बेलापूर येथे प्रवरा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळला
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात नुकताच तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना काही व्यक्तींनी पाहिले असता त्यांनी तत्काळ बेलापूर पोलिसांना व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळविले. माहिती समजताच हवालदार अतुल लोटके, पोलीस शिपाई पोपट भोईटे, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रमेश अमोलिक, देविदास देसाई, किशोर कदम तातडीने घटनास्थळी पोहोचले. याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एक दुचाकी उभी असल्याची माहिती मिळताच पाहणी केली असता (एमएच.17, एएल.5198) ही गाडी हॅण्डल लॉक केलेल्या अवस्थेत आढळली. तिच्याजवळ खराब झालेला भाजीपाला, वजनकाटा, एक पिशवी व एक डायरी आढळून आली. या डायरीत शंकर उत्तम गलांडे (वय 31) नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि काही संपर्क क्रमांक असलेली चिठ्ठी सापडली. त्यावरुन संपर्क साधला असता पढेगाव येथील शंकर गलांडे हा तीन दिवसांपासून घरी आलेला नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खटकाळी येथील गणेश अल्हाट, नितीन जगताप, दिनेश शेलार, विश्वास बागुल, सुरेश छल्लारे या पोहणार्या तरुणांना बोलावून मृतदेह पाण्याबाहेर काढला. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.