संगमनेरच्या अमरधाममध्ये अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ! दोन दशकांत दीड कोटींचा खर्च; मात्र पालिकेला पर्यायी व्यवस्थेचाच विसर..


श्याम तिवारी, संगमनेर
सुशोभिकरणाच्या नावाखाली गेल्या दोन दशकांत दीड कोटीहून अधिक रुपयांची उधळपट्टी होवूनही लाखभर लोकसंख्येच्या शहरातील अमरधाममध्ये समस्या कायम आहेत. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी सुशोभिकरणाच्या एकाच कामाची दुबार निविदा काढल्यावरुन स्थानिक भाजपने मोठा गाजावाजा करीत आंदोलनही केले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम पालिका प्रशासनावर झाल्याचे आजवर दिसून आले नाही. अवघ्या चार-पाच गुंठ्याच्या जागेत शहरातील हिंदू धर्मियांसाठी एकमेव असलेल्या या अंतिम ठिकाणी आजवर लाखों रुपयांचा खर्च करुनही पर्यायी विद्युत व्यवस्थाच नसल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना अंधारात अथवा मोबाईल विजेर्‍यांच्या उजेडातच आपल्या प्रियजनांना शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे. गुरुवारी सायंकाळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या संगमनेरकरांसमोरच पालिकेच्या सुशोभिकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर आता शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.


राजस्थानी सेन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, भजनसम्राट प्रदीप पिडियार यांचे गुरुवारी (ता.9) निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अमृतवाहिनीच्या काठावर हिंदू धर्मियांसाठी एकमेव असलेल्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजस्थानी समाजासह शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पिडियार यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण अमरधाममध्ये काळोख पसरला. त्यामुळे उपस्थितांना आपल्या खिशातील मोबाईल काढून त्याच्या विजेर्‍यांच्या माध्यमातून स्मशानात प्रकाश उपलब्ध करण्याची वेळ आली. त्यातून 164 वर्षांचा प्रगल्भ इतिहास सांगणार्‍या संगमनेर नगरपरिषदेला जवळपास 60 हजारांहून अधिक हिंदू नागरिकांसाठी असलेल्या एकमेव स्मशानातही मुलभूत सुविधा देता आल्या नसल्याची चर्चा सुरु झाली.


1980 साली संगमनेरातील हिंदू धर्मियांसाठी पुणेनाक्याजवळील प्रवरा पात्रालगत अमरधामची उभारणी झाली. त्यावेळी ही वास्तू उभारताना तेव्हाच्या लोकसंख्येचा विचार गेला होता. मात्र गेल्या चार दशकांत शहराचा झपाट्याने विस्तार झाला असून आसपासच्या शेतजमीनींवरही मोठ्या प्रमाणात रहिवाशी सोसायट्यांची संख्या वाढली आहे. मात्र त्या उपरांतही संगमनेर नगरपरिषदेकडून वारंवार मागणी होवूनही अन्य ठिकाणी हिंदू स्मशानाची निर्मिती केली गेली नाही. त्या ऐवजी त्या-त्या वेळच्या पालिकेतील सत्ताधार्‍यांनी आहे त्या ठिकाणाच्याच विकासाचे विषय पुढे रेटून त्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण केली. परिणाम एका वर्षात अनेकदा अतिशय आटोपशीर असलेल्या या स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ओटाच मिळत नसल्याने अनेकांना नदीच्या काठावर उघड्यावर अथवा अलिकडे बांधलेल्या शेडमध्ये आपल्या आप्तांना अंतिम निरोप द्यावा लागतो.


विशेष म्हणजे दोन दशकांपूर्वी पालिकेने या स्माशानाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली थोडे नव्हे तर, तब्बल एक कोटी रुपये खर्च केले. त्यातून सद्यस्थितीत असलेली अंत्यसंस्काराची शेड आणि उपस्थितांना बसण्यासाठीची आसन व्यवस्था अंतर्भूत होती. त्यानंतर अवघ्या 20 वर्षातच 2019-20 या आर्थिक वर्षात पालिकेने पुन्हा नव्याने 63 लाखांच्या निविदा काढून पुन्हा सुशोभिकरणाच्या नावाखाली लाखों रुपयांची उधळपट्टी केली. धक्कादायक म्हणजे त्यावेळी पालिकेने वर्षभरापूर्वीच केलेल्या कामांची निविदा पुन्हा काढल्याने त्यावरुन भ्रष्टाचाराचा आरोप करीत स्थानिक भाजपने मोठे आंदोलनही उभे केले. त्यातून ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार काम केले नाही, हलके व अतिशय निकृष्ट साहित्य वापरले, शेडसाठी नव्याने लोखंडी पाईप बसवण्याची अट असतानाही जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाच रंग मारुन त्यांचा वापर केला गेला. त्यामुळे नव्याने काम होवूनही अंत्यसंस्काराच्या ओट्यावरच ‘त्या’ शेडला गळती लागल्याचेही चित्र त्यावेळी दाखवण्यात आले होते.


संगमनेर शहराचा विस्तार लक्षात घेता शहरात बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्मियांसाठी पर्यायी स्मशानभूमीची नितांत गरज आहे. मात्र आजवरच्या सत्ताधार्‍यांनी त्याऐवजी आहे त्या कोंबडीलाच दाणे टाकून तिच्याकडून सोन्याचे अंडे मिळवण्यातच धन्यता मानल्याने आजच्या स्थितीत संगमनेरकरांसाठी ‘स्मशान’ ही समस्या बनली आहे. त्यातही अवघ्या 20 वर्षात केवळ चार-पाच गुंठे जागेत असलेल्या या ठिकाणावर तीन-तीनवेळा सुशोभिकरणाचा घाट घालून दीड कोटी रुपयांहून अधिक खर्च झालेला असतानाही ना गरम पाण्याची व्यवस्था आहे, ना तेथील स्वच्छतागृहात वीजेची व्यवस्था आहे. शिवाय इतक्या मोठ्या खर्चात वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतरच्या पर्यायी व्यवस्थेचाही विचार केला गेला नसल्याने मोठे आश्‍चर्य निर्माण झाले आहे. गुरुवारी एका अंत्यसंस्कारावेळी शेकडोंच्या उपस्थिती देखत ही समस्या उद्भवल्यानंतर शहरात मोठा क्षोभ निर्माण झाला आहे.


संगमनेर शहराची आजची ढोबळ लोकसंख्या एक लाखांहून अधिक असून त्यात 60 हजारांहून अधिक हिंदू धर्मिय आहेत. मात्र इतक्या मोठ्या संख्येने राहणार्‍या या समाजासाठी शहरात अवघी एकच स्मशानभूमी असून त्यासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुनही तेथे आजही असुविधांचीच मोठी भरमार आहे. थंडीच्या दिवसांत संस्कार करणार्‍यांना आंघोळ करताना गरम पाण्याची व्यवस्था क्रमप्राप्त आहे, मात्र त्याचा कोणताही लवलेश येथे दिसून येत नाही. त्याचवेळी अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्थाच अस्तित्वात नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना अंधारात अथवा मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात आपल्या आप्तांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या गोष्टींचा विचार करुन पालिकेच्या प्रशासकांनी तातडीची बाब म्हणून संगमनेरच्या हिंदू स्मशानभूमीत असलेल्या कमतरता तत्काळ दूर करण्याची गरज आहे.

Visits: 158 Today: 1 Total: 1426828

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *