रतनवाडीमध्ये ‘रासेयो’ शिबिर होणार असल्याने ग्रामस्थांत आनंद आदर्श प्राचार्य डॉ. मोहन वामन यांचे ग्रामस्थांनी मानले आभार..


नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या रतनवाडी गावामध्ये गेली 25 वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन हे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित करायचे. परंतु मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात रौप्य महोत्सवी शिबिर होणार असल्याचे कळताच गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी रतनवाडी गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित केले जावे अशी ग्रामस्थांची मनापासून इच्छा असते. परंतू कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व शासन कोणते निर्णय घेईल याकडे आदिवासी बांधवांचे लक्ष लागून होते. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. मोहन वामन राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी नेहमी धडपडत असतात. याचबरोबर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाची स्वच्छता, प्रत्येक कार्यात नागरिकांचा सहभाग तेथील परिसराची माहिती इत्यादी सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने करत असतात. मागील दोन वर्षांपूर्वी रतनवाडी येथे झालेल्या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये रॉक क्लायबिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग यासारखे साहसी ट्रेनिंग स्वयंसेवकांना दिले होते. निसर्ग संवर्धन आणि निसर्गाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मीयता निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते.

त्यामुळे रतनवाडी गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मागील वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर झाले नसल्याने गावातील नागरिकांनी प्रा. नामदेव बांगर यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनाचे सावट कमी होताच राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आपल्या गावामध्ये सुरु करण्याची विनंती प्राचार्य डॉ. मोहन वामन यांना कळावावी असे सांगितले. 25 वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून येथील पंचक्रोशीत केलेल्या कामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता देखीलचालू शैक्षणिक वर्षात होणार आहे असे कळताच गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सदर शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होत असतात. साधारणपणे एका शिबिरामध्ये तीनशेपेक्षा अधिक स्वयंसेवक महाराष्ट्रातून सहभाग नोंदवत असतात. याचबरोबर प्राचार्य वामन यांचे अकोले तालुक्यातील जैवविविधतेवर संशोधन झाले असल्याने स्वयंसेवकांना अधिक सखोल माहिती मिळते. त्याचबरोबर रतनगड परिसराची स्वस्छता, आरोग्यविषयक उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन याबद्दलची माहिती, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणाची ओळख आदी सर्व माहिती ह्या शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांना देण्यात येत असते. त्यामुळेच मागील वर्षी प्राचार्य डॉ. वामन यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Visits: 198 Today: 1 Total: 1982072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *