संगमनेरातील देशी दारुचा महापूर आटेना! वैदूवाडीतील चार ठिकाणी छापे घालून बत्तीस लिटर देशी व गावठी दारु जप्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या भयातही संगमनेर शहराभोवती फुललेले अवैध व्यवसायांचे मळे शहर पोलिसांनी उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली असून गेल्या तीन दिवसांपासून नऊ दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारीही पोलिसांनी खांडगाव शिवारातील वैदूवाडीत छापेमारी करुन देशी व गावठी दारु विकणार्या चौघांवर कारवाई करीत सुमारे आठ हजार रुपये किंमतीची 158 बाटल्या देशी व 30 लिटर गावठी दारु जप्त केली. यातील केवळ राजू रामा लोखंडे हा एकमेव आरोपी पोलिसांच्या हाती लागला, उर्वरीत तिघेही मात्र पहून जाण्यात यशस्वी ठरले. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवायांनी बेकायदा दारुविक्रेते धास्तावले असले तरीही शहरातील अन्य अंमली पदार्थांचे ‘धंदे’ मात्र जोमात सुरु आहेत.

कोविडच्या भयावह संकटातही अवैध धंदेचालक नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांचा नायनाट करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार अवैध दारुविक्रीचा हॉटस्पॉट बनलेल्या वैदूवाडी येथील तब्बल चार विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. येथील सचिन दादू जाधव (वय 26) हा पुणे-नाशिक महामार्गावरील शिवाजीनगर येथील जाणू स्मृती घरासमोरील टपरीच्या आडोशाला बुधवारी (ता.26) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अवैधरित्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेली उग्र वासाची दारु विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तो पळून गेला. परंतु, 900 रुपये किंमतीची 30 लिटर दारु जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुरनं.270/2021 मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर दुसरी कारवाईही येथेच केली. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संदीप तया शिंदे (वय 21) हा अवैधरित्या देशी दारुची व्रिकी करत होता. छापा टाकला असता तो पळून गेला. तर 3 हजार 120 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलीस शिपाई अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुरनं.271/2021 मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईचा सिलसिला सुरुच ठेवून येथील राजू राजा लोखंडे (वय 42) हा अवैधरित्या देशी दारुची विक्री करत असताना सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास पकडला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 2 हजार 496 रुपयांची देशी दारु जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई महादेव हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.272/2021 मुंबई दारुबंदी कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास पुन्हा छापा टाकत अवैधरित्या विक्री करणारी महिला सपना गणेश महाले हिच्याकडून तेराशे रुपये किंमतीची देशी दारु जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शशीकांत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.273/2021 मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
![]()
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर पोलीसही रात्रं-दिवस काम करत आहे. याच संधीचा फायदा उठवत अवैध धंदेचालक नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलत त्यांचा बंदोबस्त करण्यास कठोर पावले उचलली आहेत. यामुळे अवैध धंद्यावाल्यांत एकच खळबळ उडाली आहे.

