सुखद् वार्ता! मुळा खोऱ्यातील आंबीत धरण पहिल्याच पावसात ओसंडले..! मुळा व प्रवरा खोऱ्यात सर्वत्र मान्सूनचे धुमधडाक्यात शुभागमन..

नायक वृत्तसेवा, अकोले
कोविड संक्रमणाच्या वलयातून हळूहळू बाहेर पडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला मान्सूनच्या पहिल्याच पावसाने सुखद वार्ता दिली आहे. गेल्या चोवीस तासात मुळा आणि प्रवरा खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत असून डोंगर, नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळा खोऱ्यातील धरणांच्या शृंखलेतील मानाचा तुरा समजल्या जाणाऱ्या आंबीत धरणाच्या भिंतींनी आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुळण्या फेकल्याने जिल्ह्यातील पहिले धरण भरण्याचा मान आंबीतने पटकावला आहे. 
गेल्या चोवीस तासांपासून  पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या  मुळा व प्रवरा नद्यांच्या खोऱ्यात सर्वदूर  मान्सूनचे आगमन झाले आहे. या परिसरात मान्सून सक्रिय झाल्यानंतर अनेक तास  संततधार सुरू असते.  असाच प्रकार  गेल्या चोवीस तासांत मुळा खोऱ्यात दिसून आला. येथील सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर मुसळधार जलधारा कोसळल्याने सुकलेले ओढे-नाले अचानक सक्रिय होऊन जमिनीकडे निघाले आहेत. त्यामुळे मुळा नदीच्या उगमापासून नदीपात्रात पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. नदीच्या मुळापासून पहिले समजले जाणारे 192 दलघफूट क्षमतेचे आंबीत धरण आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून त्याच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले.
अंबीत धरण भरल्याने यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मुळानदी वाहती झाली आहे. त्यामुळे कोतुळ नजीकच्या 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड प्रकल्पात नव्याने पाणी येण्याचा मार्गही प्रशस्त झाला असून मूळेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या संगमनेर तालुक्यातील पठार भागासह पारनेर, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यासह नगर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर आणि अकोले ही दोन्ही भावंडे समजली जातात. अकोले तालुक्यातील नागरिकांना मिळणाऱ्या बऱ्याच नागरी सुविधांचा लाभ संगमनेरातून घ्यावा लागतो. येथील आपत्कालीन प्रशासकीय नियोजनातही संगमनेर सोबत अकोल्याचाही विचार केला जातो. संगमनेर हा मोठा आणि अकोले हा धाकटा भाऊ असे सूत्रही  अनेक प्रसंगात समोर आले आहे. गेल्या वर्षभरापासून या दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कोविड संक्रमणाच्या दैनंदिन सरासरीत संगमनेर तालुका अकोल्यापेक्षा अनेक पटीने अधिक संक्रमित होत होता.
मात्र आज पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यातून 58, तर अकोले तालुक्यातून 67 रूग्ण समोर आले. त्यामुळे काहीशा चिंतेत असलेल्या अकोलेकरांना आंबीत धरणाच्या रूपाने सुखद वार्ता मिळाली आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याचा सरासरी दरही तीन टक्क्यांंहून खाली आल्याने यापुढेही आत्ता प्रमाणेच सवलती जारी राहणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्याने एकाच वेळी दुसरी सुखद वार्ता येवून धडकली आहे.
(छायाचित्र : विलास तुपे, राजूर)
Visits: 21 Today: 1 Total: 116927

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *