विरोधक निवडणुकीत ‘बनवाबनवी’ करण्यात माहीर! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा घणाघात; उपमुख्यमंत्र्यांच्या सभेचाही घेतला समाचार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत गंमतीदार गोष्टी बघायला मिळाल्या अशी टीका करीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांच्या सभेतील वक्तव्यांचा समाचार घेतला. चुकून आमदार झालेल्यांना सांभाळण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना पाठीमागून कानात सांगितले जायचे आणि ते पुढे बोलायचे अशी केविलवाणी स्थिती दिसत असल्याचे सांगत त्यांनी थेट उद्योगमंत्र्यांना फोन लावून एमआयडीसी मंजूर करण्याच्या ‘त्या’ प्रसंगाचीही पोलखोल केली. यावेळी खूद्द थोरात यांनी आपल्या मोबाईलवरुन पांढरकवडा येथील जाहीरसभेतही उपमुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्यातील संभाषण जाहीरपणे ऐकवून यांच्या सभेत जे मागाल त्याला मंजूरी मिळत होती. हा इलेक्शन फंडा असून निवडणुकीत विरोधकांकडून अशीच बनाबनवी केली जाते अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शुक्रवारी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांसाठी जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दूर्गा तांबे यांच्यासह समितीचे सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्ते यावेळी मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री थोरात यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करताना संगमनेरच्या विकासावरही दृष्टीक्षेप टाकला. संगमनेरच्या सौंदर्यात भर घालणार्या रस्त्याचा आनंद व्यक्त होत असताना काही नतद्रष्ट महामार्गावर आडवे बसून दुभाजकांवरील दिवे बंद करण्याचे षडयंत्र करीत होते असा घणाघात करीत त्यांनी विरोधकांवर चौफेर आसूड ओढले. कोणतीही कामं आपोआप होत नसतात, त्यामागे परिश्रम, पाठपुरावा आणि दृष्टीही असते असा टोला लगावताना त्यांनी पुणे-नाशिक बायपास, काकडी विमानतळाचे भूसंपादन, रेल्वेमार्ग अशा विविध विषयांवरही भाष्य केले.

संगमनेरची आर्थिक स्थिती, सहकारी संस्था, शिक्षण व आरोग्य व्यवस्था, बाजारपेठ व येथील व्यापारी, जिल्ह्यात नाहीत इतक्या सुवर्णपेढ्या यामागे येथील शांतता, सुव्यवस्था व बंधुभाव कारणीभूत असल्याचे सांगत त्यांनी गेल्या वर्षभरापासून हा बंधूभाव संपवण्याचे, शहराला नशेखोरीकडे व गुन्हेगारीकडे नेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोपही केला. यासाठी त्यांनी घुलेवाडीतील तरुणांच्या दोनगटात झालेल्या वादातून एकाचा मनगटापासून हात छाटण्याची घटना, उत्तेजक इंजेक्शन व एमडी ड्रग्सवरील कारवाईचे दाखले देत शहराला नशामुक्त ठेवून आपली संस्कृती जपण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.

यावेळची निवडणूक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून लढवताना प्रत्येक उमेदवारांची निवड अतिशय काळजीपूर्वक केल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्ष विकासाचे असतील अशी ग्वाही देताना त्यांनी डॉ.सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून बदलत गेलेल्या शहराचा मागोवा घेतला. निवडणुकीनंतर विरोधकांनाही सोबत घेवून शहराचा विकास करणारी नगरपालिका अशी वेगळी संस्कृती आपण निर्माण केल्याचा उल्लेखही माजीमंत्री थोरात यांनी केला. आज मुबलक पाण्याने सुखावलेला संगमनेरकर उगाच आनंदात नाहीत तर, त्यामागे कोणाचे तरी प्रयत्न, परिश्रम असल्याचे सांगत त्यांनी निळवंडे धरणाच्या खडतर प्रवासालाही उजाळा दिला.

असंख्य लोकांना आनंद देणार्या या कृतीमागे कोणीतरी धरण बांधण्यासाठी, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी, 38 किलोमीटर अडथळे ओलांडून पाईप आणण्यासाठी प्रयत्न करुन कधीकाळी खड्ड्यातून पाणी भरावे लागणार्या आपल्या लोकांना दुसर्या मजल्यापर्यंत मुबलक पाणी दिलंय याबद्दल शाब्बासकी देण्यासाठीही औदार्य लागते अशा शब्दात त्यांनी विरोधकांना चिमटाही काढला. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दूर्गा तांबे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. प्रशासनाने नवीन नगररोडवरील जागा नाकारल्याने मालदाड रोड कॉर्नरवर भर महामार्गावर झालेल्या या सभेला मोठी गर्दी होती.

संगमनेर सेवा समितीच्या आजच्या जाहीर सभेत आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर 2.0’ ही आपल्या मनातील संकल्पना प्रत्यक्षात मांडली. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षात समितीकडून कालबद्ध पद्धतीने कोणती कामे केली जातील याबाबत प्रेझेन्टेशनही सादर केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी ‘टायगर’ आणि ‘सिंह’ यावरही भाष्य करीत सिंह इतरांनाही सोबत घेवून चालत असल्यानेच तो जंगलचा राजा असल्याचा अप्रत्यक्ष टोलाही लगावला.

