पती-पत्नीच्या वादात पाच महिन्याच्या बाळाची आईकडून हत्या कोपरगाव तालुका पोलिसांत आईवर खुनाचा गुन्हा झाला दाखल


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
पती-पत्नीच्या वादात आपल्या पाच महिन्याच्या बाळाचा आईनेच मारहाण करत गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, बाळाचा मृतदेह विहिरीत टाकून दोन अज्ञात इसमांनी बाळाला पळवून नेल्याचा बनाव रचल्याचही समोर आलं आहे. कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे रविवारी (ता.19) हा प्रकार उघडकीस आला. बाळाच्या पित्याच्या फिर्यादीवरून आईविरोधात खुनाचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बनाव करणार्‍या आईवरच पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली असता तिनेच बाळाची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी मयत बाळाच्या आईला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत असून मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पती सूरज पत्नी गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद होत असल्याने गायत्रीने रागाच्या भरात आपल्या शिवम नावाच्या पाच महिने सात दिवसांच्या बाळाला मारहाण करून गळा आवळून खून केला. बाळाचा मृतदेह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत फेकून काही अज्ञात लोकांनी येऊन मुलाला पळवून नेल्याचा बनाव केला. दरम्यान बाळाच्या नातेवाईकांनी त्यात दोन इसमांचा परिसरात शोध घेतला परंतु ते सापडले नसल्याने त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आल्याने त्यादृष्टीने तपास केला असता तिने घडलेला प्रकार सांगितला. रोजच्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात स्वतःच्या बाळाला मारहाण करून गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले.

दरम्यान, घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली असून मयत बाळाचे वडील सूरज शंकर माळी (वय 23, रा.दंडवते वस्ती, कारवाडी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयत मुलाची आई गायत्री सूरज माळी हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव करीत आहे.

Visits: 88 Today: 1 Total: 1112221

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *