कोणत्याही राजकीय नेत्यांची अ‍ॅलर्जी नसून कुणाला बांधीलही नाही ः जानकर

नायक वृत्तसेवा, राहुरी
आपल्याला कोणत्याही राजकीय नेत्यांची अ‍ॅलर्जी नाही, अथवा आपण कुणाला बांधीलही नाही. आता राष्ट्रीय समाज पक्षात अन्य समाजातील धर्मनिरपेक्ष लोकही येत आहेत, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली आहे.

महादेव जानकर मंगळवारी (ता.8) राहुरी येथे आले होते. शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण गो-शाळेचे अध्यक्ष ललित चोरडिया यांच्याकडे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. जानकर म्हणाले, सत्ता ही लोक कल्याणासाठी वापरायची असते. लबाडी व जातीय तेढ निर्माण करून जास्त दिवस सत्ता टिकून राहत नाही. लोकांच्या हाताला काम पाहिजे. ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांनी आपल्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना गुलाम बनविले आहे. अनेक लोकांवर अन्याय होत आहेत. मात्र लोक तो मुकाट्याने ते सहन करतात. सरकारच्या मदतीने मोठ्या झालेल्या संस्था यांच्या खासगी असल्यासारखे ते वागतात, अशी टीकाही जानकर यांनी केली. दूध दराबद्दल बोलताना जानकर म्हणाले, आपण मंत्री असताना दुधाला पाच रुपये भाववाढ केली होती. आता किमान दहा रुपये भाववाढ करण्याची गरज आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर दूध दरवाढ आवश्यक आहे. मात्र सरकारने याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. आपल्या पक्षाची भूमिका मांडताना ते म्हणाले, ‘राष्ट्रीय समाज पक्षाला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. अन्य समाजातील धर्मनिरक्षेप लोकही आमच्या पक्षात येत आहेत. त्यांचे स्वागतच आहे. आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांची अ‍ॅलर्जी नाही, अथवा आम्ही कुणाला बांधील नाहीत,’ असेही जानकर म्हणाले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, डॉ.किशोर खेडेकर, डॉ.हर्षद चोरडिया उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 117110

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *