संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला! तीन प्रभागांमधील निवडणूकही स्थगित; नव्याने निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपिलात गेलेल्या काही नगरपालिकांसह अनेक ठिकाणच्या जागांवरील निवडणुकीला स्थगिती दिली आहे, त्यात संगमनेरातील तीन प्रभागांमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या निर्णयाने माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्यासह तीन प्रभागातील निवडणूक स्थगित झाली आहे. संगमनेरातील या तीनही प्रभागांमध्ये तीन जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाईल व दुसऱ्या दिवशी निवडणुकीचा निकाल घोषित होईल. त्यामुळे नगराध्यक्षपदासह उर्वरीत प्रभागांमध्ये मंगळवारी (ता.2) मतदान झाल्यानंतरही प्रत्यक्ष निकालासाठी संगमनेरकरांना तब्बल वीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर छाननीत आक्षेप घेतलेल्या मात्र संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळलेल्या प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायालयात अपिलात गेलेल्या प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणचे न्यायालयीन निर्णय 22 नोव्हेंबरनंतर देण्यात आले अशा सर्व ठिकाणांवरील निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशाचा परिणाम संगमनेर नगरपालिका निवडणुकीवरही झाला असून तीन प्रभागांमधील तीन जागांवरील निवडणूक स्थगित झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार संगमनेर नगरपालिका प्रभाग क्रमांक एक (ब) मधील दिलीप पुंड विरुद्ध अभिजीत पुंड या दोघांमध्ये अतिशय लक्षवेधी लढत होण्याची शक्यता होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता या प्रभागातील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्यासोबतच प्रभाग क्रमांक दोन (ब) सेवा समितीच्या अर्चना दिघे व शिवसेनेच्या इंदिरा नामन आणि प्रभाग क्रमांक १५ (ब) मधील माजी उपनगराध्यक्ष इसहाकखान पठाण यांच्याया पत्नी नसीमबानो पठाण यांचा चौघींशी सामना रंगणार होता, या लढतीलाही स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारी संगमनेर शहरातील या तीन जागांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आता 10 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून 11 डिसेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल. त्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी आठ दिवसांचा कालावधी मिळेल 20 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊन 21 डिसेंबर रोजी 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या नगराध्यक्षपदासह उर्वरित प्रभागांची एकत्रित मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. त्यामुळे संगमने नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडणार असली तरीही प्रत्यक्ष निकालासाठी मात्र 21 डिसेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Visits: 4415 Today: 6 Total: 1098116
