दिवाळीच्या गर्दीत प्रशासनाचे नियोजन ‘दिवाळा’! महामार्गाचे जोडरस्ते क्षणाक्षणाला जाम; बाजारपेठेत वाहनांची बेबंद घुसखोरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सनातन संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या संगमनेरच्या बाजारपेठाही आता गर्दीने फुलल्या आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि भुसारमालापासून सुवर्णालंकारांच्या आलिशान दालनांपर्यंत विस्तारलेल्या या बाजारपेठेत दिवाळीच्या काळात शेकडो कोटींची उलाढाल होते. मात्र, या आर्थिक समृद्धीच्या झगमगाटाला शहराच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेने कलंक लावला आहे. दरवर्षी दिवाळीत गर्दीचे उच्चांक गाठणाऱ्या संगमनेरात यंदाही वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, प्रशासनाच्या नियोजनाचा दिवाळाच निघाल्याचे चित्र रस्तोरस्ती दिसत आहे.

शहरातून महामार्गाला जोडणारे रस्ते क्षणाक्षणाला तुंबत आहेत, बाजारपेठेत वाहनांची बेबंद घुसखोरी सुरु आहे आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये रिक्षाचालकांनी मनमानीने कोंडाळेही घातले आहे. गर्दीचा अंदाज असूनही वाहतुकीचे नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका मात्र छोट्या व्यापारांपासून सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किराणा, भुसारमाल, तेल-तूप, कापड, सुवर्णालंकार आणि स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या व्यापाराने या बाजारपेठेचा विस्तार तालुक्याच्या सीमा ओलांडून शेजारील जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे दिवाळीचा पंधरवडा हा संगमनेरच्या व्यापारी उलाढालीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, बाजारपेठेचा व्याप वाढत असताना त्याला पूरक नागरी सुविधांची उभारणी करण्यात स्थानिक प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

गावठाणातील अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि सणासुदीच्या काळात रस्त्यांवर उभे राहणारे तात्पुरते विक्री स्टॉल यांमुळे वाहतुकीचे आव्हान अधिक गंभीर बनते. वर्षानुवर्षे हेच चित्र असताना त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने यंदाही त्याच समस्यांची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

दिवाळीनिमित्त रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील, तोरणं, गृहसजावटीच्या वस्तू आणि अन्य साहित्य विकण्यासाठी रस्त्यांच्या कडेला छोट्या विक्रेत्यांची गर्दी झाली आहे. वर्षभरातील सणासुदीच्या हंगामात चार पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने हे विक्रेते व्यवसाय करतात. मात्र, त्यांच्या व्यवसायाला पूरक वातावरण निर्माण करण्याऐवजी प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे त्यांनाच वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे अवघड झाले असून, बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांचा बराचसा वेळ वाहतूक कोंडीतच खर्च होत आहे.

संगमनेर बसस्थानक परिसरापासून छत्रपतींच्या अर्धाकृती स्मारकापर्यंत आणि तेथून जुन्या कटारिया कॉर्नरपर्यंत वाहनांची गर्दी वारंवार अनिरंत्रित होत आहे. साईनाथ चौक ते गवंडीपुरा आणि शास्त्री चौक ते तेलीखुंट या तीनही प्रमुख बाजारपेठांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अनिर्बंध प्रवेशामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महामार्गावरुन शहरात येणारी वाहने आणि गावठाणातून महामार्गाकडे जाणारी वाहने एकाच वेळी अरुंद रस्त्यांवर दाखल होत असल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.

अशोक चौक आणि चावडीसारख्या अतिशय अरुंद आणि कायम वर्दळीच्या ठिकाणी रिक्षाचालकांनी निर्माण केलेला अनधिकृत थांबा स्वतंत्र डोकेदुखीचा विषय आहे. ऐन गर्दीच्या वेळीही या चौकांमध्ये रिक्षांचे बस्तान कायम असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना मार्ग काढणेही अवघड होत आहे. रिक्षांसाठी निश्चित थांबे असावेत, त्यांची वर्दळ नियंत्रित असावी आणि चौकांमधील वाहतूक मोकळी राहावी, यासाठी पालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र या बेशिस्तीला आळा घालणारी व्यवस्थाच दिसून येत नाही.

