारतींचा वापर होवू लागल्याने चिंताही व्यक्त होवू लागली आहे. गावचा कारभार चालणारी ठिकाणं अशाप्रकारांपासून दूर असल्याची आपली राजकीय परंपरा राहीली आहे, त्याला डागाळण्याचे काम मंगळवारच्या प्रकारातून घडल्याने शहरातून तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर रात्री उशिराने दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप करीत गुन्हे दाखल केले गेल्याने दोन्ही गटातील शत्रूत्वाची दरीही आणखी रुंदावली आहे हे मात्र निश्चित.

सन 1954 मध्ये भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या दरम्यान बाबासाहेबांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपले दुसरे मत न टाकता गोठवण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यावेळी राखीव व सर्वसाधारण मतदारसंघ अशी दोन मतं होती. ही गोष्ट बाबासाहेबांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ ‘त्या’ कार्यकर्त्यांना पाचारण करुन ‘मी देशाची राज्यघटना लिहिली आहे, अशाप्रकारे मतं गोठवणे किंवा वाया घालवणे घटनाविरोधी कृत्य आहे. माझे अनुयायी जर घटनाविरोधी वागणार असतील तर मी पराभूत झालो तरीही चालेल, पण मी हा प्रकार खपवून घेणार नाही’ असा परखड इशारा देत त्यांनी आपला पराभव पत्करला मात्र संविधान आणि लोकशाहीच्या शुचितेला धक्का लागू दिला नव्हता. तो काळ आता खूप मागे राहुन गेलाय असंच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

