सैनिकांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांची भेट घेणार ः आ.लहामटे

सैनिकांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांची भेट घेणार ः आ.लहामटे
अकोल्यातील हुतात्मा स्मारकात त्रिदल माजी सैनिक संघटनेचा मेळावा संपन्न
नायक वृत्तसेवा, अकोले
आजी-माजी सैनिकांवर दाखल होणार्‍या खोट्या गुन्ह्यांबद्दल आपण लक्ष घालणार असून त्यासाठी लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटणार असल्याची ग्वाही अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी दिली.


अकोले येथे हुतात्मा स्मारकात महाराष्ट्र राज्य त्रिदल माजी सैनिक संघटनेचा मेळावा आमदार लहामटे यांच्या अध्यक्षस्थानी व त्रिदल माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप लगड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अजय देशमुख, शरद चव्हाण, अकोले तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर जगताप, वीरपत्नी लहानूबाई मालुंजकर, त्रिदल माजी सैनिक महिला आघाडीच्या अकोले तालुकाध्यक्षा दिलशाद शेख, माजी अध्यक्ष रामनाथ कासार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना त्रिदल माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष लगड म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पण याच भूमीत माजी सैनिकांना चेचून मारलं जात आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे, सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत हा सर्व अन्याय थांबविण्यासाठी त्रिदल माजी सैनिक संघटनेचा जन्म झाला आहे. आता आमची मानसिकता संपलेली आहे. यापुढे माजी सैनिकांवर महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या आजी-माजी सैनिकांकडे पाहून जर कोणी खोकले, तर त्याला ठोकले जाईल अशा कडक शब्दांत लगड यांनी इशारा दिला.


तसेच सरकारने माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली हे फक्त आश्वासन आहे. या संदर्भातील शासन निर्णय हा चुकीचा आहे. माजी सैनिकांचा जर शासनाला खरंच अभिमान असेल तर त्यांनी माजी सैनिकांचे पाणीपट्टी, वीजबिल माफ करावे. तसेच टोल, कर, माजी सैनिकांवर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, माजी सैनिकांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढावे अशी मागणी देखील लगड यांनी केली.


याप्रसंगी अकोले तालुका माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सचिन नवले, सचिव विजय देशमुख, माजी सैनिक पत्नी जिजाबाई मालुंजकर, माजी सैनिक पत्नी अलका लगड, बबन हाळकुंडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशांत धुमाळ यांनी केले तर आभार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर जगताप यांनी मानले.

Visits: 104 Today: 4 Total: 1106108

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *