भयातही कर्तव्यासह त्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी! संक्रमणा विरोधात वर्षभर अविश्रांत लढणारे पालिका कर्मचारी ‘प्लाझ्मा दानात’ही आघाडीवर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरात कोविड प्रादुर्भाव सुरु होण्याच्या घटनेला एप्रिलमध्ये वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षभरापासून देशासह संगमनेर तालुक्यातील आरोग्यसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व घटक, सफाई कर्मचारी, पोलीस यंत्रणा, अन्य विभाग आणि अनेक खासगी स्वयंसेवी संस्था त्या विरोधात अविश्रांत लढत आहेत. या दरम्यानच्या काळात यासर्व घटकातील अनेकांना कोविडची लागणही झाली, त्यातून बहुतांशी जण सावरले आणि पुन्हा कर्तव्यात रुजूही झाले. दुर्दैवाने या संक्रमणाने काहींचा बळीही घेतला. आजच्या स्थितीत तर संक्रमणाची गती आणि त्याचे परिणाम यातून सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असतांनाही ‘कर्तव्य सर्वोपरि’ म्हणत आपले जीव धोक्यात घालून आजही यंत्रणेतील सगळेच घटक आपापल्या जबाबदार्या पूर्ण करीत आहेत. मात्र संगमनेर नगर पालिकेच्या कर्मचार्यांनी त्याही पुढे जात अशा भयातही आपल्यातील सामाजिक कणव अधिक ठळक करतांना बाधित रुग्णांच्या उपचारात ‘संजीवनी’ ठरणार्या प्लाझ्माचे दान करुन सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले आहे.
शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असते. त्यामुळे साहजिकच गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी संगमनेरात कोविडचा शिरकाव झाल्यापासूनच संगमनेर नगरपालिका या अदृष्य विषाणूच्या विरोधात शड्डू ठोकून अन्य शासकीय यंत्रणांच्या बरोबरीने अगदी सुरुवातीपासून पहिल्या फळीतील आघाडीवर लढत आहे. या काळात शहराची दैनंदिन स्वच्छता, कोविड विषाणूंसह अन्य साथीचा आजार फैलावू नये यासाठी औषधांची फवारणी, बाधित रुग्णांचा संपर्क शोधून त्यांच्या स्राव चाचण्या करण्यासह बाधिताच्या नातेवाईकांना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करणे, पालिकेच्या आवारात (कॉटेज हॉस्पिटल) विलगीकरणाची व्यवस्था पाहणे, तेथील रुग्णांना जेवण पुरविणे, प्रतिबंधात्मक क्षेत्राची (कंटेन्मेंट झोन) अंमलबजावणी करणे, तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल याचे नियोजन करणे, शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमेतंर्गत शहरी नागरिकांचे सर्वेक्षण करणे,
टाळेबंदीच्या कालावधीत कोविड नियमांचे पालन करुन अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरळीत ठेवणे, बाजार व्यवस्था पहाणे, सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर यावर देखरेख ठेवणे व प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे, दुर्दैवाने संक्रमणाचा बळी ठरलेल्या रुग्णाचे कोविडच्या निर्देशानुसार अंत्यसंस्कार करणे, या महामारीबाबत वारंवार नागरिकांना सूचना देवून समाज प्रबोधन करणे या सारख्या अनेक जबाबदार्यांचे वहन पालिकेच्या कर्मचार्यांनी या कालावधीत केले आणि आजही करीत आहेत. या कालावधीत संगमनेरकरांची समर्पित भावनेतून सेवा करतांना पालिकेच्या अनेक अधिकारी व कर्मचार्यांना कोविडची लागणही झाली, मात्र त्यांनी न डगमगता त्याचा पराभव करीत पुन्हा ‘जनसेवेतून ईश्वरसेवा’चा मार्ग निवडला. दुर्दैवाने या कालावधीत काही लढवय्ये धारातीर्थीही पडले, मात्र पालिकेसह अन्य संस्थांच्या कर्तव्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या सर्वच विभागातील लढवय्ये अविश्रांत परिश्रम घेत आहेत. इतके करुनही या सर्वांच्या मनात ‘कर्तव्या’चीच भावना आहे हे विशेष. मात्र कर्तव्यासह आता पालिकेच्या कर्मचार्यांनी आपल्यातील सामाजिक बांधिलकीही सुस्पष्ट केली आहे. कोविड यौद्धा म्हणून या लढाईत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या कर्मचार्यांचे सर्वप्रथम लसीकरण झाले. लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्या कर्मचार्यांच्या शरीरात त्यांनतर महिन्याभरात ‘प्रतिपिंड’ तयार झाले.
त्यामुळे त्यांचे जीवन सुक्षित होण्यासह त्यांच्यात प्रत्येकी दोन जणांना जीवदान देणार्या ‘प्लाझ्मा’ची निर्मितीही झाली. गंभीर अवस्थेतील कोविड बाधितांना संजीवनी ठरणारा हा प्लाझ्मा दान करतांना पालिकेच्या कर्मचार्यांमधील सामाजिक कणव आणखी ठळक झाली. लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने संगमनेरात प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोन्ही लस घेवून एक महिन्याहून अधिक कालावधी झालेल्या पालिकेच्या कर्मचार्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत 20 जणांना जीवनदान देण्याचे महद्कार्य केले. पालिका कर्मचार्यांचे हे दातृत्त्व कोविडच्या भयातही कर्तव्यपूर्तीसह सामाजिक बांधिलकी जोपासणारा आदर्शच ठरले.
देशासह राज्यातील कोविड संक्रमणाची गती वाढल्याने राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर, फॅबीफ्ल्यू, रक्त आणि प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन आणि औषधांसाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र रक्त आणि प्लाझ्मा या दोन गोष्टी पूर्णतः नागरी दातृत्त्वावर अवलंबून आहेत. रक्तदाबाचा त्रास नसलेले कोणीही दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकते, तर कोविड संक्रमित होवून गेलेले अथवा दोन्ही लशी घेवून एक महिन्याचा कालावधी झालेले कोणीही प्लाझ्मा दान करु शकते. सध्या रक्त आणि प्लाझ्मा यांची राज्याला नितांत गरज असून सामाजिक संस्थांकडून ठिकठिकाणी घेण्यात येणार्या अशा शिबीरांच्या माध्यमातून अधिकाधिक दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. पालिकेच्या कर्मचार्यांनी दाखवलेले दातृत्त्व खरोखरी आदर्शवत आहे, त्याचे समाजाने अनुकरण करण्याची गरज आहे.