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी लाखो रुपये खर्चून सिग्नल यंत्रणा उभारली होती. मात्र, त्यातील दोन सिग्नल कायम स्वरुपी बेशिस्त वाहतुकीमुळे बंद करण्याची वेळ आली आहे. काश्मीर जवळील सिग्नलमुळे काही प्रमाणात वाहतुकीला शिस्त लागली होती. मात्र, त्यात बिघाड झाल्यानंतर तो दुरुस्त करण्याचीही तत्परता दाखवण्यात आली नाही. परिणामी, अकोले रस्त्याकडून महामार्गावर येणाऱ्या वाहनांचा या चौकात पुन्हा अनिर्बंध वावर सुरु झाला आहे. शिस्तीची सवय लागलेल्या वाहनधारकांनाही आता नाईलाजाने पुन्हा बेशिस्त व्हावे लागत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील मिठाई दुकानासमोर थांबणारी वाहने आणि अनंत फंदी नाट्यगृहाकडून येणारी वाहनांची एकाच वेळी होणारी गर्दी यामुळे हा परिसरही वाहतूक कोंडीचे नवे केंद्र बनला आहे. महामार्गाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवरही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. ग्राहकांची वाहने कुठे उभी करायची, बाजारपेठेत कोणत्या वाहनांना प्रवेश द्यायचा आणि गर्दीच्या वेळेत कोणत्या मार्गाने वाहतूक वळवायची, याचे प्रभावी नियोजन आवश्यक होते; मात्र दिवाळीच्या तोंडावरही त्याचा लवलेश नाही.

खरेतर, दिवाळीपूर्वीच नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संभाव्य गर्दीचा आढावा घेऊन रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आवश्यक होते. पोलिसांच्या समन्वयाने अरुंद बाजारपेठांमध्ये तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर वेळेनुसार निर्बंध घालणे, आसपासच्या मैदानांमध्ये व मोकळ्या जागांमध्ये ग्राहकांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देणे आणि भररस्त्यात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करणे सहज शक्य होते.

रिक्षांसाठी अधिकृत थांबे निश्चित करुन चौकांमधील अनधिकृत थांबे हटवण्याचीही गरज होती. मात्र, या गोष्टीही कराव्या लागतात याचीच पालिका प्रशासनाला कल्पना नसल्याने शहराचा प्रत्येक रस्ता बेशिस्तीने ओसंडला आहे. त्याचा सर्वाधिक फटका छोट्या व्यापाऱ्यांसह पथविक्रेत्यांना बसत आहे.

दिवाळीची गर्दी अचानक उद्भवलेली स्थिती नाही. गर्दीचे दिवस, गर्दीची ठिकाणे आणि कोंडी होणारे रस्ते, चौक याची माहिती वर्षानुवर्षे प्रशासनाकडे उपलब्ध आहे. तरीही दरवर्षी तोच गोंधळ कायम राहत असेल, तर ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नियोजनाच्या अभावाची एकप्रकारची कबुलीच आहे. व्यापाऱ्यांकडून बाजार पावती वसूल करण्याबरोबरच त्यांच्या व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करणे, ग्राहकांना सुरक्षित आणि सुलभ खरेदीची सुविधा देणे देखील स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेचा लौकिक केवळ कोट्यवधींच्या उलाढालीने टिकणार नाही, त्यासाठी नागरिकांना शिस्तबद्ध आणि सुरक्षित बाजारपेठेचा अनुभव देणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा, दिवाळीच्या रोषणाईत शहराच्या रस्त्यांवरील नियोजनशून्यतेचा काळोख असाच समोर येत राहील.

दिवाळीच्या काळात संगमनेरच्या बाजारपेठेत होणारी गर्दी प्रशासनासाठी नवीन नाही. त्यामुळे यंदाच्या वाहतूक कोंडीचे खापर केवळ वाहनांच्या वाढत्या संख्येवर फोडून चालणार नाही. नगरपालिकेने अतिक्रमण नियंत्रण, प्रभारी वाहनतळ, पथविक्रेत्यांसाठी निश्चित जागा आणि रिक्षांचे अधिकृत थांबे याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. पोलिसांसोबत गर्दीच्या वेळेत चौकनिहाय वाहतूक कर्मचारी नियुक्त करुन भररस्त्यातील पार्किंगवर कारवाई करणे गरजेचे आहे. सिग्नल यंत्रणांची दुरुस्ती आणि महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजनही व्हायला हवे. दिवाळीचा सण दरवर्षी येतो, गर्दीही दरवर्षी होते; मग प्रशासनाचे नियोजन दरवर्षीच का हरवते? असा प्रश्न सामान्य संगमनेरकरांना पडला आहे.

