दुष्काळातही संगमनेरच्या सराफा बाजारात ‘धनधनाट’! अंदाजे 25 ते 30 कोटींची उलाढाल; महिनाभरात हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक अर्थकारणातील अस्थिरता, सोन्या-चांदीच्या दरांतील चढ-उतार आणि राज्यावर घोंगावणारे दुष्काळाचे सावट अशा प्रतिकूल स्थितीत यंदाच्या दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट असतानाच संगमनेरच्या बाजारपेठेने मात्र या अंदाजांना छेद दिला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर वाहन बाजारात झालेल्या विक्रमी उलाढालीनंतर आता धनत्रयोदशीच्या पहिल्याच मुहूर्तावर सराफा बाजारात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले. या एकाच दिवसात सोन्या-चांदीच्या व्यापारात 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज असून, किराणा-भुसार मालापासून सोन्या-चांदीच्या दागिन्यांपर्यंत विस्तारलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेची यंदाच्या दिवाळीतील महिनाभराची एकत्रित उलाढाल एक हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून संगमनेरचा लौकीक आहे. किराणा व भुसार मालाची घाऊक बाजारपेठ, तेल-तूप, कापड, रेडिमेड वस्तू, वाहनांची दालने, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोन्या-चांदीच्या नामांकित पेढ्या यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी संगमनेर महत्त्वाचे खरेदी केंद्र ठरले आहे. दिवाळीच्या काळात या बाजारपेठेतील व्यवहारांना विशेष गती मिळते. नवीन कपडे, गृहसजावट, फराळाचे साहित्य, इलेक्टॉनिक वस्तू, वाहन खरेदी आणि सुवर्णालंकार अशा विविध वस्तूंच्या खरेदीतून स्थानिक अर्थचक्राला मोठी चालना मिळते.

यंदा आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या किमतींनी उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यानंतरच्या जागतिक घडामोडींमुळे दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरु असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दुसरीकडे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसण्याचीही दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्याच यादीत समावेश झाल्याने यंदाच्या दिवाळीतील खरेदीवर त्याचे तीव्र परिणाम उमटतील, असा व्यापारीवर्गाचा अंदाज होता.

मात्र दसर्याच्या मुहूर्तावरच या अंदाजांना पहिला धक्का बसला. दुचाकींपासून चारचाकी आणि व्यावसायिक श्रेणीतील सहाचाकी वाहनांपर्यंत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दसर्याच्या दिवशी सराफा बाजारातही 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशीही ग्राहकांचा उत्साह कायम राहिल्याने बाजारपेठेतील चैतन्य वाढले आहे.

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत पिढ्यांपासून जपली गेली आहे. यंदाही संगमनेरच्या सराफा बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ सुरु होती. पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक डिझाइनचे अलंकार आणि चांदीच्या वस्तूंच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. सराफा व्यावसायिकांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या एका दिवसात 10 ते 15 किलो सोन्याचे आणि तितक्याच वजनाच्या चांदीच्या तयार दागिन्यांचे व्यवहार झाले. त्यांचे एकत्रित मूल्य 25 ते 30 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंतचे उर्वरित मुहूर्त लक्षात घेता सराफा बाजाराची महिनाभरातील उलाढाल दीडशे कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाजही व्यक्त होत आहे.

सुवर्णपेठेतील तेजी आर्थिक चैतन्याचा भाग असला, तरी संपूर्ण बाजारपेठेचे चित्र त्याहून व्यापक आहे. किराणा-भुसार, खाद्यतेल, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, गृहपयोगी वस्तू, मिठाई, फराळ साहित्य, वाहन आणि गृहसजावट अशा प्रत्येक क्षेत्रात दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. या सर्व क्षेत्रांचा एकत्रित विचार करता यंदाच्या दिवाळीच्या महिनाभरात संगमनेरच्या बाजारपेठेची उलाढाल एक हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा व्यापारीवर्गाचा संभाव्य अंदाज असला, तरी दसर्यापासून धनत्रयोदशीपर्यंत मिळालेला प्रतिसाद त्याला बळ देणारा आहे.

दुष्काळाचे संकट संपलेले नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानेही कायम आहेत. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही सणासुदीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उतरलेला ग्राहक आणि व्यापार्यांमध्ये निर्माण झालेले चैतन्य संगमनेरच्या आर्थिक सामर्थ्याची साक्ष देत आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत संगमनेरच्या बाजारपेठेचा झगमगाट केवळ रोषणाईपुरता मर्यादित नसून कोट्यवधींच्या उलाढालीतूनही अनुभवायला मिळत आहे.

धनत्रयोदशीचा मुहूर्त सराफापेठेसाठी खूप चांगला होता. जागतिक स्थितीचे अथवा दुष्काळाचे कोणतेही सावट ग्राहकांच्या उत्साहात दिसून आले नाही. अमेरिकेतील घडामोडींनी दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर अस्थिर केले होते, शुक्रवारी त्यात दीड हजारांची घट झाली. सुवर्ण खरेदी करणार्यांमध्ये उत्साही ग्राहकांचा भरणा अधिक असून घडवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. ग्राहकांचा उत्साह पाहता दिवाळीचा पंधरवडा संगमनेरच्या बाजारपेठेसाठी आनंददायी असेल असे चित्र आहे.
– राजेंद्र वर्मा
संचालक, प्रिया ज्वेलर्स, संगमनेर

संगमनेरच्या सुवर्णपेठेसाठी दिवाळीचा पहिला दिवस आशादायी आणि उत्साह वाढवणारा ठरला. संगमनेर कारखाना, दूध संघ, मालपाणी उद्योग समूहासह अन्य खासगी उद्योगांमधील कामगारांच्या हाती पैसा आल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. वर्षभर बचत करुन दिवाळीला सुवर्ण खरेदी करणार्या ग्राहकांची गर्दीही बाजारात आहे. शुक्रवारी सोन्यापेक्षा चांदीच्या तयार दागिन्यांना आमच्याकडे अधिक मागणी होती. एकंदरीत ग्राहकांचा उत्साह पाहता यंदाही संगमनेरच्या सराफा बाजारात उलाढालीचा नवा विक्रम नोंदवला जाईल.
– संकेत काजळे
संचालक, काजळे ज्वेलर्स

यावर्षी दुष्काळाचे सावट जाणवेल असा अंदाज होता. मात्र धनत्रयोदशीच्या उत्साहाने तो धुवून काढला आहे. मुहूर्ताच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली घट सुद्धा ग्राहकांचा उत्साह दुणावणारी ठरली. सोन्याच्या किरकोळ दागिन्यांसह चांदीच्या दागिन्यांना मात्र हौसी ग्राहकांकडून मोठी मागणी होती. ग्राहकांमधील उत्साह पाहता दिवाळीच्या अन्य मुहूर्तावरही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. एकंदरीत ग्राहकांच्या चेहर्यावर दुष्काळाच्या सावटापेक्षा खरेदीचा उत्साह अधिक असल्याने आमचाही उत्साह दुणावला आहे.
– महेश मयूर
संचालक, ओममयूर ज्वेलर्स

