वीज पुरवठा सुरळीत करुन अन्यायकारक वीज तोडणी मोहीम थांबवा! कोपरगाव भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कमी-अधिक दाबामुळे दोन महिन्यांपासून वीज पुरवठा विस्कळीत होत आहे. या गोंधळामुळे नागरिकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत असून घरातील विविध विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच वीज विभागाच्या कार्यालयाकडून वीज पुरवठा तोडण्याची मोहीम राबविली जात आहे. ही अन्यायकारक मोहीम थांबवून वीज पुरवठा सुरळीत करा. अन्यथा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोपरगावचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिला आहे.

महावितरण कंपनीचे कोपरगाव शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कोपरगाव शाखेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विनोद राक्षे, नीलेश बोर्‍हाडे, सतीश म्हस्के, नीलेश पवार, शिनूशिंग भाटिया आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. हातावर पोट असलेल्या कुटुंबाची अक्षरशः उपासमार होत आहे. या परिस्थीतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीजेचा खेळखंडोबा सुरू आहे.

कमी-अधिक दाबाने होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे अनेक घरांतील विद्युत उपकरणे जळून जात आहेत. आधीच कोरोना महामारीमध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वीज विभागाकडून थकीत बिलांची आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे वीज मंडळाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा. नागरीकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अन्यथा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष पाठक यांनी दिला आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116728

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *