वादळ-वार्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश! पुढील चार दिवस प्रचंड वेगाने वारे वाहणार; मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही शक्यता

नायक वृत्तसेवा, नगर
पुढील चार दिवसांच्या कालावधीत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याच्या वार्‍यासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून मेघगर्जनेसह वीजा कोसळण्याच्या घटनाही घडू शकतात. 29 व 30 मे रोजी वार्‍याचा कमाल वेग 40 किलो मीटरवर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला असून त्या दृष्टीने प्रशासनाने खबदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी जिल्हावासियांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याने जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क केले असून 27 ते 30 मे या कालावधीत जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी वेगवान वार्‍यासह वादळाची शक्यता वर्तविली आहे. त्यासोबतच काही भागात मेघगर्जनेसह तुफान पावसाचाही अंदाज असून या कालावधीत वीजांचा कडकडाट होवून त्या कोसळण्याच्या घटनाही घडू शकतात असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक सावध राहून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी उघड्यावर ठेवलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असेही आपत्ती व्यवस्थापनाकडून कळविले गेले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजांचा कडकडाट सुरु असताना संगणक, दूरचित्रवाणी संच यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा विद्युत पुरवठा बंद ठेवून स्रोतापासून ते वेगळे ठेवावे. अशावेळी दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असतांना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, बाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. वीज पुरवठा करणार्‍या खांबांजवळ कोणीही वावरु नये. विजांचा कडकडाट सुरु असताना नागरिकांनी झाडांचा आश्रय घेवू नये. अशा काळात आपल्या जवळ धातूच्या वस्तू बाळगू नये. अतिवृष्टी अथवा सोसाट्याचा वारा वाहत असताना शक्यतो घराबाहेर पडू नये व या दरम्यान प्रवासही करु नये. पाळीव प्राण्यांच्या निवार्‍याची ठिकाणे सुरक्षित करावीत. मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या शेडवरील पत्रे उडून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


नैसर्गिक आपत्तीच्या काळात पर्जन्याविषयी कोणताही निश्चित अंदाज नसतो. त्यामुळे अशा काळात नदी, नाले, डोंगर, जंगल अथवा पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. पाण्याचे स्रात असलेल्या ठिकाणी जावू नये, एखाद्या वेळी पर्जन्यवृष्टीचा परिणाम म्हणून कोरडे असलेले नदी अथवा नालेही क्षणात तुडूंब भरुन वाहू शकतात. अशा काळात अवघड ठिकाणी जावून ‘सेल्फी’ घेण्याचा मोह टाळावा. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 118873

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *