सीताफळाची व्यावसायिक लागवड करुन मिळविला बक्कळ नफा!
वीरगावमधील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब अस्वलेंचा यशस्वी प्रयोग
महेश पगारे, अकोले
तालुक्यातील वीरगाव येथील ध्येयवेडे प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब नामदेव अस्वले यांनी पुन्हा एकदा शेतकर्यांसाठी नवा आदर्श उभा केला आहे. बांधावरील सीताफळाची व्यावसायिक रुपाने लागवड करुन अत्यंत कमी खर्चात चांगले उत्पादन काढत बक्कळ नफा मिळविला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतीमध्ये हतबल असलेल्या शेतकर्यांसाठी त्यांचा हा प्रयोग नक्कीच नवसंजीवनी ठरणारा आहे.
प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब अस्वले यांनी शेतीमध्ये कायमच नवीन वाट शोधलेली आहे. पारंपारिक पिकांबरोबर त्यांनी फळशेतीला अधिक महत्त्व दिलेले आहे. यापूर्वी त्यांनी डाळिंब शेतीतून नवा वस्तुपाठ घालून दिला होता. त्यामुळे असंख्य शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देवून प्रयोग करायचे. आता देखील त्यांनी उजाड माळरानावर जणू नंदनवनच फुलविले आहे. सहा एकर क्षेत्रावर एनएमके वन गोल्डन या सीताफळाच्या वाणाची लागवड केलेली आहे. त्यासाठी ठिबकचा वापर केला असून, एकरी साधारण पंधरा हजार रुपयांचा खर्च केला आहे. इतर पिकांच्या तुलनेत खत-औषधे व मजुरी अत्यंत कमी लागत असल्याने त्यांचा मोठा खर्च वाचला आहे.
सध्या त्यांची काढणी सुरू असून एकरी 4 टनाच्या आसपास उत्पादन निघत आहे. त्यास प्रतिकिलो साठ रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे साधारण 24 टन उत्पादन निघाल्यास 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळून खर्च वगळता चौदा लाख रुपयांचा निव्वळ नफा होणार आहे. शिवाय देशांतर्गत बाजारपेठेतच मोठी मागणी आहे. यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य देखील अपार मेहनत घेत असल्यानेच यशस्वी प्रयोग करता येत असल्याचे ते आवर्जुन सांगत आहे.
बांधावरील पिकाची जर व्यावसायिक लागवड केली तर नक्कीच शेतकर्यांना समृद्ध होता येईल. आम्ही देखील सातत्याने फळपिकांची व्यावसायिक दृष्टीकोनातून लागवड केली. त्यामुळेच यशस्वी होता आले.
– बाळासाहेब अस्वले (सीताफळ उत्पादक)